Goa: म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिल्याचे 29तारखेला जाहीर झाले. त्यानंतर गोव्यातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती.
विरोधी पक्षांनी भाजप सरकारला धारेवर धरले होते. मात्र, आठवडा उलटूनही पक्ष केवळ आंदोलनाची भाषा करत असताना प्रत्यक्षात कृती करत नव्हते. याबाबत ‘गोमन्तक’ने कानपिचक्या दिल्यानंतर म्हादईसाठी जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.
‘आरजी’ या पक्षाने आंदोलनासाठी पुढाकार घेतला असून रविवार 8 रोजी आझाद मैदानावर या आंदोलनाची ठिणगी पेटणार आहे. याबरोबरच फोंडा, काणकोण, केपे, म्हार्दोळ, सत्तरीत लोक आक्रमक झाले असून जनआंदोलनासाठी बैठका, निषेध मोर्चा, बैठकांचे सत्र सुरू आहे.
फोंड्यात जागृती बैठक
फोंड्यात सध्या जरी म्हादई प्रश्नासंबंधीचे वातावरण ''ठंडा ठंडा कुल कुल ''असे वाटत असले तरी गोव्यावर झालेल्या या अन्यायाबाबत आवाज उठवण्याची तयारी सुरू झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
विरोधी पक्षाने डीपीआर मागे घेण्याची 16 जानेवारी ही तारीख दिली असल्यामुळे या तारखेनंतर आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष असल्यामुळे या पक्षाने पुढाकार घेणे साहजिकच आहे.
फोंड्यात काँग्रेसची चांगली शक्ती असल्यामुळे काँग्रेस स्वबळावर आंदोलन करू शकतो. पण पक्षाची फुटपट्टी न लावता सर्व घटकांना एकत्र आणून आंदोलन करण्याचा मनोदय फोंड्यात व्यक्त होत आहे. यात काही भाजपचे नेते उतरणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
याबाबतीत फोंडा काँग्रेसचे गटप्रमुख विलियम आगियार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेच सांगितले. पक्षाचे लेबल न लावता सर्वपक्षीय तसेच सर्व घटकांचा समावेश असलेल्या समितीतर्फी आंदोलन छेडल्यास त्याचा परिणाम प्रभावी होऊ शकेल, असे त्यांचे मत पडले. त्यादृष्टीने सध्या बैठकांचे सत्र सुरू झाले असून म्हादईबाबत जनजागृती केली जात आहे, असे ते म्हणाले.
सामाजिक चळवळ उभारणार
म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असल्यामुळे ती गोव्यापासून दूर होणे म्हणजे शरीरातला प्राणच काढून टाकण्यासारखे आहे, असे मत काँग्रेसचे राजेश वेरेकर यांनी व्यक्त केले. हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे त्याला राजकीय रंग देणे योग्य नव्हे. यामुळे हे आंदोलन फोंडा नागरिक आघाडी व अन्य एखाद्या तत्सम शीर्षकाखाली लढवले जाईल, म्हादईसाठी सामाजिक चळवळ उभारणार, असेही वेरेकर म्हणाले.
आमची आंदोलनाची तयारी
अन्यविरुद्ध लढणे हा आमचा धर्मच आहे. प्रस्तुत डीपीआरला मान्यता दिल्यामुळे गोव्यावर अन्याय झाला आहे. या बाबतीत बैठका सुरू असून प्रस्तुत डीपीआर मागे न घेतल्यास आम्ही लढा देण्याकरता सज्ज आहोत, असे फोंडा काँग्रेसचे माजी गटाध्यक्ष जॉन परेरा यांनी सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत म्हादईचे पाणी वळवू द्यायचे नाही, यासाठी आता रस्त्यावर उतरत जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. सध्या तरी ‘आरजी’ने यासाठी पुढाकार घेतला असला तरी पर्यावरणप्रेमी, कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठबळ द्यायचे ठरविले आहे.
त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होणार, अशी अपेक्षा आहे. तर म्हादईसाठी गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आरजीकडून करण्यात आले आहे.
म्हादईसाठी जागरूक काणकोणवासीयांची 9 रोजी संध्याकाळी 5 वाजता ‘व्हिजन अँड मिशन-प्रोग्रेसिव्ह काणकोण''च्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ आंदोलनाचे समन्वयक जनार्दन भंडारी यांनी काणकोणच्या जनतेने या बैठकीत सहभागी होऊन चळवळ पुढे नेण्यासाठी आपले विचार मांडण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकीला स्वाभिमानी जागृत काणकोणकर, काणकोण येथील ज्येष्ठ नागरिक, काणकोण पत्रकार संघ, गोंयकार, जन-सेना वॉरियर्स आणि ‘व्हिजन अँड मिशन… प्रोग्रेसिव्ह काणकोण’चे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते शांताजी नाईक गावकर हे काणकोण तालुक्यासाठी “सेव्ह म्हादई… सेव्ह गोवा” चे निमंत्रक असतील.
म्हार्दोळात उद्या बैठक : म्हादईच्या लोकलढ्यासाठी रविवार 8 रोजी शालिनी सपन, वेलिंग-म्हार्दोळ येथे संध्याकाळी 3.30 वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला साहित्यिक, खेळाडू, कलाकार, डॉक्टर, अभियत्ता यांच्या म्हादईच्या रक्षणासाठी बहुसंख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कांता गावडे, प्रकाश नाईक, रामकृष्ण जल्मी यांनी केले आहे.
सोशल मीडियावर जोरदार चर्चा : म्हादईसाठी प्रत्यक्षात रस्त्यावरची लढाई सुरू नसली तरी नेटकऱ्यांनी सरकारवर टीकेचा झोड उठविला आहे. सरकारबरोबर विविध राजकीय पक्षांनाही त्यांनी धारेवर धरले असून काँग्रेस, भाजप, गोवा फॉरवर्ड, मगोप या पक्षांवरही जोरदार टीका होऊ लागली आहे. तर दुसरीकडे म्हादईवरील विविध गाणी, गीते, लोकगीते सोशल मीडियावर गाजू लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.