जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव एकाच मंचावर उपस्थित होते. मात्र, या क्षणीही आलेमाव यांनी सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अनेक समस्यांवरून सरकारला धारेवर धरले. याच वेळी, 'कदंब बस'च्या स्थितीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर चर्चेचा विषय बनले आहे.
मडगाव ते पणजी दरम्यान धावणाऱ्या 'कदंब' बसमध्ये पावसाचे पाणी गळत असल्याच्या प्रश्नावर युरी आलेमाव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन हे सगळ्यात वाईट कॉर्पोरेशन आहे," असे त्यांनी थेट म्हटले.
मंत्र्यांना या समस्येची जाणीव व्हावी यासाठी "एके दिवशी त्यांच्या घरात गळती झाली पाहिजे," असे रोखठोक विधान त्यांनी केले.आलेमाव यांच्या मते, 'कदंब बस'बाबत अनेक तक्रारी करूनही मंत्र्यांचे त्याकडे लक्ष नाही. याच मुद्द्यावरून त्यांनी गोवा सरकारला 'लिकेजचं सरकार' असे उपरोधिक नाव दिले.
देशभरातील परिवहन सेवांच्या तुलनेत 'कदंब' बससेवा खूपच मागे आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले. या विभागात अनेक कर्मचारी असूनही मंत्री, सचिव आणि संपूर्ण विभाग कमी का पडत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'कदंब' परिवहन विभागात आता तरी सुधारणा होणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या तिखट प्रतिक्रियेमुळे 'कदंब' बसच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.