Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: ‘मनोहारी’ विमानतळाला गळती!

Khari Kujbuj Political Satire: कुटबण जेटीवरील प्रकारानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सरसकट सगळेच प्रकार गांभिर्याने घेऊन पावले उचलली व थेट सील ठोकण्याची तयारी केली

गोमन्तक डिजिटल टीम

‘मनोहारी’ विमानतळाला गळती!

मोपा येथे असलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छताला गळती लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. राज्यात परतीच्या पावसाने पणजी,सत्तरीसह विविध भागात जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. त्यातच मोपास्थित मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरही पावसाने आपले अस्तित्व दाखवले. मोपा विमानतळ नेहमीच वादात किंवा चर्चेत असते. पावसामुळे छताच्या कामाबाबतही प्रश्‍नचिन्ह उभे झाले आहे. सोशल मीडियात ‘मनोहारी’ विमानतळ अशा शीर्षकांतर्गत व्हिडिओ पोस्ट केला जात असून नेटकऱ्यांकडून मनोहारी विमानतळाला गळती कशी?,अशी विचारणा होत आहे. ∙∙∙

नाक दाबताच उघडले तोंड !

मडगावच्या एसजीपीडीए बाजारांतील मांस विक्रेत्या स्टॅालना प्राधिकरणाने सांडपाणी उघड्या गटारांत सोडल्या प्रकरणी आजवर अनेकदा तंबी देऊनही ते वठणीवर येत नव्हते. पण आता प्रत्यक्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी सोडणे बंद करा वा स्टॅाल बंद करा, अशा नोटिसा दिल्यावर ते तर ताळ्यावर आलेत. पण एसजीपीडीनेही मार्केटला भूमिगत गटार योजनेला जोडणी घेण्यासाठी पावले उचलावी लागली. नाक दाबताच तोंड उघडते,असे म्हणतात ते यालाच. सदर मार्केट सुरू होऊन काही दशके तर सदर परिसरांत भूगटार योजना कार्यरत होऊन एक दशक उलटले पण अनेक विनंत्या करूनही सदर विक्रेते व एसजीपीडीएही सदर जोडणी घेण्याचे काही मनावर घेत नव्हती. पण कुटबण जेटीवरील प्रकारानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सरसकट सगळेच प्रकार गांभिर्याने घेऊन पावले उचलली व थेट सील ठोकण्याची तयारी केली. परिणामी इतकी वर्षे ज्याबाबत टंगळ मंगळ पहायला मिळत होती, तिथे प्रत्यक्ष अंमलबजावणी दिसू लागली. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत असो, कुटबण जेटी असो वा आता एसजीपीडीए मार्केटची सीवरेज जोडणी असो, ही त्याची उदाहरणेच मानली जात आहेत. ∙∙∙

खरेच विसर पडला?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पाठिशी मंत्रिमंडळ ठामपणे उभे असल्याचे सांगण्यासाठी जलस्त्रोतमंंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सुशासनासाठी उदाहरणे देताना त्यांनी प्रतापसिंह राणे व स्व. मनोहर पर्रीकर यांची उदाहरणे दिली. आता डॉ. प्रमोद सावंत त्याच तोलामोलाचे काम करतात, असेही त्यांनी नमूद केले. हे सारे सांगताना त्यांनी माजी मुख्यमंत्री व कृषीमंत्री रवी नाईक यांचे नाव घेणे का टाळले याची चर्चा सुरु झाली आहे. रवी नाईक व सुभाष शिरोडकर हे दोघेही भंडारी समाजाचे आहेत. समाजात सध्या अंतर्गत राजकारणात ऊत आला आहे. दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यामुळे रवी नाईक मुख्यमंत्रिपदी असताना आपण शिक्षणमंत्री होतो, याचा विसर शिरोडकर यांना पडला असावा, असे आता बोलले जाऊ लागले आहे. ∙∙∙

पेलेला जेव्‍हा राग येतो ...!

बाणावली येथील पेले फर्नांडिस हा तसा सेलेब्रेटी मच्‍छीमार. त्‍याचा व्‍हिडिओ कधी सचिन तेंडुलकर यांच्‍याबरोबर प्रसार माध्‍यमात झळकतो तर कधी सुधा मूर्ती यांच्‍याबरोबर. पण दोन दिवसांपूर्वी याच पेलेचा चक्‍क ‘काश्‍‍टीवर’ निषेध करतानाचा एक व्‍हिडिओ प्रसारित झाला असून त्‍यामुळे पेले पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे. गोव्‍याबाहेरुन येणाऱ्या कर्नाटकच्‍या मच्‍छीमार बोटी गोव्‍यातील मासळी राजरोसपणे लुटून नेत आहेत. आणि गोव्‍याचे मच्‍छीमार खाते त्‍यावर काहीच कारवाई करत नाही, याचा निषेध करण्‍यासाठी पेलेने आपल्‍या अंगावरील कपडे काढून फक्‍त काश्‍‍टी बांधून निषेध केला. पेेलेच्‍या या निषेधानंतर तरी मालपे(कर्नाटक)च्‍या बोटी गोव्‍यात येऊन मच्‍छीमारी करणे थांबवतील का? ∙∙∙

‘कदंब’ची दुरवस्था!

राज्यात कदंबच्या प्रवासी बसेस धावत आहेत. मात्र त्यातील काही नव्या बसेसची स्थितीही केविलवाणी झाली आहे. बसेसची झालेली दुर्दशा तसेच रस्ता अपघातांसंदर्भात नेहमी जागरूकता करणाऱ्या‘एनजीओ’ गोवा कॅनचे रोलँड मार्टिन्स यांनी तर कदंब बसमध्ये पावसात होणारी गळती याचे धिंडवडेच काढले आहेत. नव्या वातानुकुलित कदंब बसेसमध्येही पावसाचे पाणी गळते त्यामुळे त्यांनी बसमध्येच छत्री उघडून तेथे बसण्याची वेळ येत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. या कदंब बसेसमध्ये गळती होते, याची कदंबच्या अधिकाऱ्यांना माहितीच नाही, हे नवलच. कदंब वाहतूक महामंडळ प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे हे महामंडळाचे कर्तव्य आहे. बस एसी असून तरी काय? असा प्रश्‍न प्रवाशांतून करत आहे. सरकारने ई बसेस आणल्या शिवाय एसी बसेस सुरू केल्या आहेत. समस्या जैसे थे? ∙∙∙

खराब रस्त्यांचे राजकारण

राज्यातील खराब रस्त्यांप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदार आणि अभियंत्यांची चांगलीच हजेरी घेतली आहे. या खराब रस्त्यांवरून राजकारणही झाले. राज्यात नवीनच केलेले रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेले आहेत. अर्थातच पाऊसही तसा दमदार पडला. पण दोन महिन्यांतच रस्ता कसा काय बरे वाहून जाऊ शकतो, हा सर्वसामान्य नागरिकाला पडलेला प्रश्‍न. मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर खराब झालेल्या काही रस्त्यांची दुरुस्ती कंत्राटदारांनी केली खरी, पण आता पाऊस ओसरल्यावर हे रस्ते पूर्ववत कसे काय करायचे, हाच मोठा प्रश्‍न या कंत्राटदार आणि अभियंत्यांना पडला आहे. कारण बहुतांश रस्त्यांची बिले तर अदा झाली आहेत ना.....! ∙∙∙ ∙∙∙

‘स्मार्ट सिटी’त पाणी तुंबणे कधी थांबेल?

पणजी ‘स्मार्ट सिटी’ होत असल्याच्या गप्पा रोजच होतात. पण शहरातील महत्वाच्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबण्याच्या घटना रोखण्यावर अद्याप उपाययोजना शोधण्यात यश आलेले नाही. पणजी शहर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. काही वेळातच कंदब बसस्थानकापासून जवळ असणारा आंबेडकर उद्यान परिसर जलमय झाला. जोरदार पावसात काही वेळातच आंबेडकर उद्यानासमोरील रस्ते पाण्याखाली जाण्याचे प्रकार नित्याचे झाले असले तरी त्यावर अद्यापही कायमचा उपाय कधी निघणार आहे, याची चिंता येथील व्यवसायिकांना लागून आहे. शिवाय पाटो या आलिशान परिसरातील कृष्णदास शामा ग्रंथालयासमोरील रस्त्यावर पाऊस नसतानाही भरतीच्या वेळी पाणी तुंबते. प्रत्येक पावसाळ्यात जोरदार वृष्टी झाल्यानंतर पणजीतील पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये कंदब बसस्थानक परिरसर, डॉ. आंबेडकर उद्यान, पाटो परिसराचा समावेश होतो. आज सकाळी समुद्राला भरती नसल्याने रुअ दि ओरेंम खाडीत पावसाचे पाणी सामावले जात होते. परंतु उद्यान परिसरासमोरील गटारे तुडुंब भरल्याने दुकानांमध्ये पाणी जाण्याचा प्रकारही घडल्याने संतापाने हीच काय स्मार्ट सिटी,अशी विचारणा व्यावसायिक करत आहेत. ∙∙∙

शिंदेसेनेला रिक्त हस्ते परतावे लागले !

गणेश चतुर्थीच्या काळात कोकण दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या नेत्यांनी गोव्यातही काही सेना नेत्यांच्या निवासस्थानी भेट दिली. पक्षवाढीसाठी वाव मिळेल,अशी त्या नेत्यांची अपेक्षा होती,अशी चर्चा आहे. परंतु महाराष्ट्रात युती असलेल्या सेनेला गोव्यात कितपत वाव मित्र पक्ष आणि सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष देणार याबाबत साशंकताच असल्याने सेना नेत्यांना म्हणे करंज्या दिल्या पण आश्‍वासन दिले नाही. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा पोलिसांनी मिळवून दिला रशियन पर्यटकाचा हरवलेला पासपोर्ट

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

Goa Finance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT