शिरगाव: येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाल्यानंतर प्रचंड मानसिक दबाव तेथील जनतेवर आला आहे. या घटनेवर उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. भाविक आता येणार नाहीत, असे वाटल्याने विक्रेत्यांनी मात्र काढता पाय घेणे सुरू केल्याचे दिसून आले.
हळदोणे-खोर्जुवेमार्गे शिरगाव आज गाठतानाच तेथे काही अघटित घडले याची कल्पना खोर्जुवेपासूनच यायला सुरू झाले होती. एरव्ही मोगऱ्याच्या कळ्यांची माळ विकण्यासाठी खोर्जुवे ते शिरगाव यादरम्यानच्या पाचेक किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक महिला उभ्या असत. आज खोर्जुवे ते शिरगावदरम्यान तीन ते चार महिलाच मोगरीचे कळे विकताना दिसून आल्या.
सरळ मयेकडे जाणारा रस्ता सोडून डावीकडे शिरगावला वळल्यावर बंद पडलेल्या खाणींचा परिसर दिसतो. त्या परिसरातील मातीच्या रस्त्यावरून खाली उतरत जाताना मंदिराचा कळस दृष्टीला पडतो. एरव्ही या रस्त्यावर वाहनांची मोठी रेलचेल असते. आज दुपारी एखाददुसरे वाहन त्या रस्त्यावर येताना दिसले.
खोर्जुवेकडून जाणारा हा रस्ता मंदिराच्या मागील भागात पोहोचतो. मंदिराच्या मागील भागात एका मोठ्या मैदानावर वाहनतळ आहे. उत्सव काळात या वाहनतळावर वाहन ठेवण्यासाठी जागा मिळण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. आज मात्र दहा कार आणि पंधरा-वीस दुचाकी सोडल्या तर अन्य वाहने तेथे नव्हती. यावरून दुर्घटनेनंतर भाविक सकाळी पुन्हा मंदिरात आले नसल्याचे दिसून आले.
वाहन तळापासून मंदिराकडे जाण्यासाठी स्टीलसारखे चकाकणारे लोखंडी फाटक आहे. दोन पायऱ्या उतरून मंदिराच्या मागच्या भागात पोहोचता येते. तेथे भाविकांच्या प्रतीक्षेत असलेल्या मोगरीचे कळे विक्रेत्या आजची नेमकी स्थिती सांगून जात होत्या.
मंदिरासमोरून डावीकडे वळत होमकुंडाच्या दिशेने जाताना वाटेत लागणाऱ्या प्रत्येक घरात डोकावत बोलण्याचा प्रयत्न केला असता आम्ही झोपलो होतो आम्हाला काही ठाऊक नाही, अशी उत्तरे मिळत होती. विक्रेत्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता मोठी गर्दी होती त्यामुळे नेमके तेथे काय घडले हे दिसले नाही, असे ठरावीक साच्याचे उत्तर देण्यात येत होते. एकंदर त्या दुर्घटनेवरून सर्वांना मानसिक धक्का बसलेला जाणवल्याशिवाय राहिला नाही. नेमकी दुर्घटना कशी घडली याचे वर्णन करण्यासही कोणी तयार नव्हते.
जत्रेच्या निमित्ताने आपल्या बहिणीकडे आलेल्या बोगदा-वास्को येथील साजरो कोरगावकर यांनी सांगितले, की आवाजामुळे उत्तर रात्री साडेतीनच्या दरम्यान जाग आली. घराबाहेर येऊन पाहतात तो एक मोठा गर्दीचा लोंढा दिसला. काहीजण चिरडल्याचे सांगण्यात येत होते. तेथेच तोंडावर पाणी मारून काहीजणांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न चालल्याचे दिसून आले. रेटारेटीमुळे हा प्रकार झाला असावा असे प्रथमदर्शनी दिसत होते. अर्ध्या तासाने रुग्णवाहिका आली आणि जखमींना घेऊन गेली, एवढे आठवते.
चिंचोळ्या रस्त्यावर जेथे चेंगराचेंगरी झाली तेथून दोन मीटरवरच संगीता मडगावकर यांचे घर आहे. त्यांनी सांगितले की, मध्यरात्रीनंतर काहीजणांचा गलका ऐकू आला म्हणून दरवाजा उघडून त्या बाहेर आल्या. त्यावेळी दगडी कुंपणावरून अनेकजणांनी उड्या मारून त्यांच्या अंगणात गर्दी केली होती. दरवाजा उघडल्यानंतर त्यापैकी बहुतेकजण त्यांच्या घरातही शिरले. ते केवळ चिरडले-चिरडले एवढेच सांगत होते. पोलिस व त्यानंतर रुग्णवाहिकांची ये-जा दिसून आली. त्यानंतर सकाळीच काहीजण दगावल्याचे समजले.
वाहनतळापासून पुढे जात मंदिराला डावीकडून वळसा घालत मंदिरात जाण्यापूर्वी डाव्या हाताला देवस्थान समितीचे कार्यालय लागते. त्या कार्यालयाच्या बाहेर प्लास्टिक खुर्च्या घालून काही ग्रामस्थ दुर्घटनेबाबत तावाताावाने बोलत होते. दुर्घटना टाळता आली असती का, असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. अशी चर्चा करणाऱ्यांत भंडारी नेते उपेंद्र गावकर यांचाही समावेश होता. पत्रकार आलेला पाहताच त्यांनी ती चर्चा बंद केली. नंतर मंदिरात दर्शन घेऊन परत येताना केवळ दबक्या आवाजात ती सुरू असल्याचे जाणवले.
फूल विक्री करणाऱ्या पैरा येथील दीक्षा हळदणकर म्हणाल्या, दरवर्षी होमकुंडानंतर भाविक घरी परततात व दुपारनंतर कौलोत्सवासाठी परत येतात. यंदा भाविकांना घरी परतण्यासाठी उशीर झाला. अस्नोड्याकडील मार्ग सकाळपर्यंत बंद होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.