Konkani Drama Competition
Konkani Drama Competition  Dainik Gomantak
गोवा

Konkani Drama Competition : कला अकादमीच्या कोकणी नाट्य स्पर्धेचे ‘कवित्व’

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

Konkani Drama Competition :

‘शिमगा संपला तरी कवित्व उरते’ अशी एक उक्ती आहे. नुकत्याच संपलेल्या कला अकादमीच्या ४८ व्या कोकणी नाट्य स्पर्धेचा यामुळेच आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.

राजीव गांधी कला मंदिर फोंडा येथे संपन्न झालेल्या या नाट्य स्पर्धेत सुरुवातीला ३१ नाट्यसंस्था होत्या. नंतर काही संस्था गळल्यामुळे ही संख्या २३ वर येऊन ठेपली. सुरुवातीला काहीशी डल वाटणारी ही स्पर्धा नंतर एखादी मैफिल रंगावी तशी जबरदस्त रंगली.

तरी यावेळी नागेश प्रासादिक नाट्य मंडळ, अंत्रुज घुडयो यासारख्या नामांकित संस्था काही कारणामुळे स्पर्धेत नव्हत्या. तरीसुद्धा सादर झालेल्या काही दर्जेदार नाटकामुळे त्यांची कमी भासली नाही. यामुळे कोकणी नाट्यक्षेत्राचे भवितव्य उज्वल असल्याचे संकेत मिळायला लागले आहेत.

दैनिक ‘गोमन्तक’ करता परीक्षण लिहीत असल्यामुळे मला या स्पर्धेतील नाटकाचे रसग्रहण करण्याची संधी मिळाली आणि यातून कोकणी रंगभूमी विकसित होत चालल्याचा निष्कर्ष काढता आला. काही युवा रंगकर्मी मैदानात उतरल्यामुळे स्पर्धेचा आयाम बदलत चालल्याचेही लक्षात आले. अनेक नवे प्रयोग या स्पर्धेत बघायला मिळाले. बर्थ ऑफ डेथ, तो आणि दोन पिशे, रंग खेव, हय वदन,

द ट्रॅप, मूळवंस, काळ माया, तूदु इस्ता बॅ सारख्या नाटकातून कलेचे विविध आविष्कार अनुभवायला मिळाले. बहुतेक संहिता अनुवादित असल्या तरी दिपराज सातोर्डेकर यांची '' बर्थ र्ऑफ डेथ '' या नाटकाची संहिता खरोखर नावीन्यपूर्ण अशीच होती. तशीच ‘तो आनी दोन पिशे’ ही अविनाश नायक यांची संहिताही अभिनव अशी होती. या स्पर्धेतील बहुतेक नाटके अनुवादित असणे, ही बाब मात्र खटकली.

गोव्यात प्रतिभा संपन्न लेखक नाहीत का? हा प्रश्न त्यामुळेच एरणीवर आला आहे. फक्त रूपांतर करून नाटके रंगभूमीवर आणणे हे कधीही कोकणी नाट्यक्षेत्राच्या दृष्टीने योग्य नव्हे. अशामुळे कोकणी नाट्य क्षेत्राचे अवमूल्यन व्हायला लागले आहे.

त्यामुळे पुढील नाट्य स्पर्धेत तरी जास्तीत जास्त नव्या संहिता रंगभूमीवर यायला हव्यात असे सुचवावेसे वाटते. तरी पण काही अनुवादित संहिता सुद्धा लक्ष वेधून गेल्या हे तेवढेच खरे. त्याचबरोबर वसंत सावंत, डॉ. विजय थळी, पुंडलिक नाईकांसारखे दिग्गज नाट्य लेखक या स्पर्धेत थोडे ढेपाळल्यासारखे वाटले.

सावंत यांच्या या स्पर्धेत पाच संहिता होत्या. त्यातले चार अनुवादीत तर एक त्यांची स्वतंत्र होती. पण हयवदन व सगळी रात चा अपवाद वगळता इतर संहिता मनावर प्रभाव टाकू शकल्या नाहीत.

दोन फुल आणि शीतकडी सारखी संहिता सावंतांच्या लेखणीतून स्पुरावी याचा खरोखर विषाद वाटतो. तरीसुध्दा एवढ्या संहितास्पर्धेच्या रिंगणात उतरल्यामुळे सावंत अभिनंदनास पात्र ठरतात. पुंडलिक नाईकांच्या दिष्ट दौलत व धनयां देवंचारा या संहिता कालबाह्य व त्यामुळे संदर्भहीन वाटल्या. डॉ. थळी यांची सैमाचो खेळ या नाटकाची संहिता तर ठिसूळ सादरीकरणामुळे वायाच गेली.

च्यारी यांचा ‘फेरयेतलो खेळ’ सुध्दा अपेक्षा एवढा जमू शकला नाही. मात्र वैभव कवळेकर सारखा नव्या दमाचा कलाकार भाव खाऊन गेला. त्यांचे रंग खेव हे नाटक बुद्धीला खाद्य देणारे ठरले.

ही नवीन पिढी रंगभूमीवर नवीन नवीन प्रयोग करायला भीत नाही याची जाणीव झाली. त्यामुळे भविष्याची धुरा वाहू शकेल असे अनेक कलाकार या स्‍पर्धेत सापडले. मिलिंद बर्वे ( द ट्रॅप), वैभव कवळेकर ( रंगखेव), सलील नाईक, मयुर मयेकर (हयवदन) संघर्ष वळवईकर (तो आनी दोन पिशें) देवराज गावडे ( तुदू इस्ता बॅ), अश्र्वेक देसाई ( निमणो पॅलो), कुणाल बोरकर ( बर्थ ऑफ डेथ) योगेश जोशी (कन्यादान) यांना नाट्य क्षेत्रात उज्ज्वलभविष्य आहे यात शंकाच नाही. गोव्यात परिपक्क महिला कलाकार सापडत नाही ही ओरड ही या स्पर्धेने खोटी ठरवली.

समीक्षा देसाई (हयवदन), वैष्णवी काकोडे(कन्यादान), सोबिता कुडतरकर (तीन पैशाचो तियात्र), सायली नाईक (काळमाया), चैती कडकडे (द ट्रॅप), शेफाली नाईक(रंगखेव),

वेदिका वाळके( निमणो पेलो), हर्षला पाटील ( बर्थ ऑफ डेथ), लक्ष्मी सातोर्डेकर (सगळी रात) या महिला कलाकारांनी प्रेक्षकाला प्रभावित करून सोडले. हर्षला पाटील यांनी तर गोव्यातील महिला कलाकार या कोणत्याही राज्यातील व्यावसायिक कलाकारापेक्षा कमी नाहीत हे समप्रमाण सिध्द केले.

त्यायबरोबर रघुनाथ साकोर्डेकर, व्यंकटेश गावणेकर (कर्मभोग) या बुर्जुग कलाकारांनी हम किसीसे कम नही है दाखवून दिले. अनेक सर्जनशील दिग्दर्शकाने आपला असा ठसा उमटवला. दीपराज सार्तोडेकर ( बर्थ ऑफ डेथ), वैभव कवळेकर(रंगखेव),

गौतम गावडे ( तुदू इस्ता बॅ), नितीन नाईक (द ट्रॅप), निलेश महाले (हयवदन) अश्‍वेश गिमोणकर (तो आनी दो पिशे) यांनी या स्पर्धेत लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर रघुनाथ साकोर्डेकर (कर्मभोग), व गंगाराम नार्वेकर (कन्यादान) यांनी परिपक्क दिग्दर्शनाचा नमूना सादर केला. तांत्रिक बाबतीतही गोव्यातील कलाकार बरेच पुढे असल्याची प्रचिती आली.

काही नाटके तर केवळ सुहित प्रकाशयोजना सुबक नेपथ्य व परिपूर्ण पार्श्‍वसंगीत द्वारा या स्पर्धेत तगू शकली. आता राहता राहिला तो प्रश्‍न बक्षीसांचाच. बक्षीसे काही सर्वांनाच मिळू शकत नाहीत पण या स्पर्धेतील २३ नाटकापैकी दहा बारा नाटके तरी सर्व अर्थाने दर्जेदार होती यात शंकाच नाही.

काही नाटकांनी विरस केला असला तरी ही नाटके स्पर्धेला गालबोट लावू शकली नाहीत हे ही तेवढेच खरे. त्यामुळे बक्षीसांचा मुद्दा गौण ठरतो.

अर्थात ही स्पर्धा बक्षिसांकरिता असली तरी प्रेक्षंकापुढे केलेले सादरीकरण तेवढेच महत्त्वाचे ठरते हे विसरता कामा नये. मी या बाबतीत अनेक प्रेक्षक व रंगकर्मींकडे बोललो आणि अनेक कलाकार व तंत्रज्ञानी त्यांना प्रभावित केल्याचे लक्षात आले. त्याचा उल्लेख मी परीक्षणात केला आहेच आणि हाच मुद्दा भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.

या कलाकाराकडे कलेचा जो खजिना आहे त्याची प्रेक्षकांवर उधळण करणे हे महत्त्वाचे. ही स्पर्धा म्हणजे अंतिम स्पर्धा नव्हे. पुढे अनेक स्पर्धा तुम्हाला खुणवायला लागतील यात शंकाच नाही.

त्याचबरोबर ‘गोमन्तका’तून प्रसिध्द झालेल्या नाट्यपरीक्षणांना प्रेक्षकांचा आणि कलाकारांचा जो उदंड प्रतिसाद मिळाला त्याला तोड नाही.तुमचे परीक्षण हाच आमच्या दृष्टीने शेवटचा शब्‍द असे सांगणारे तसेच तुमच्या परीक्षणामुळे आम्हाला नाट्यग्रहण करता आले, असे कबुली देणारे अनेक रसिक व कलाकार भेटले.

चुकाही समजल्या!

नाट्यपरीक्षण प्रसिध्द करणारे ‘गोमन्तक’ हे एकमेव दैनिक असल्यामुळे त्यांचे आभार मानणारे अनेक कलाकार भेटले. आम्हांला गोमन्तकमुळे लोकांपर्यंत पोहचता आले. आमच्या चुका ही समजल्या असा कबुली जबाब अनेकांनी दिला. त्यामुळे ‘गोमन्तक’मधून प्रसिध्द होणारे परीक्षण हा या स्पर्धेचा ‘मानबिंदू’ ठरला. शेवटी ‘‘ऑल इज फेअर इन लव ॲण्ड आर्ट’’ हेच खरे नाही का....?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT