Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : कलाविष्काराची उत्तुंग झेप हयवदन; रसिकांकडून उत्‍स्फूर्त प्रतिसाद

Goa News : परिपूर्ण मिलाफामुळे प्रयोगाला ‘चार चाँद’

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

Goa News :

कला अकादमीच्या कोकणी नाट्यस्पर्धेत रसरंग उगवे या संस्थेने ‘हयवदन’ हे नीलेश महाले दिग्दर्शित नाटक सादर करून स्पर्धेतील चुरस बरीच वाढविली.

या स्पर्धेचे हे दहावे पुष्प. गिरीश कर्नाड यांच्या मूळ संहितेचे वसंत सावंत यांनी केलेले कोकणीत रूपांतर वेधक ठरले. त्यांना सूचक प्रकाशयोजना, सुयोग नेपथ्य तसेच पूरक पार्श्‍वसंगीत लाभल्यामुळे प्रयोग अधिकच रंगला. त्यात परत कलाकारांनी आपल्या भूमिका समजून केल्यामुळे प्रयोगाला ‘चार चाँद’ लागू शकले.

देवदत्त व कपिल हे जिगरी दोस्त. देवदत्त पद्मिनी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिला पटविण्याकरिता कपिल जातो. देवदत्त व पद्मिनी यांचे लग्न झाल्यानंतर पद्मिनी कपिलकडे आकर्षित होत आहे, असा संशय तिच्या नवऱ्याला येतो. आणि या संशयापोटी कपिल व पद्मिनीबरोबर देवदर्शनाला गेलेला देवदत्त कालिमातेसमोर स्वतःचे मुंडके उडवून आत्महत्या करतो. त्याची आत्महत्या पाहिल्यानंतर तिथे आलेला कपिलही त्या मार्गाने स्वतःला मृत्यूच्या आधीन होतो.

आणि या दोघांचा मृत्यू पाहिल्यावर पद्मिनी ही आत्महत्या करायला निघते. तेवढ्यात कालिमाता प्रसन्न होऊन ती पद्मिनीला दोघांची मुंडकी त्यांच्या शरीराला जोडून त्यांना जीवंत करायला सांगते. पण चुकून पद्मिनी कपिलचे मुंडके देवदत्तच्या शरीराला व देवदत्तचे मुंडके कपिलच्या शरीराला जोडते.

कालिमातेने दिलेल्या आशीर्वादाने ते दोघे जिवंत होतात खरे; पण एकाचे मुंडके व दुसऱ्याचे शरीर असे समीकरण बनते. त्यामुळे पद्मिनीला आपला नवरा कोण हेच कळत नाही. पण शेवटी देवदत्तचे मुंडके असलेल्या कपिलच्या शरीरालाच ती आपला नवरा मानते व त्याच्याबरोबर जाते. यातूनच मग पुढील बदल उद्भभवतात.

पद्मिनी या घटना होण्यापूर्वी गर्भवती असते. आणि कपिलकडे आल्यावर ती प्रसूत होते. पण परत एकदा निर्माण झालेल्या गैरसमजुतीमुळे ते तिघेही स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करतात. आणि नाटकाच्या शेवटी पद्मिनीच्या मुलामुळे एका घोड्याचे शरीर असलेल्या; पण माणसाचा आवाज असलेल्या प्राण्याचे पुनर्वसन होते.

यात माणसाचे शरीर महत्त्वाचे का मुंडके, हा प्रश्‍न लेखकाने अधोरेखित केला आहे. केवळ अधोरेखित केला आहे असे नव्हे तर तो रंजक रित्या लोकांपर्यंत पोहचविला आहे. यात सूत्रधार म्हणून एक भटमामा नावाची व्यक्ती दाखविण्यात आली आहे. ही व्यक्ती रंगमंचावर घडणाऱ्या घटनांचा ताळमेळ घालत असते. आणि या भटमामामुळेच नाटक रंगत जाते.

‘हयवदन’ हे घोड्याचे शरीर; पण माणसाचा आवाज असलेल्या प्राण्याचे नाव. नाटकाच्या शेवटी तो संपूर्णपणे घोड्याच्या रूपात येतो आणि नाटकाची सांगता होते. यातील देवदत्त कपिल व पद्मिनी या तीन व्यक्तिरेखा लेखकाने चांगल्याच खुलवल्या आहेत. आणि या प्रयोगात दिग्दर्शक नीलेश महाले यांनी या संहितेचे परिपूर्णरीत्या सादरीकरण करून संहितेला चांगलाच न्याय दिला आहे.

देवदत्त व पद्मिनी कपिल हे तिघे गाडीतून देवदर्शनाला जातात तो प्रसंग वा दोघेही आपआपली मुंडकी छाटतात तो प्रसंग वा पाऊले टाकण्याचा प्रसंग वा नाटकाच्या क्लायमेक्सचा प्रसंग तसेच पात्रे आपल्याशीच विचार करतात ते प्रसंग यातून महालेंचे दिग्दर्शन प्रतीत होत होते. खरेतर संपूर्ण नाटक हे प्रकाशयोजनेच्‍या व्यासपीठावरच अवलंबून होते. प्रकाशयोजनेमुळेच नाटकातील प्रसंग जिवंत होऊ शकले. विद्या कामत यांचे पार्श्‍वसंगीत व जयप्रकाश निर्मले यांचे नेपथ्यही प्रयोगाला साजेसे होते.

मात्र परत परत प्रसंग बदलत असल्यामुळे काही ठिकाणी प्रयोग रेंगाळल्यासारखा वाटत होता. सलील नाईक यांचा देवदत्त व मयूर मयेकर यांचा कपिल यांच्या अभिनयाची वाखाणणी करावी तेवढी थोडीच. सुरुवातीला देवदत्त असलेला नंतर कपिल बनतो व कपिल असलेला देवदत्त बनतो.

त्यात त्यांची वेशभूषा तर बदलली आहेच पण संवादाची घाटणसुध्दा बदलण्यात आली आहे. आणि हा बदल दाखविणे हे एक आव्हानच होते आणि या आव्हानाला नाईक व मयेकर पुरून उरले असेच म्हणावे लागेल. पद्मिनी झालेल्या समीक्षा देसाई या तशा रंगभूमीवरच्या प्रसिध्द कलाकार त्यांची भूमिका तशी गुंतागुंतीची होती खास करून पुनर्जन्म झाल्यानंतर आपला पती कोण या दुविधेत पडलेली पद्मिनी समीक्षा यांनी योग्यरीत्या प्रकट केली.

या तिघांबरोबरच भटमामा झालेल्या मन्मेष नाईक यांनीही समर्थ अभिनय करून नाटकाला एक वेगळी उंचीप्राप्त करून दिली. बाकीच्या इतर पात्रांनी मुख्य व्यक्तिरेखांना चांगली साथ दिली; पण तरीही बाहुल्या झालेल्या शनया महाले व मंजुळा या आपल्या छोट्या भूमिकेतही छाप सोडून गेल्या. काही किरकोळ त्रुटी सोडल्यास ‘हयवदन’चा प्रयोग अत्युच्च दर्जाचा ठरला.

गर्दी वाढली आणि प्रतिसादही!

आतापर्यंत झालेल्या सर्व नाटकांत या नाटकाला सर्वात जास्त गर्दी लाभली. तरीही कलामंदिराच्या अनेक खुर्च्या प्रेक्षकांविना सुन्या वाटत होत्या. नीलेश महालेंचे नाव असल्यामुळे या प्रयोगाला तरी कलामंदिर फुल्ल होईल असे वाटत होते; पण तसे काही न घडल्यामुळे स्पर्धेतील नाटकांना गर्दी कमी का, हा प्रश्‍न आजही चर्चिला जात होता.

मात्र, या नाटकाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासकरून मध्यंतराच्या वेळी मुंडकी बदलतात. या प्रसंगाला प्रेक्षकगृहातून टाळ्यांच्या कडकडाटाची पावती मिळाली. शेवटी कलाकार हा याच पावतीचा भुकेला असतो, हे तेवढेच खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT