Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: सुभाष फळदेसाई लेखन करणार

Khari Kujbuj Political Satire: जनतेच्या करातून चालणारी ‘म्हजी बस’ सेवा रविवारी बंद का?

गोमन्तक डिजिटल टीम

सुभाष फळदेसाई लेखन करणार

गोव्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई साहित्यप्रेमी आहेत, याबद्दल कुणाचेही दुमत नसेल. आपण अजूनपर्यंत लेखन केलेले नाही हे ते स्वतः सांगतात. त्यामुळे त्यांनी आता राजकारणातून निवृत्त झाल्यावर लेखन करणार असे मनोगत व्यक्त केले आहे. परंतु लेखन करण्यासाठी राजकारणातून निवृत्त व्हावे लागते असे काही नाही. मोठ मोठे राजकारणी राजकारण करूनही प्रसिद्ध साहित्यिक झालेले नाहीत का? त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सुभाषबाबांनी साहित्य निर्मिती करावी असे सल्ले त्यामुळेच त्यांना आता येऊ लागले आहेत म्हणे.

'म्हजी बस’ला रविवारचे काय वावडे?

जनसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी सुरू केलेल्या ‘कदंब’च्या सेवेला सध्या घरघर लागली आहे. त्यातच भर म्हणून महाराष्ट्रातील ‘आपली बस’ या धर्तीवर ‘म्हजी बस’ ही योजना खासगी मिनी बसवाल्यांना काही सोयी सवलती देऊन सुरू केली. ही सेवा सुरू होण्यापूर्वी हे मिनी बसवाले रविवारी, सुट्टीच्या दिवसांत नियमित मार्गावर बसेस चालवत नव्हते. आता ‘कदंब’ने काही सोयी सवलती देऊन मिनी बसगाड्या चालू केल्या. मात्र, रविवारी व सुट्टीच्या दिवसांत त्या मार्गावरून चालत नाहीत. त्यामुळे करदात्या सामान्य नागरिकांना एकेक तास बस थांब्यावर ‘म्हजी बस’ येणार म्हणून वाट पाहात पावसात कुडकुडत अन् ताटकळत रहावे लागते. रविवारी व सुट्टीच्या दिवसांत या बसगाड्या का बंद असतात, याची विचारणा सरकार का करीत नाही? जनतेच्या करातून चालणारी ‘म्हजी बस’ सेवा रविवारी बंद का? असा सवाल सामान्य नागरिक करीत आहेत.

गोसेवा ही ईश्वरसेवा..!

भारतीय संस्कृतीत गोवंशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाय अर्थातच ‘गोमाते’च्या पोटात ३३ कोटी देव असल्याची समाजामध्ये एक भावना आहे. त्यामुळे गोसेवा म्हणजे ईश्वरसेवा अशी एक धारणा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गोवंशाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राज्यात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या गुरांच्या पालनपोषणाकडे खुद्द मालकही दुर्लक्ष करीत आहेत. अशावेळी गोशाळा या मुक्या जनावरांसाठी आश्रयस्थान ठरत आहेत. गोमंतक गौसेवक महासंघ संचालित सिकेरी-मये येथील गोशाळा राज्यातील एक आदर्श गोशाळा म्हणून नावारूपास आली आहे. या गोशाळेत हजारो मोकाट गुरांची देखभाल होत आहे. मात्र, आता याच गोशाळेला स्थानिकांचा विरोध होऊ लागला आहे. मये पंचायतीच्या ग्रामसभेत हा विषयही गाजला. या गोशाळेपासून प्रदूषण होत आहे असा स्थानिकांचा दावा आहे, तर गोशाळेतील गुरांचे मलमूत्र आणि शेणापासून ऑरगॅनिक खतनिर्मिती करण्यात येते. शेणापासून गोबरगॅसही तयार होतो. गोशाळेतील गुरांपासून कोणालाही प्रदूषणाचा त्रास होत नाही आणि होणार नाही. त्यावर कटाक्षाने नजर ठेवण्यात येते. असा गोशाळा संचालकांचा दावा आहे. तरीसुद्धा गोशाळेला होणारा विरोध ही चिंताजनक बाब आहे. गोशाळेला विरोध कितपत योग्य आहे. त्याचा प्रत्येकाने विचार करून उलट गोसेवेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

कॅप्टनची अशीही प्रशंसा

यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून लोकसभेत पोचलेले इंडिया आघाडीचे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पहिल्याच लोकसभा अधिवेशनात गोव्यातील अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे समाज माध्यमांवरून त्यांची प्रशंसा केली जात आहे, तर दुसरीकडे माजी खासदार सार्दिन यांना लक्ष्य केले जात आहे. खरे तर दोघेही काँग्रेसचेच, पण मुद्दाम हे केले जात असल्याचे सार्दिन समर्थक म्हणतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सत्ताधारी पक्षात असलेल्या खासदाराला विशेष काही करता येत नाही. त्यांच्या शेवटच्या कार्यकाळातच ते विरोधी पक्षात होते असे सांगून ते त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न करतात, पण त्या काळात अनेक मुद्दे असतानाही ते उपस्थित न करण्याबाबत काहीही म्हणत नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे सार्दिन यांची बाजू आणखी लंगडी पडते हे मात्र खरे. या एकंदर घडामोडीत भाजपवाले मात्र मनातल्या मनांत हसत आहेत.

कला अकादमीच्या समस्या

कला अकादमी निकृष्ट दर्जाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे अलीकडे चांगलीच चर्चेत राहिली आहे. मुख्य सभागृहाच्या रंगमंचावर सध्या अजूनही समस्या कायम आहेत. तरीही कार्यक्रम येथे होत आहेत आणि रसिकही येत आहेत. २१ तारखेला रविवारी तियात्र सादर झाले. यावेळी रंगमंचावर येणाऱ्या अडचणींनी आपली हजेरी लावली. रंगमंचाचा पडदा अर्ध्यावर येऊन तो तसाच राहिला. तो खालीपण येत नव्हता आणि वरही जात नव्हता, तरी अर्ध्यावर आलेला पडदा तसाच राहिला. तरीही तियात्र सादरीकरण पूर्ण झाले. काही आठवड्यांपूर्वी राजदीप नाईक यांनाही नाटक सादर करताना आलेला अनुभव कथन केल्यानंतर राज्यभर गोंधळ झाला. त्यातूनच कला राखण मंचची स्थापना झाली. एवढे सर्व रामायण-महाभारत घडत आहे, तरीही अकादमीच्या मागे लागलेल्या समस्या सुटण्यासाठी किती प्रयत्न होतात, हे काही कळत नाही.

सरकारी शाळा बंद का पडतात?

सरकारी शाळा बंद का पडतात असा प्रश्र्न कुणालाही पडणे स्वाभाविकच आहे. याची अनेक कारणे असू शकतात, पण राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे साहेबांनी जे कारण सांगितले ते ऐकून थक्क व्हाल. ते म्हणतात, सरकारी शाळांमधील शिक्षक आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवतात. त्यामुळे सर्वसाधारण लोकांचा असा समज होतो की जर शिक्षिकाच आपल्या मुलांना दुसरीकडे पाठवतात, तर सरकारी शाळांचा दर्जा योग्य नाही. मग सरकारी शाळांमधील साधनसुविधांचे काय? ते सुधारायला नको का? सरकार तानावडे साहेबांच्याच पक्षाचे आहे. त्यांनी सरकारी शाळांमधील साधनसुविधा वाढविण्यासाठी व शिक्षकांना आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत पाठविण्यापासून रोखण्यासाठी का प्रयत्न करू नयेत, अशी चर्चा नागरिक करू लागले आहेत.

रणजी संघ प्रशिक्षकपदासाठी भाजप ‘कनेक्शन’

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांची गोव्याच्या रणजी क्रिकेट संघ प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. आपण स्थानिक, तसेच अनुभवी आणि यशस्वी प्रशिक्षक असूनही गोवा क्रिकेट संघटनेकडे अर्ज करूनही मुलाखतीसाठी न बोलावल्याबद्दल हेमंत आंगले यांनी संघटनेकडे लेखी नाराजी व्यक्त केली आहे. मोंगिया यांच्या निवडीमागे भाजप ‘कनेक्शन’ असल्याचेही काही जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदाचा विशेष अनुभव नसतानाही त्यांना प्राधान्य देण्यात आले. दोन वर्षांपूर्वी पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंडीगडच्या दिनेश मोंगिया यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता व त्या पक्षातर्फे ते राजकीय मैदानावर सक्रिय आहेत. गोव्यात भाजपचे सरकार आहे. गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव रोहन गावस देसाई हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या खास मर्जीतील असून रोहन गोवा भाजप युवा मोर्चाचे क्रियाशील पदाधिकारी आहेत.

सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधक वरचढ!

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला दोन आठवडे झाले आहेत. विरोधकांची संख्या कमी असली तरी ते सत्ताधाऱ्यांना पुरून उरत आहेत. प्रत्येक प्रश्‍नावेळी ते संबंधित मंत्र्याला घेरत आहेत. त्यामुळे हे अधिवेशन बरेच गाजत आहे. काहीवेळा सत्ताधारी व विरोधकांमधील खडाजंगी चांगलीच रंगत आहे. विरोधकांमध्ये आमदार विजय सरदेसाई हे पूर्णपणे अभ्यास करून येत असल्यानेच मंत्र्यांना उत्तरे देतानाही अडथळा येत आहे. आरोग्य व पर्यटन या दोन खात्यांच्या प्रश्‍नावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. आमदार सरदेसाई यांच्यासारखे काँग्रेसचे आमदार कार्लोस फेरेरा हे अभ्यासपूर्ण विषय मांडतात. विरोधकांमध्ये आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस व आरजीचे आमदार विरेश बोरकर हेसुद्धा चांगलीच चढाई करतात. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हेही चांगलेच तयार झाले आहेत. सत्ताधाऱ्यांना शब्दांनी ठोशास ठोसा देण्यास ते घाबरत नाहीत. एका चर्चेवेळी वाहतूकमंत्र्यांना इतरांबद्दल किती प्रेम (मोग) आहे हे लवकरच कळेल असा टोमणा हाणला होता, तेव्हा विधानसभा सभागृहात चांगलीच खसखस पिकली होती.

गुरुपौर्णिमेसाठी अनुदान!

गुरुपौर्णिमा ही शिष्यवर्ग व्यासपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरूंच्या आदरार्थ साजरी करतात, ही परंपरा आहे. पूर्वी गुरूच्या घरी जमून शिष्य गुरुपौर्णिमा घरगुती वातावरणात साजरी करायचे, पण आता सभागृहांत गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे आणि त्याला कला व संस्कृती संचालनालय गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी अनुदान देते याबद्दल सध्या चर्चा रंगू लागली आहे. कारण गोव्यात अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमा होतात, मग त्यांनाही असे अनुदान संस्कृती खाते देणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

SCROLL FOR NEXT