पणजी: कोलवाळ कारागृहातील दवाखान्यात कैदी राजू दास याने सॅनिटायझर पिऊन तसेच अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्याची चौकशी न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. या चौकशीच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल. गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत असलेल्या या कैद्याची प्रकृती सुधारत असून ती धोक्याबाहेर आहे. लवकरच त्याला इस्पितळातून कारागृहात पाठवले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती कारागृह महानिरीक्षक ओमविर सिंग बिष्णोई यांनी दिली.
कोलवाळ पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा नोंद केला होता व त्यानंतर त्याची न्यायदंडाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत कारागृहातील त्याचे साथीदार कैदी तसेच अधिकारी तसेच दवाखान्यातील डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या आहेत. त्याची कारागृहात तेथील तुरुंग अधिकाऱ्यांकडून होत असलेली सतावणूक या कथित आरोपाबाबतही चौकशी करण्यात येत आहे. त्याने सॅनिटाझयर ओतून स्वतःला पेटवून घेतल्याने तो सुमारे ५० टक्के होरपळला होता. आगीत त्याचे तोंड, छाती व पोट भाजले होते, त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर बनली होती. या घटनेची चौकशी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली होती.
कैदी राजू दास याला तेथील दवाखान्यातील काम दिले होते. त्यामुळे तो नाराज होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन ढळले होते. दवाखान्यात कैद्यांची तपासणी सुरू होती, त्यावेळी कैद्यांची नजर चुकवून तो सॅनिटायझर घेऊन खोलीत गेला आणि आतून दार बंद करून सॅनिटायझर ओतून पेटवून घेतले.
कैदी राजू दास याने आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा तेथे असलेल्या कैद्यांनी जेलरला माहिती दिली. जेलरने ती तुरुंग अधीक्षकांना दिली. मात्र त्यांना येण्यास बराच उशीर झाला. आल्यानंतर या कैद्याला खोलीतून बाहेर काढण्याऐवजी अधिकाऱ्यांनी उपस्थित कैद्यांकडे चौकशी केली. दवाखान्यात येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी नोंदवही ठेवलेली असते. अधिकाऱ्यांना झालेला उशीर नोंद होऊ नये म्हणून ही नोंदवहीच गायब करण्यात आली होती. त्याला वेळीच इस्पितळात हलवण्याबाबतही हलगर्जीपणा झाला होता. यासंदर्भातही न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.