Chapora River Faces Threat from Extensive Sand Mining
मोरजी: गोव्यात सर्वत्र वाळू उपशाला कडक निर्बंध असताना सर्व नियम ध्याब्यावर बसवून आगरवाडा येथील ‘सी स्कॅप वॉटर फ्रंट’ च्या जवळ शापोरा नदीत रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत आहे, याबाबत प्रशासनाची डोळेझाक होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर या बेकायदा रेती उपसा करणाऱ्या रेती माफियांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बुधवार,१६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास शापोरा नदीत रेती उपसा चालू होता,असे प्रत्यक्षदर्शींनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सरकारने गोव्यात नदीत वाळू उपसा करण्यावर बंदी घातली असली तरी पेडणे तालुक्यात ठीकठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादाने रेती उपसण्याचे प्रकार घडत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रेती उपशावर नजर ठेवण्यासाठी किनारी पोलिस स्थानकांची निर्मिती केली आहे.
शापोरा नदीत गस्त घालण्यासाठी शिवोली किनारी पोलिस ठाणे निर्माण केले आहे. त्याठिकाणी स्वतंत्र पोलिस निरीक्षकही नियुक्त करून आवश्यक पोलिस कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांच्या वेतनावर सरकारी तिजोरीतून पैसा खर्च होतोच, शिवाय नदीत गस्त घालण्यासाठी लाखो रुपये खर्चून बोटींची व्यवस्थही सरकारने केली आहे,मात्र असे असूनसुद्धा बोटी नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करुन पोलिसांकडून रेती माफियावर कारवाई करणे टाळले जाते. पोलिसांचे लागेबांधे या रेती माफिया बरोबर असतात, अर्थपूर्ण व्यवहारातून हे सर्व व्यवहार सुरळीतपणे होत असतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे
चोपडे शापोरा नदीत रात्रीच्या वेळात मोठ्या प्रमाणात बेकायदा रेती उपसा सुरू आहे.या प्रकारामुळे पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो,सरकारने बेकायदा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी.अमोल राऊत, आगरवाडा माजी सरपंच
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.