Goa Transport Department Problems
पणजी: गोव्यात अपघातांची मालिका वाढत असून आपले राज्य ‘खुनी राज्य’ म्हणून गणले जात असतानाच वाहतूक खात्याला कित्येक वर्षे पूर्णवेळ संचालक नाही, हे सांगितले तर आश्चर्य वाटेल. हे कमी की काय, म्हणून वाहतूक खात्याचा अतिरिक्त ताबा सांभाळणारे आयएएस अधिकारी तर कित्येक दिवस रजेवर असून, त्यांनी आपल्या पदाचा ताबा अन्य कुणाकडे दिलेला नाही.
आयएएस परिमल अभिषेक हे ५ सप्टेंबरपासून रजेवर असून, ते राज्याबाहेर आहेत. ते ‘जीएसआयडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. शिवाय पर्यटन व वाहतूक खात्याचा अतिरिक्त ताबाही त्यांच्याकडे आहे.
अभिषेक यांच्या अनुपस्थितीत उपसंचालक सुनील अंचिपका यांनी पदाचा ताबा घ्यायला हवा; परंतु ते कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाहीत आणि स्वत: कोणत्याही फाईलवर सही करणार नाही, असा त्यांनी पवित्रा घेतला आहे. ‘आम्ही फाईल घेऊन त्यांच्याकडे जातो; परंतु ते बेफिकिरीने आम्हाला परत पाठवतात’, अशी माहिती एका वाहतूक अधिकाऱ्याने या प्रतिनिधीला दिली. वाहतूक संचालक पदाचा अतिरिक्त ताबा असतानाही आम्हाला परिमल अभिषेक यांना भेटायला ‘जीएसआयडीसी’मध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यात आमचे कित्येक तास वाया जातात, असे हा अधिकारी म्हणाला.
वाहतूक खाते कार्यक्षमतेने चालवायचे असल्यास खात्याला पूर्णवेळ संचालक हवा आहे. पूर्णवेळ संचालक नसल्याने आम्हाला कोणत्याही सुरक्षाविषयक मोहिमा राबविता येत नाहीत. दैनंदिन कामांसाठीच संचालक उपलब्ध नसतात, अशी माहिती देण्यात आली.
सुनील अंचिपका हे लिंक ऑफिसर आहेत; परंतु त्यांचे दैनंदिन कामांनाही असहकार्य असते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ज्या महत्त्वाच्या खात्याला पूर्णवेळ संचालक नाही, त्या खात्याकडून खरोखर रस्ता सुरक्षेची कशी अपेक्षा करता येईल, असा सवालही हे अधिकारी करतात. शिस्तबद्ध गोमंतकीय अधिकारीच या खात्याला योग्य न्याय देऊ शकतात, असेही ते म्हणाले.
१) पोलिस दलाने यावर्षी अपघातांचे प्रमाण ५ टक्के व पुढील वर्षी ते १० टक्क्यांनी कमी करण्यासाठी मोहीम राबवायची ठरविली आहे. त्यात वाहतूक खात्याचा सहभाग का नको?
२) यंदा ६,५०० जणांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले आहेत. वाहतूक खाते याबाबत अनभिज्ञ आहे.
३) यंदा अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी असली तरी अपघातांची कारणे व ते टाळण्याचे उपाय, सामाजिक जागृती करण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही.
४) अपघातांची काही कारणे असलेल्या वेगवान, बेदरकार ड्रायव्हिंग, मद्यसेवन व मोबाईल वापरण्याच्या प्रकाराविरोधातही खात्याला जनजागृती करण्यात अपयश आले आहे.
५) पोलिसांसोबतही समन्वय, बैठकांचा अभाव आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.