कळंगुट: सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्यात आलेल्या हैद्राबादच्या एका 23 वर्षीय तरुणाचा कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर बुडून दुर्देवी मृत्यू झाला. शेख परवेझ असे या तरुणाचे नाव असून तो हैद्राबादमधील अमीर पेठ येथील रहिवासी होता. या घटनेमुळे परवेझच्या परिवाराला मोठा धक्का बसला. रविवारी संध्याकाळी (16 नोव्हेंबर) ही हृदयद्रावक घटना घडली. परवेझ हा त्याच्या पाच मित्रांसोबत कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असताना समुद्राच्या जोरदार प्रवाहामुळे तो अचानक पाण्यात वाहून गेला.
दरम्यान, परवेझ वाहून जात असल्याचे पाहून त्याचा मित्र मोहम्मद इब्राहिम याने त्याला वाचवण्यासाठी कोणताही विचार न करता धाडसी प्रयत्न केला. त्याने परवेझच्या दिशेने धाव घेतली, मात्र प्रवाहाचा वेग इतका जास्त होता की, परवेझला वाचवताना इब्राहिम स्वतःच बुडू लागला. त्याचवेळी, ही घटना लक्षात येताच समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांनी तातडीने बचावकार्य सुरु केले. जीवरक्षकांनी मोहम्मद इब्राहिमला समुद्रातून सुखरुप बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचवले. इब्राहिमला वाचवण्यात यश आले. त्याला पुढील उपचारांसाठी कांदोळीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र, शेख परवेझ वाचू शकला नाही.
या घटनेची माहिती मिळताच कलंगुट (Calangute) पोलीस, किनारपट्टी पोलीस आणि जीवरक्षकांनी परवेझचा शोध घेण्यासाठी तात्काळ आणि युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरु केले. समुद्राच्या प्रवाहामुळे परवेझ बागा समुद्रकिनाऱ्याजवळील टिटोज लेनच्या दिशेने वाहून गेला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या शोध मोहीम याच भागात अधिक तीव्र करण्यात आली आहे. मात्र समुद्राच्या प्रवाहाची गती जास्त असल्याने परवेझला शोधण्यात अडथळे येत आहेत. पोलीस आणि बचाव पथक परवेझचा शोध घेण्याचा अथक प्रयत्न करत आहेत.
शेख परवेझ हा त्याच्या मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आला होता. परवेझसोबत सोमेश, सय्यद सोहेल, अखिल पाशा, शेख इस्माईल झबी आणि मोहम्मद इब्राहिम होते. मात्र सुट्ट्यांच्या आनंदावर विरजण पडल्यामुळे या घटनेने परवेझच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी परवेझच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून पुढील प्रक्रिया सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.