मडगाव : येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार ही गोव्यातील पर्यटनवृद्धीसाठी चांगली गोष्ट मानली जात असली तरी हा विमानतळ दक्षिण गोव्यातील हॉटेल्स उद्योजकांसाठी मारक ठरण्याची भीतीही व्यक्त केली जात. मोपा विमानतळापासून दक्षिण गोव्यात येण्यासाठी जे अंतर आहे तेच या उद्योगांना मारक ठरण्याची शक्यता आहे.(Hotels in Goa, Mopa Airport News)
मोपाहून दक्षिण गोव्यात टॅक्सीने येण्यासाठी किमान तीन ते साडे तीन हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे. त्यातच गोव्यातील टॅक्सीचालक डिजिटल मीटरचा वापर करत नाहीत. अशावेळी पर्यटकांना अधिक भुर्दंड बसण्याची भीती असून तसे झाल्यास पर्यटक दक्षिण गोव्याकडे पाठ फिरवू शकतात अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली.
अखिल गोवा लहान आणि मध्यम हॉटेल्स मालक संघटनेचे अध्यक्ष सेराफीन कोता यांच्यामते मोपा विमानतळ सुरू होऊन दाबोळी विमानतळ बंद झाल्यास दक्षिण गोव्यातील हॉटेल्सवर निश्चितच संक्रांत येणार. याचे कारण सांगताना ते म्हणाले, गोव्यातील पर्यटन उद्योग हा चार्टर पर्यटकांवर अवलंबून असतो आणि हे पर्यटक ४५ ते ५० मिनिटात जे हॉटेल मिळते तिथेच राहणे पसंत करतात. दाबोळी विमानतळावर ही चार्टर विमाने उतरत होती त्यावेळीही काणकोण येथील ''ललित'' हॉटेल दूर पडत असल्यामुळे ते तिथे जात नव्हते. मोपा विमानतळ सुरू झाल्यास हे पर्यटक दक्षिण गोव्यात येणे कठीणच असेल. दक्षिण गोव्यात लहान मोठी अशी शंभरच्यावर हॉटेल्स असल्याची माहिती त्यांनी दिली.
दुसरीकडे गोवा ट्रॅव्हल्स ॲण्ड टुरिझमचे (टीटीएजी) अध्यक्ष नीलेश शहा यांनी हा मुद्दा खोडून काढताना, दक्षिण गोव्यात जी हॉटेल्स आहेत ती चांगल्या दर्जाची असल्याने आंतरराष्ट्रीय पर्यटक याच हॉटेल्सना पसंती देतील असे सांगतानाच या हॉटेल्सशी वाहतुकीची कनेक्टिव्हिटी चांगली असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जुवारी पूल पूर्ण झाल्यावर ही कनेक्टिव्हिटी आपोआप सुधारेल. परंतु पर्यटकांना टॅक्सीवर विसंबून न ठेवता प्रत्येक हॉटेलवर जाण्यासाठी बसची सोय करावी लागेल. आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी याबाबत बोललो आहोत. हा प्रवास कमी खर्चात असण्याची गरज आहे. अंतर्गत प्रवासावर पर्यटकांना जास्त खर्च करावा लागला तर पर्यटक गोव्यात येणार नाहीत असे शहा म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.