IFFI 2024 Goa Master Class and In Conversation Women Safety and Cinema
यंदाच्या इफ्फीतील ‘मास्टर क्लास अँड इन कन्व्हर्सेशन'' सत्रांमधील पहिले सत्र ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ (महिला सुरक्षितता आणि सिनेमा) या विषयावरचे होते. अभिनेत्री, निर्माती आणि राजकारणी खुशबू, अभिनेत्री-निर्माती सुहासिनी मणीरत्नम, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक इम्तियाज अली आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर अशा सिनेमा उद्योगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा सहभाग या सत्रात होता.
वाणी त्रिपाठी टिकू या सत्राच्या समन्वयक होत्या. महोत्सवाचा दुसरा दिवस आणि सकाळची वेळ असली तरी या विषयावरील त्यांचे विचार ऐकण्यासाठी कला अकादमीचे सभागृह सुमारे ८० टक्के भरले होते.
अलीकडील काळात मल्याळम सिनेमा उद्योग ज्या प्रकारे ‘सेक्स स्कँडल’ प्रकरणाने गाजत आहे किंवा बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षात लैंगिक शोषणाविरुद्ध ज्याप्रकारे ‘मी टू’ चळवळीने जोर पकडला होता त्यातून ‘महिला सुरक्षा आणि सिनेमा’ या विषयावरील या सत्रात सखोलपणे चर्चा होईल अशी अपेक्षा होती.
परंतु तशा अपेक्षांचे सोडूनच द्या, वरील दोन्ही प्रकरणांचा साधा उल्लेख देखील या चर्चासत्रात झाला नाही. उलट काही बारीकसारीक प्रकरणांचा अपवाद सोडता सिनेमा उद्योग महिलांसाठी कसा सुरक्षित आहे याचा दाखला देण्यातच प्रत्येकाचा वेळ गेला.महिलांचा फायदा घेण्याची प्रवृत्ती जशी इतरत्र आहे तशीच ती काही प्रमाणात सिनेमा उद्योगातही आहे असाच काहीसा सारांश या सत्रातून काढला गेला असे म्हणण्यास हरकत नसावी.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पिचवर या सत्रात भाग घेतलेल्या साऱ्याच वक्त्यांनी एकंदरीत ‘सेफ बॅटिंग’ करून सिनेमा उद्योगात महिला सुरक्षित आहेत याची ग्वाही दिली. या सत्रातील भूमी पेडणेकर हिचे एक वाक्य मार्मिक होते, ती म्हणाली, तिथे पॉवर प्ले आहे, पण वातावरण सुरक्षित आहे.''
एकंदरीत आपल्या घरातील सुरक्षित वातावरणच आपल्याला जबाबदार माणूस बनवते असेच या सत्रातील साऱ्यांचे म्हणणे होते. अजूनही सिनेमा उद्योगातील वातावरण सुरक्षित आहे व महिलांच्या बाबतीत मूलभूत शिष्टाचार पाळला जात आहे असा या सत्राचा सूर राहिला. मात्र महिलांसंबंधी आगळिकीच्या ज्या अपवादात्मक घटना सेटवर घडतात, त्या प्रकारांना कुठल्याही प्रकारे थारा देता कामा नये याबाबतीत या सत्रात सर्वांचे एकमत होते.
सिनेमा उद्योगाला आपण दोष देऊन उपयोगाचे नाही. वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून सिनेमा बनतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, असे खुशबू सुंदर म्हणाल्या. हे सांगताना त्यांनी हे देखील मान्य केले की त्या आता दोन मुलींच्या आई आहेत व त्यामुळे त्यांना जबाबदारीने सिनेमात काम करावे लागते. ज्या प्रकारे त्यांनी आपल्या सुरवातीच्या चित्रपटांत भूमिका केल्या, त्या प्रकारे जर त्यांनी आता काम केले तर तिच्या मुली त्यांना निश्चितच जाब विचारतील, असेही त्या म्हणाल्या.
महिलांचा सन्मान करण्याचे शिक्षण द्यायला घरातूनच सुरवात व्हायला हवी. माझ्या घरात माझ्या आईने माझे भाऊ आणि मी यात फरक केला नाही. त्यानंतरही सिनेमा क्षेत्रात काम करताना महिलांना सन्मान देणाऱ्यांमध्ये मी वावरले हे माझे भाग्य आहे.
खुशबू सुंदर, अभिनेत्री/राजकारणी
माझ्या घरात लैंगिक भेदभाव कधीच नव्हता. माझ्या भोवतीचे जग मी आधी पाहिले व नंतर सिनेमा. अर्थात या दोन्हीमधली माणसे वेगळी होती. तरी देखील माझ्या सेटवर माझे तंत्रज्ञ नेहमीच स्त्रियांचा सन्मान करत आले आहेत व त्यांना सुरक्षिततेची भावना दिली आहे.
इम्तियाज अली, सिनेदिग्दर्शक
माझे कुटुंब गोमंतकीय असल्यामुळे मला लहानपणी देखील कुटुंबात एक प्रकारचे स्वातंत्र्य होते. त्यामुळे एक वेगळे जग असते याची कल्पना मला नंतर आली. सेटवरील वातावरण सुरक्षित असते परंतु सेटवरून बाहेर निघाल्यावर मात्र वेगळेच वातावरण असते.
भूमी पेडणेकर, अभिनेत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.