पद्माकर केळकर
सत्तरी तालुका शेती, बागायतींचे अधिस्थान बनलेला आहे. केळी, नारळ, सुपारी, मिरी, जायफळ, काजू, फणस, आंबा, भात, ऊस अशा विविध पिकांनी सत्तरी तालुक्यात बहर नेहमीच धरलेला दिसून येतो.
पण आता या मुख्य पिकांबरोबरच येथील लोक जोडव्यवसायाशीही जोडले जात आहेत. असाच एक प्रयोग म्हणून शेती, बागायतीला बळकटी व चालना देण्यासाठी मधमाशी पालन काही शेतकरी वर्ग करीत आहेत.
गोवा सरकारच्या कृषी विभागाच्या ‘आत्मा’ प्रकल्पाअंतर्गत सत्तरीत मधपेट्या वितरित केलेल्या आहेत. त्यामुळे सत्तरीत मधमाशी पालनाला चालना मिळत आहे. केवळ मध उत्पादन असे न पाहाता त्यातून परागी भवनाला होणारा फायदा लाखमोलाचा ठरणारा आहे.
मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे. शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करू शकतात.
मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून सत्तरीत उदयास येत आहे. सत्तरी तालुक्यातील नैसर्गिक वातावरण हे मधमाशी पालन करण्यासाठी प्रोत्साहित करणारे आहे.
यामुळे येणाऱ्या काळात सत्तरी तालुक्यात मधमाशी पालन व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्धार वाळपई विभागीय कृषी कार्यालयाने केलेला आहे.
मधमाशा फुलोरा येणाऱ्या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सूर्यफूल, आंबा, काजू, सुपारी, नारळ, जांभूळ, पेरू, औषधी झाडे यातून आरोग्यदायी मध मिळतो. मध हे एक रुचकर आणि अत्यंत पोषक अन्न आहे.
मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे मधमाशांचे पेट्यांमधे संगोपन करून आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते. वैयक्तिक पातळीवर सध्या सत्तरीत घरी मधमाशी पालन केले जात आहे. मधाच्या सेवनाने मानवाचे आरोग्य उत्तम राहते. रक्तदाब, लठ्ठपणा आदी रोगांमध्ये मधाचा फायदा होतो.
आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने
मधमाशी पालन करण्यासाठी येणाऱ्या अडचणींसंदर्भात उपाययोजना व समस्यांसंदर्भात मार्गदर्शनासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाते. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मधमाशी पालन करण्याचे तंत्र विकसित झालेले आहे. मध आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची दोन उत्पादने आहेत.
पर्यावरणावर सकारात्मक परिणाम
कृषी खात्याने ‘आत्मा’ प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू केलेला उपक्रम अतिशय सुरेखच म्हणावा लागेल. मधमाशी पालनासाठी वेळ, रुपये आणि पायाभूत गुंतवणुकीची आवश्यकता असते.
मध आणि माशांनी तयार केलेले मेण शेतीच्या दृष्टीने फारशा मूल्यवान नसलेल्या जागेतून उत्पादित करता येते. मधमाशा स्रोतांसाठी कोणत्याही अन्य शेती उद्योगासोबत स्पर्धा करीत नाहीत. मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होणारे आहेत.
सत्तरीत ‘आत्मा’अंतर्गत या व्यवसायाला चालना देण्यात आली आहे. खादी ग्रामोद्योगच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जातो. सत्तरीतील जंगलात विविध औषधीयुक्त झाडे आहेत.
अशांमधून मधमाशांच्या साहाय्याने औषधी मध पेटीत साठविण्यास वाव मिळाला आहे. अशा मधाचा उपयोग ‘जेली’ म्हणून करून लहान पेप्सीप्रमाणे स्टिप्स करून बंद पॅकेटमधून पर्यटकांना विक्रीची संधी आहे.
- विश्वनाथ गावस, वाळपई विभागीय कृषी अधिकारी
सत्तरीत आत्मा विभागामार्फत शेतकरी वर्गाला मधपेट्या वितरित केल्या आहेत. मधपेटी हाताळण्याविषयी लोकांना आम्ही प्रशिक्षण देऊन नंतर इच्छुकांना मधपेटी देतो.
मधपेटी ही काळजीपूर्वक हाताळावी लागते. ऊन, पाऊस, वारा, मुंग्या, वाळवी यांपासून संरक्षण द्यावे लागते. अत्यंत सुरक्षित जागी मधपेटी ठेवायची असते व दर आठ-दहा दिवसांनी तिचे निरीक्षण करावे लागते.
- रमेश गावकर, वाळपई कृषी ‘आत्मा’ विभाग सहकारी
लोकांना सहा हजारांची पेटी सरकारी योजनेच्या माध्यमातून अगदी सहाशे रुपयांतच दिली जाते आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो आहे. त्याद्वारे शेती उत्पन्न वाढण्यास संधी मिळणारी आहे.
- किशोर भावे, कृषी ‘आत्मा’ विभागाचे प्रकल्प संचालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.