मोरजी: धारगळ येथे कॅसिनो उभारणीसाठी डेल्टा कॉर्प कंपनीच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर कापून पर्यावरणाची हानी केली जात आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून हे काम बंद करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. धारगळ येथील नियोजित कॅसिनोच्या जागेस त्यांनी आज भेट दिली.
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने या प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. डेल्टा कॉर्प कंपनीकडून मागील वर्षभरापासून डोंगर कापणी सुरू आहे. यापूर्वी धारगळचे पंच अनिकेत साळगावकर यांनी हे काम बंद पाडले होते.
त्यानंतर पुन्हा या ठिकाणी डोंगर कापणी सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांत तक्रार नोंदविली.
दीड तासानंतर पोलिस घटनास्थळी आले आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे कागदपत्रांची मागणी केली. यावेळी पेडणे काँग्रेस गट अध्यक्ष कृष्णा नाईक, युवा नेते ॲड. जितेंद्र गावकर उपस्थित होते.
या ठिकाणी कोणत्या प्रकारचे काम सुरू आहे, त्याची माहिती देणारा फलक नाही. येथे डोंगर कापून जमिनीचे सपाटीकरण सुरू आहे.
एकीकडे किनारी भागातील गावांमध्ये जमीन रूपांतरित करून परप्रांतीय बिल्डरांची मर्जी राखली जात आहे, तर अंतर्गत भागांत कॅसिनो सिटीसारखे प्रकल्प आणून गोमंतकीयांना देशोधडीला लावण्याची योजना भाजप आखत आहे. एवढे करूनही पेडणेकरांचा भाजपला पाठिंबा कसा काय मिळतो, याचे आश्चर्य वाटते, असे पाटकर म्हणाले.
बार्देश तालुक्यातील पैठण, साल्वादोर द मुंद येथील डोंगर कापणीची आज पाहणी करण्यात आली. १८ ऑगस्टच्या ग्रामसभेत हा मुद्दा गाजला होता. नगरनियोजन खाते, बार्देशचे मामलेदार, गट विकास अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही पाहणी केली आहे. या पाहणीच्या आधारे अहवाल तयार करून तो पुढील कारवाईसाठी सादर केला जाणार आहे.
धारगळ येथे डेल्टा कॉर्प या कंपनीने गॅम्बलिंग झोन उभारण्यासाठी जमीन रूपांतर करण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री आणि नगर नियोजन मंत्र्यांच्या आशीर्वादाने कॅसिनोची ही भेट भाजपने दिली आहे.अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.