IISF: ‘युवकांनी नावीन्यपूर्ण स्टार्ट-ॲप्सद्वारे भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था (Economy) बनवण्यासाठी नेतृत्व करावे. येत्या काही वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती भारताला जगातील आघाडीचा देश बनण्यासाठी चालना देईल’, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि भूविज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. कांपाल परेड मैदानावर सातव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे (India International Science Festival) उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष आणि बंदरे आणि जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भाटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उपस्थित होते.
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव मालिका देशाचा शाश्वत विकास आणि नवीन तंत्रज्ञान विषयक कल्पनांसाठी वैज्ञानिक रुची विस्तारण्याच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचा अविभाज्य भाग आहे. विज्ञान हा केवळ संशोधनाचा विषय राहिला नसून त्याने उत्सवाचे रूप धारण केले आहे. तरुणांना विश्लेषणात्मक विचार करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी देशातील प्रत्येक शहरात आणि गावात विज्ञान महोत्सव साजरा करण्याची गरज आहे, असे सिंह म्हणाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी महोत्सवाच्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी केले.
महोत्सवाची ठळक वैशिष्ट्ये :
इस्त्रो स्पेसऑन व्हील्स
गगनयान मॉडेल
पूर्णतः भारतीय बनावटीचा नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स यांचा सर्वात मोठा रेडिओ टेलेस्कोप
सर्वांसाठी मोफत रात्रीचे अवकाश निरीक्षण
आयुष मंत्रालयातर्फे योगाची थेट सत्रे
पारंपरीक कारागिरी आणि कारागिरांचा मेळावा
जैवतंत्रज्ञानातील उद्दिष्टपूर्ती, आगेकूच आणि कोविड -१ ९ लसीची कथा
सीएसआयआर यांनी देशी बनावटीने तयार केलेली रॅपिड कोविड चाचणीची प्रात्यक्षिके
आयसीएमआर, आयसीएआर, एनएमपीबी, डीएसटी, डीआरडीओ, डीएई, सीएसआय एमओईएस, डीबीटी आणि अन्य अनेकांनी विज्ञानात ७५ वर्षांत दिलेले योगदान
दक्षिण महासागर, अंटार्क्टिका आणि पाण्याखालील मोहिमा यांचा अनुभव देणारा व्हीआर शो
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर विज्ञान क्षेत्राद्वारे देशाच्या विकासात योगदान दिलेल्या वैज्ञानिकांचे जीवन दर्शन
महोत्सवात काय आहे?
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव हा विज्ञान महोत्सवाचा भाग म्हणून साजरा केला जातो. महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले आणि पुरस्कारप्राप्त देशी-विदेशी चित्रपट दाखवले जातात. विज्ञान साहित्य महोत्सव आणि इतर कार्यक्रम वैज्ञानिक वसाहतवादाच्या विरोधात भारतीयांना जागृत करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व भारतातील वैज्ञानिक आणि तत्सम साहित्याच्या भूमिकेवर महोत्सवात भर देण्यात येणार आहे. शिवाय सायन्स व्हिलेज, पारंपरिक हस्तकला आणि कारागीर संमेलन, खेळ आणि खेळणी, ग्लोबल इंडियन सायन्टिस्ट आणि टेक्नोक्रॅट्स फेस्ट, इको फेस्ट, आधुनिक तंत्रज्ञान, मेगा विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन असे विभागही यात महोत्सवात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.