Goa Monsoon 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon:...गोमंतकीयांच्या काळजात पुन्‍हा धस्‍स! झाडे पडली, मांडव कोसळला, घरांमध्ये पाणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2024

पणजी: राज्‍यात ऐन गणेश चतुर्थीच्‍या तोंडावर पावसाने जोर धरल्‍यामुळे समस्‍त गोमंतकीयांमध्‍ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सत्तरीसह डिचोली तालुक्‍याला तर आज सोमवारी पावसाने झोडपून काढले.

वाळपई बाजारपेठेत व होंडा येथे बँका, घरे, मंदिरांमध्‍ये पाणी घुसले. तसेच वाळवंटी नदीला पूर आल्‍याने साखळी, डिचोलीतील लोकांच्‍या काळजात पुन्‍हा धस्‍स झाले. झाड उन्‍मळून पडल्‍याने बाराजण-सत्तरी रस्‍ता वाहतुकीसाठी बंद झाला. केपेत गणेशोत्‍सव मंडळाचा मंडप कोसळला, मात्र अनर्थ टळला.

काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. परंतु आज आकस्मिक मुसंडी मारत पावसाने पुन्हा एकदा राज्‍याला झोडपून काढले. सत्तरी, साखळी, डिचोलीत तर मुसळधार पाऊस पडला. दुपारी एकच्या सुमारास ढगफुटीसारख्‍या कोसळलेल्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वाळवंटी नदीच्या पातळीत वाढ झाली असून, साखळीत रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत आहेत. त्‍यामुळे यंत्रणा सतर्क बनली आहे. दरम्‍यान, वाळपईत पावसाने इंचांचे द्विशतक पूर्ण केले आहे.

होंड्यात बँक, घरे, मंदिरांमध्‍ये पाणी

होंडा भागातील वडदेवनगर, होंडा-तिस्क, नवनाथ मंदिर परिसरातील ओहोळाच्या पाण्याची पातळी वाढल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली. त्‍यातच होंडा-तिस्क येथील भारतीय स्टेट बँक, नवनाथ मंदिर तसेच वडदेवनगर भागातील काही जणांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे लोकांमध्‍ये घबराट पसरली.

केपेत गणेशोत्सवाचा लोखंडी मंडप कोसळला

केपे सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाने देखाव्यासाठी भररस्त्यावर उभारलेला लोखंडी मंडप दुपारी कोसळला. त्‍याखाली काही उभी करून ठेवलेली दुचाकी वाहने सापडली. दैव बलवत्तर म्हणून प्राणहानी टळली. ही दुर्घटना दुपारी शाळा सुटायच्‍या वेळी घडली असी तर मोठा अनर्थ घडला असता.

डिचोलीतील व्‍यापाऱ्यांमध्‍ये चिंता

जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा नदी-नाल्यांतील पाणी वाढले आहे. डिचोलीतून वाहणारी नदी ओसंडून वाहत असून, बहुतांश भागात पाणी साचले आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीचे पाणी धोक्‍याची पातळी ओलांडू शकते. त्‍यामुळे आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे गावठण-साखळी येथे एका घरावर झाड कोसळले. मात्र या घटनेत वित्तहानी वगळता अन्य कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

साखळीत वाळवंटी नदीला पूर

आज दुपारी दीड वाजेपर्यंत शांतपणे वाहणाऱ्या वाळवंटी नदीला नंतर अवघ्या तासाभरातच पूर आला. ३ वाजेपर्यंत नदीच्‍या पाण्‍याने धोक्‍याची पातळी ओलांडली. त्‍यातच डोंगरमाथ्यावर जोरदार पर्जन्‍यवृष्टी झाल्‍याने ही स्‍थिती आणखी भयावह बनली. पण संध्‍याकाळी परिस्‍थिती नियंत्रणात आली. जोरदार पावसाचा परिणाम सोमवारच्‍या आठवडी बाजारावर झाला.

वाळपई बाजारात पाणी शिरल्‍याने हानी

वाळपई बाजारात पाणी घुसल्‍याने विक्रेत्‍यांचे मोठे नुकसान झाले. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. अवघ्या एका तासाभरात पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की, वाळपईबरोबर होंडा भागातील रस्ते पाण्याखाली गेले. वाळपई हनुमान मंदिर परिसरात असलेल्या शेडमध्ये पाणी शिरले. तसेच दुकानात पाणी जाऊन त्यांचे सामान वाहून गेले. वेळूस, म्हादई, रगाडा तसेच वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली.

‘काळ आला होता पण...’; तीन महिलांची सुटका

असाच काहीसा प्रकार आज साकोर्डा भागात घडला. रगाडा नदीला अचानक मोठा पूर आल्याने देऊळमळ येथील पुलाच्या दोन्ही बाजूने जोरात पाणी वाहू लागले. या पुलावरून जाताना तीन महिला अडकून पडल्या. मात्र कुळे पोलिस आणि फोंडा अग्निशमन दलाने वेळीच धाव घेऊन त्‍यांची सुखरूप सुटका केली. शीतल गावस (३१), सविता चोर्लेकर (२३) व सुमिता चोर्लेकर (२३) अशी या महिलांची नावे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kulem Accident: 'देव तारी त्याला कोण मारी'; कुत्रे आडवे आल्याने झाला विचित्र अपघात; दोघे आश्‍चर्यकारकरित्या बचावले

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

SCROLL FOR NEXT