केपे, प्रशासकीय व्यवस्थेत किंवा नागरी व्यवस्थेत येण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमीच तत्पर असले पाहिजे.
त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. आपले ध्येय गाठताना काही तडजोडीही करणे गरजेचे असते, त्या तडजोडी करून जास्तीत जास्त वेळ स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिला पाहिजे.
केवळ स्वप्ने पाहू नका तर ती सत्यात उतरविण्यासाठी जीवतोड मेहनत करा, असे प्रतिपादन गोवा सरकारचे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय गावडे यांनी केले.
केपे सरकारी महाविद्यालयाच्या एम.ए. कोकणी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते. यावेळी गोवा नाट्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजय पवार, प्राचार्य डॉ. जयदीप भट्टाचार्य, प्रा. सुशांत नायक व प्रा. दीपराज सातोर्डेकर उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेविषयीची तयारी कशी करावी, त्यासाठी कोणती साधने वापरावीत याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. जयदीप भट्टाचार्य यांनी स्वागत केले.
संयोजक प्रा. सुशांत नायक यांनी प्रास्ताविक केले. सिया राऊत देसाई आणि सेजल तळसेकर यांनी मार्गदर्शकांची ओळख करून दिली. साईशा शेट शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दीपराज सातोर्डेकर यांनी आभार मानले.
स्वत:चे वेळापत्रक बनवा : पवार
विद्यार्थ्यांनी नियमितपणे वृत्तपत्राचे वाचन केले पाहिजे. हे वाचन केल्यास त्यांना सभोवतालच्या घडामोडींचे ज्ञान मिळेल.
हे ज्ञान स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांनी स्वत:चे वेळापत्रक तयार केले पाहिजे व त्यानुसार अभ्यास केला पाहिजे. कल करे सो आज करे, आज करे सो अब ही वृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याने बाळगली पाहिजे, असे प्राचार्य डॉ. राजय पवार यांनी सांगितले.
गावडे म्हणाले की...
१. जेव्हा जेव्हा करिअर करण्याची संधी मिळते, ती विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे.
२. विद्यार्थ्यांना योग्यवेळी योग्य तो निर्णय घेता आला पहिजे.
३. स्पर्धा परीक्षेसाठी उच्च शिक्षण महत्त्वाचे असते. त्यामुळे या शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.