Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: गोविंदराव तवडकरांवर बरसलेच

Khari Kujbuj Political Satire: सुदिनांच्या या वाढत चाललेल्या डंक्याची चर्चा सध्या फोंडा तालुक्यात सुरूही झाली आहे. आता या त्यांच्या सुरू असलेल्या गाजावाजाचा सकारात्मक परिणाम होतो की काय याचे उत्तर मात्र काळच देणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोविंदराव तवडकरांवर बरसलेच

गोविंद गावडे आणि रमेश तवडकर यांच्यात सख्य नाही, हे सर्वांना माहीत आहे. वास्तविक या कार्यक्रमात डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. त्यात तवडकरही होते, पण बिरसा मुंडा यांची रथयात्रा काढण्याच्या तवडकरांच्या प्रयत्नांमुळे गोविंदराव तवडकरांवर अप्रत्यक्षरीत्या बरसलेच. नाव न घेता उटाच्या कार्यक्रमात अडथळा आणलेल्यांनी समाजासाठी काय केले असा सवाल करताना समाजाची पालखी खांद्यावर जरूर घ्या, पण ती बांधावर मात्र ठेवू नका, असे गोविंदराव म्हणाले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी ठराव घेऊन केंद्र सरकारकडे अहवाल पाठवण्यासाठी इतरांसोबत रमेश तवडकर यांचेही योगदान फार मोठे असल्याचे जाहीरपणे सांगितले आणि एकप्रकारे रमेश तवडकरांना मोठे महत्त्व देऊन गेले. ∙∙∙

सुदिनांचा परत एकदा डंका

दै. ‘गोमन्तक’मधून प्रसिद्ध होणाऱ्या काही लेखांचा सध्या जबरदस्त प्रभाव पडत आहे. सात नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या वीजमंत्री सुदिन ढवळीकरांवरच्या ‘सुदिन अजूनही मुख्यमंत्री होऊ शकतात?’ या लेखामुळे सुदिनांच्या मुख्यमंत्रिपदाच्या ‘प्रकरणा’चा परत एकदा राज्यभर डंका वाजायला सुरवात झाली आहे. यापूर्वी २३ सप्टेंबर रोजी ‘गोमन्तक’मध्येच प्रसिद्ध झालेल्या ‘सुदिन अजूनपर्यंत मुख्यमंत्री का झाले नाहीत?’ या लेखाने सुदिनांच्या कार्यकर्त्यांना चांगलीच ऊर्जा प्राप्त करून दिली होती. त्यावेळी मडकईपुरती सीमित असलेली ही ऊर्जा आता या नव्या लेखामुळे राज्यभर पसरली आहे. सुदिनांच्या या वाढत चाललेल्या डंक्याची चर्चा सध्या फोंडा तालुक्यात सुरूही झाली आहे. आता या त्यांच्या सुरू असलेल्या गाजावाजाचा सकारात्मक परिणाम होतो की काय याचे उत्तर मात्र काळच देणार आहे. ∙∙∙

वकीलही असुरक्षित

गोव्यात आजवर सर्वसामान्य लोकच असुरक्षित आहेत असे वाटत होते. वेगवेगळ्या कारणांसाठी सर्वसामान्यांवर होणारे हल्ले व त्याबाबत नोंदविल्या जाणाऱ्या पोलिस तक्रारीच्या बातम्या आजपर्यंत वाचनात होत्या. पण आता म्हणे वकील मंडळीही असुरक्षित आहेत. कारण त्यांच्यावरही म्हणे असे हल्ले होत आहेत व त्यामुळे न्यायाधीश मंडळींप्रमाणेच वकिलांनाही पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी वकील संघटनेने केली आहे. मात्र, अशाप्रकारे जो तो पोलिस संरक्षण मागू लागला, तर बिचाऱ्या पोलिस यंत्रणेवर भलताच ताण तर येईलच अन् सर्वसामान्यांनी कोणाकडे संरक्षण मागायचे अशी विचारणा सर्रास होताना दिसत आहे. मंत्री, राजकारणी व महनीय मंडळी नेहमीच सुरक्षा रक्षकांच्या गराड्यांत वावरतात, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था हल्ली प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, तशात जर आता वकिलांना पोलिस संरक्षण दिले गेले, तर कसे होणार असा प्रश्न पडतो. खरे म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांनी वावरायचे असते, पण त्यांनाच जर स्वतःच्या संरक्षणासाठी इतरांकडे मदत मागावी लागली, तर ते सर्वसामान्यांना न्याय कसा मिळवून देणार हा मुद्दाही खचितच दुर्लक्ष करणारा नाही असे म्हटले जाते. ∙∙∙

आलेक्स सिक्वेरांचे वजन वाढले

सासष्टीतील एकमेव मंत्री व नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांचे सरकारातील वजन बरेच वाढलेले दिसत आहे. ज्याअर्थी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या देतात ते पाहता ते मुख्यमंत्र्यांचे अगदी जवळचे झालेले दिसतात. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला नुवे मतदारसंघात अपेक्षेपेक्षा पुष्कळच कमी मते पडली. आलेक्स सिक्वेरा भाजपमध्ये आल्याने मते वाढतील असे दिसत होते, पण तसे घडले नाही. त्यामुळे सिक्वेरांचे सरकार दरबारी वजन घटले असे लोक बोलत होते, पण कुटबण जेटीची जबाबदारी त्यानंतर आता सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळ्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सिक्वेरांवर टाकल्याने त्यांचे सरकारात वजन वाढल्याचे बोलले जाते. त्यांना मंत्रिमंडळातून काढले जाईल असेसुद्धा लोक बोलत, पण आता ज्याप्रमाणे आलेक्स सिक्वेरा साहेब वागतात, ते पाहता त्यांचा आत्मविश्र्वास द्विगुणित झालेला दिसतो अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू आहे. ∙∙∙

युरी आलेमाव फिरकलेच नाहीत

फर्मागुढी - फोंड्यात ‘उटा’ संघटनेतर्फे महामेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे नाव होते, शिवाय कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या रस्त्यावर युरी आलेमाव यांचे पोस्टरही लावण्यात आले होते, पण कार्यक्रमाला युरी आलेमाव फिरकलेच नाहीत. काँग्रेसचे दक्षिण गोवा खासदार यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली खरी, पण मोजकेच बोलून त्यांनीही मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच काढता पाय घेतला. ∙∙∙

प्रभूंचे फोटोसेशन

अमेझिंग गोवा परिषदेच्या निमित्ताने माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू उद्‍घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले. समारोपाच्या कार्यक्रमापूर्वी रविवारी दुपारपासून त्यांनी प्रदर्शनातील स्टॉलना भेट देण्यास सुरवात केली. त्यांच्याबरोबर उद्योजक अनिल खंवटे उपस्थित होते. प्रत्येक स्टॉलधारक त्यांच्याबरोबर छायाचित्रे काढीत होते. प्रदर्शनात मांडलेल्या ऑफरोड इलेक्ट्रिक वाहनावर बसून प्रभू यांनी छायाचित्रे काढली. गोव्यातील पॉवरलँड या स्टार्टअरने बनविलेले हे वाहन असून तेही या प्रदर्शनातील आकर्षण ठरले. अनेकांनी या वाहनाबरोबर सेल्फी किंवा छायाचित्रे काढली. प्रभू यांचा भेटीचा कार्यक्रम बराचवेळ चालला आणि समारोपाच्या कार्यक्रमालाही वेळ होता, त्यामुळे प्रभू प्रत्येक स्टॉलवर त्या-त्या उद्योगाविषयी माहिती जाणूनही घेत होते. हसतमूख प्रभूंचा या प्रदर्शनातील वावर अनेकांना हायसा वाटला. ∙∙∙

घोटाळ्याबद्दल एल्टनबाब काय बोलले?

सध्या राज्यात सर्वत्र सरकारी नोकरी घोटाळ्याबद्दलच अधिकाधिक चर्चा सुरू आहे. सर्वचजण ज्या व्यक्ती या घोटाळ्यात गुंतलेल्या आहेत त्यांच्यावर टीका करतातच, पण त्याचबरोबर सरकार पक्षातील नेत्यांकडेही बोटे दाखवतात. काँग्रेस पक्षाने ही संधी सोडली नसून ते दररोज या घोटाळ्यासंदर्भात सरकारला धारेवर धरत आहे. मात्र, केपेचे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता सरकारवर टीका करण्याऐवजी केपेतील लोकांना ज्या सरकारी नोकऱ्या मिळाल्या त्यांच्याकडून एकही पैसा घेतलेला नसल्याचे स्पष्ट करतात. केपे मतदारसंघातील ज्यांना सरकारी नोकरी मिळाली, ती त्यांच्या पात्रतेनुसार असेही ते सांगतात. पण एल्टनबाबना हे आताच का सांगावेसे वाटावे याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT