‘आ बैल मुझे मार’ म्हणतात, तसे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची आयती संधी दिली आहे, असे राजकीय तज्ञ सांगतात. स्वतः मुख्यमंत्र्याच्या खात्यावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करून गावडे यांनी पक्षाचा राग ओढवून घेतला आहे, अशी चर्चा गावागावांत सुरू आहे. मात्र काही राजकीय पंडित सांगतात, की आपले मंत्रिपद जाणार याची चुणचुण गावडे यांना लागली असावी. मंत्रिपद जात असेल तर जाता जाता पक्षावर व सरकारवर भ्रष्टाचाराची तोफ उडवावी, असा विचार केला असावा, असे मत काही जण व्यक्त करतात. काही का असेना गावडे यांचे पद जाणार व त्यांना आंदोलन करण्यासाठी वेळ व संधी मिळणार, यात शंका नाही. ∙∙∙
रवी नाईक हे गोव्याच्या राजकारणातील एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांची खासियत म्हणजे ते दर निवडणुकीला एक नवीन रणनीती तयार करत असतात आणि हीच रणनीती त्यांना यशाचे दरवाजे उघडे करून देत असते. आगामी निवडणुकीत ते रिंगणात उतरण्याची शक्यता कमी असली तरी त्यांचा पुत्र रितेश रिंगणात उतरणार, हे जवळजवळ निश्चित आहे. यावर नजर ठेवून आणि भविष्यात होऊ शकणारी समीकरणे लक्षात घेऊन पात्रांव एक नवी रणनीती आखण्यात सध्या व्यस्त आहेत, अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यात सुरू झाली आहे. मात्र ही रणनीती काय? याचा मागमूस कोणालाच नाही. तशी ती शेवटपर्यंत कोणालाच कळू न देणे, हेच तर त्यांच्या आत्तापर्यंतच्या यशाचे इंगित आहे. आता बघूया गेल्या अनेक रणनीतीसारखी ही ‘रणनीती’ पात्रवांना आगामी निवडणुकीत यशाच्या किनाऱ्यावर नेते की काय? ∙∙∙
मंत्री गोविंद गावडे यांनी वादग्रस्त विधान केल्यावर नाशिक दौऱ्यावर असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांची तत्काळ दखल घेतली. ते मुख्यमंत्र्यांशी व दिल्लीत बोलले. उकाडा थोडा कमी होऊ दे मग मंत्रिमंडळ फेरबदलाचे पाहू, असे ते आजवर म्हणत आले आहेत. आता त्यांनी संधी घेतली आहे. यानिमित्ताने मंत्रिमंडळात मोठा फेरबदल घडवून आणण्याची तयारी ते करत आहेत. आपले प्रगतीपुस्तक विचारात घेतले जाईल, असे त्यांनी जाहीरपणे सांगूनही काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना त्यांची कृती यावेळी भोवणार आहे. ∙∙∙
नव्या जुवारी पुलावरील वेधशाळा मनोऱ्याच्या भूमिपूजन समारंभात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नव्या रिंग रोडसंदर्भातील अलायनमेंट गुप्त ठेवण्यामागील जे कारण सांगितले, ते म्हणे अनेकांना पटले आहे. या माहितगार मंडळींनी या संदर्भात मडगावातील पश्चिम बगलरस्त्याचे तसेच मोपा विमानतळाच्या मान्यतेनंतर त्या परिसरांत खरेदी केलेल्या जमिनींचे प्रमाण आश्चर्याने थक्क करणारे असल्याचे सांगितले. पश्चिम बगलरस्त्याची आखणी नव्वदच्या दशकांत तर मोपाला मंजुरी दोन हजारच्या दशकांत मिळाली होती. त्यावेळी दोन्ही ठिकाणी प्रचंड प्रमाणात जमीन खरेदी झाली होती. विशेषतः सासष्टीत जमीन खरेदी करणारे महाभाग हे स्थानिक राजकारण्यांशी तर पेडणेतील खरेदीदार हे दिल्लीतील होते. त्यामुळे गडकरी यांनी अलायनमेंट गुप्त ठेवण्याबाबत जे भाष्य केले आहे, ते योग्यच आहे, असे आता अनेकजण म्हणत आहेत. ∙∙∙
कुर्टी-खांडेपार पंचायतीचे सरपंच नीळकंठ नाईक सध्या ॲक्शन मोडमध्ये आहेत. गेल्या शुक्रवारी झिंगडीमळ - कुर्टी भागातील बेकायदा बांधकामांवर पंचायतीने बुलडोझर फिरवला होता. त्यावेळी बेकायदा बांधकामे पाडली जाणारच, असे सरपंचांनी सांगितले होते, आता माजी सरपंचाचे येथील एक बेकायदा बांधकामही पाडले असल्यामुळे विद्यमान सरपंचाने आपले शब्द खरे करून दाखवल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी माजी सरपंच तथा विद्यमान पंचसदस्य भिका केरकर व पंचायत सचिव सचिन नाईक आदी उपस्थित होते. सरपंच नीळकंठ नाईक यांनी सध्या धडक कारवाई सुरू केल्यामुळे या अतिक्रमण हटाव मोहिमेचा अनेकांनी धसका घेतला आहे. ∙∙∙
सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल म्हणून त्यांचे समर्थक आनंदात आहेत. गावकर सध्या गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या समर्थक सरपंचांनी याआधी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी धडकून गावकर यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भावनांची दखल घेऊ असे सूचक वक्तव्य केले होते. आता मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू झाल्यावर गावकर यांचे समर्थक आनंदीत झाले आहेत. धारबांदोडा तालुक्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याची गरज यानिमित्ताने ते व्यक्त करत आहेत. ∙∙∙
मंत्री महोदय म्हणतात, काही खात्यांमध्ये फाईल हलवण्यासाठी पैसे घेतले जातात! आता यावर जनता विश्वास ठेवणार नाही, तर काय करणार? कारण लोकांना माहीत आहे की, ‘मंत्री सरकारचे आणि सरकार मंत्र्यांचे, दोघेही एकाच माळेचे मणी!’ आता जर तुमच्याच घरातून ‘पैसे घेतल्या जातात'' अशी कबुली येत असेल, तर आम्ही त्यावर विश्वास ठेवणारच ना? सध्या सुरू असलेल्या या चर्चेतून एकच मागणी जोर धरू लागली आहे आणि ती म्हणजे आता लोकांना ‘संशयाच्या भोवऱ्यात’ ठेवण्यापेक्षा, जे लाचखोर आहेत, त्यांना शोधून कायमचे घरी बसवा! नाहीतरी, लोकांना आता ‘चोर-चोर’ खेळण्यात रस राहिलेला नाही, त्यांना आता ‘क्लीन चिट’ हवी आहे... पण ती कामातून!∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.