Goa Forward Party राज्यातील स्वयंसाहाय्य गटांना माध्यान्ह आहाराची बिले प्रलंबित ठेवून ही योजना बंगळुरूस्थित कंपनीला देण्यासाठी शिक्षण खात्याचा प्रयत्न सुरू आहे. खात्याने ही बिले वेळेवर न देता त्यांची गळचेपी चालविली आहे.
अनेकदा ही बिले दिली जातील असे सांगून त्यांची दिशाभूल करण्यात आली असल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाने केला आहे.
शिक्षण खात्याने स्वयंसाहाय्य गटाची बिले न फेडता माध्यान्ह आहार पुरवठा करण्यासाठीची निविदा काढली आहे व बिगर सरकारी संस्थांना यामध्ये सहभागी होण्याची मुभा दिली आहे.
त्यामुळे सरकारचे हे कटकारस्थान अगोदर ठरले असल्याचे दिसून येत आहे. स्वयंसाहाय्य गटांंच्या महिलांची बिले वेळेवर न देता ती प्रलंबित ठेवल्याने कंटाळून ती या योजनेतून बाहेर पडतील व त्यानंतर हे काम एनजीओना देण्याचा खात्याचा त्यामागील हेतू आहे.
विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश, पाठ्यपुस्तके, रेनकोट्स देण्याबाबत शिक्षण संचालक नेहमीच चालढकलपणा करत आले आहेत.
शिक्षण खात्यात जो भ्रष्टाचार माजला आहे त्याचा येत्या अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई पर्दाफाश करतील, असे पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत म्हणाले.
या पक्षाच्या शिष्टमंडळाने आज शिक्षण संचालकांची भेट घेऊन माध्यान्ह आहार प्रकरणी चर्चा केली.
कंत्राट परप्रांतीयांच्या हाती नको
माध्यान्ह आहार पुरवठा योजनेतून सर्वच गटांना वगळण्यात आलेले नाही. जे पुरवठा करण्यास तयार आहेत त्यांना काम दिले जाणार आहे, असे शिक्षण संचालकांनी सांगितले असता गोवा फॉरवर्ड पक्षाच्या शिष्टमंडळाने काढलेली निविदा रद्द ठरवून गोव्यातील स्वयंसाहाय्य गटाला अर्ज करण्यास आवाहन करण्याची मागणी केली.
राज्यात अनेक स्वयंसाहाय्य गट माध्यान्ह आहार पुरवठा करण्याच्या तयारीत आहेत. खात्याने यासाठी अर्ज मागवावेत व त्यातून त्यांनी निवड करावी, अशी मागणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.