PM Narendra Modi Dainik Gomantak
गोवा

PM Narendra Modi: पंतप्रधानांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज...

दैनिक गोमन्तक

PM Narendra Modi: पंतप्रधानांच्या या दौऱ्याची सर्वती तयारी झाली असून त्यांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झाला आहे. यानिमित्त मडगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मठग्रामनगरी सजली आहे.

मडगावातील कदंब बसस्थानकावर उभारलेल्या भव्य सभामंडपात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा आयोजित करण्यात आली असून ‘विकसित भारत, विकसित गोवा’ या संकल्पनेवर आधारीत प्रदर्शनाचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. शिवाय उद्या त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे आभासी पद्धतीने उद्‍घाटन व पायाभरणी होणार असून नंतर कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आली आहे.

सभा व प्रदर्शनासाठी मोठा तंबू उभारण्यात आला असून हजारो खुर्च्या मांडण्याचे काम कर्मचारी करीत होते. ज्या मंचावरून पंतप्रधान लोकांना संबोधित करणार आहेत, त्या मंचाची सजावट पूर्ण करण्याकडे काही कर्मचाऱ्यांचा कल दिसत होता.

सभेसाठी उभारलेल्या तंबूत सुमारे हजारो लोक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली असून बाजूने तंबूचा आकार आणखी वाढविण्यात आला आहे. कदंब बसस्थानकासमोरील मोठे वृक्ष तोडून राष्ट्रीय महामार्ग 66 रुंद करण्यात आला आहे. कदंब बसस्थानक परिसरातील सर्व रस्त्यांचे हॉटमिक्सिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

नरेंद्र सावईकरांकडून पाहणी

भारतीय जनता पक्षाचे राज्य सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर यांनी मडगावला भेट देऊन सभामंडप, सुरक्षा व्यवस्था, आसन व्यवस्थेची पाहणी केली. सर्व तयारी पूर्ण झाली असून ही सभा 100 टक्के यशस्वी होणार आहे. पंतप्रधान रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतर खास गोमंतकीयांना भेटण्यासाठी गोव्यात येत असून गोमंतकीयांना ते धन्यवादही देणार आहेत, असे सावईकर यांनी सांगितले.

एसजीपीडीए मैदानावर सभेची व्यवस्था

एसजीपीडीए मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून तेथे मोठी स्क्रीन व मंडप उभारून लोकांना पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज दुपारपर्यंत मंडप उभारणीचे काम चालू होते व आज रात्रीसुद्धा ते सुरू राहण्याची शक्यता आहे.

लोकांना आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड

उद्याच्या सभेला भाजपतर्फे ५० हजार लोक उपस्थित राहतील असे सांगण्यात आले असले, तरी या लोकांना कसे आणावे यासाठी भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, नुवेचे आमदार, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, माजी आमदार दामू नाईक यांनी गेल्या तीन चार दिवसांत वाड्यावाड्यांवर लोकांना एकत्र बोलावून बैठका घेतल्या आहेत. मडगाव व फातोर्ड्याहून प्रत्येकी ४ ते ५ हजार लोकांना आणले जाईल, अशी ग्वाही दिगंबर कामत व दामू नाईक यांनी दिली आहे.

जेवणाची व्यवस्था

पंतप्रधानांची सभा उद्या दुपारी असल्याने व लोकांना, कार्यकर्त्यांना तसेच संबंधित अधिकारी, पोलिसांना तीन ते चार तास अगोदर यायचे असल्याने जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवण पुरविणाऱ्या एजन्सींना हे काम देण्यात आले आहे.

जेवणाची व्यवस्था मडगाव नगरपालिकेच्या पार्किंग जागेत, कदंब बसस्थानकाच्या समोरील पार्किंग जागेत, माथानी साल्ढाना जिल्हा प्रशासनाच्या खुल्या जागेत करण्यात आली आहे. तसेच कदंब महामंडळाच्या बस पार्किंग जागेत महनीय व अतिमहनीय व्यक्तींसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळी 10 पासूनच नागरिक सभास्थानी येण्यास सुरवात होईल. त्यामुळे ११.३० वाजल्यापासून जेवण पुरविण्याच्या कामाला सुरवात होईल, असे राज्य सरचिटणीस दामू नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT