बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय बीच व्हॉलिबॉल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला गोव्याचा रामा धावसकर याचा सत्कार करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय बीच व्हॉलिबॉल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला गोव्याचा रामा धावसकर याचा सत्कार करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.  Dainik Gomantak
गोवा

Volleyball World Beach Pro Tour: गोव्याचे रामा धावसकर, नितीन सावंत बीच व्हॉलीबॉल स्पर्धेत थेट मुख्य फेरीत खेळणार

किशोर पेटकर

Volleyball World Beach Pro Tour: वार्का समुद्रकिनारी होणाऱ्या व्हॉलिबॉल वर्ल्ड बीच प्रो-टूर स्पर्धेत गोमंतकीय बीच व्हॉलिबॉलपटू रामा धावसकर व नितीन सावंत यांना मोठी संधी असेल.

येत्या 19 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या जगातील या प्रतिष्ठित बीच व्हॉलिबॉल स्पर्धेत राष्ट्रीय विजेती गोव्याची जोडी थेट मुख्य फेरीत खेळेल, अशी माहिती भारतीय व्हॉलिबॉल महासंघाच्या अस्थायी समितीचे सदस्य एस. गोपिनाथन यांनी मंगळवारी दिली.

स्पर्धेची माहिती देताना गोपिनाथन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की ‘‘गोव्याचे रामा धावसकर व नितीन सावंत भारताची अव्वल जोडी या नात्याने स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळणार आहे. पात्रता फेरीसाठी भारताला पुरुष व महिला गटात जागतिक महासंघाने दोन वाईल्ड कार्ड प्रवेशिका बहाल केल्या आहेत.

या दोन्ही जोड्या पात्रता फेरीत खेळतील. मुख्य फेरीत पुरुष व महिला गटात जगभरातील 16 प्रमुख जोड्या खेळतील. यामध्ये भारतीयांना संधी मिळतेय ही मोठी बाब आहे. पात्रता फेरीत पुरुष व महिला गटात प्रत्येकी 32 जोड्या असतील.

मालिकेतील यापूर्वीच्या दहा स्पर्धांत भारतीय खेळले नव्हते, ते गोव्यातील स्पर्धेद्वारे पदार्पण करतील.’’ या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गोवा नियमित केंद्र करण्याचे प्रयत्न असतील, असेही गोपिनाथ यांनी नमूद केले.

व्हॉलिबॉल वर्ल्ड बीच प्रो-टूर स्पर्धा भारतात प्रथमच होत असून स्पर्धा केंद्र म्हणून गोव्याला पसंती मिळाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी शानदार समारंभात स्पर्धेचा ‘शुभंकर’ व्हॉली (कासव), स्पर्धा गीत यांचे अनावरण झाले.

यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मांद्रेचे आमदार आयोजन समिती अध्यक्ष जीत आरोलकर, बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस, स्पर्धा आयोजन प्रमुख व्ही. रविकांत रेड्डी, आयोजन सचिव ए. जे. मार्टिन सुधाकर, राष्ट्रीय व्हॉलिबॉल महासंघाच्या अस्थायी समितीचे एस. गोपिनाथन, अर्जुन पुरस्कार विजेते राष्ट्रीय व्हॉलिबॉलपटू सुखपाल सिंग यांची उपस्थिती होती.

गोव्यातील मोठी स्पर्धा ः मुख्यमंत्री

गोव्याने जी-20 परिषदेचे यशस्वी आयोजन केले. या परिषदेतील पर्यटनविषयक घोषणा गोव्यात झाली. आता जी-20 स्पर्धेनंतर गोव्यात व्हॉलिबॉल वर्ल्ड बीच प्रो-टूर ही प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे. पर्यटन आणि क्रीडा यांची सांगड घालणारी ही स्पर्धा गोमंतकीयांसाठी मोठी संधी असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ या मोहिमेच्या धर्तीवर गोवा सरकारने ‘विकसित गोवा 2047’ वर भर दिला आहे. लवकरच आम्ही 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणार आहोत.

त्यापूर्वी जागतिक पातळीवरील बीच व्हॉलिबॉल स्पर्धा होत आहे, ही मोठी उपलब्धी आहे. गोवा आता क्रीडा पर्यटनासाठीही ओळखला जाऊ लागलाय,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

देशात प्रथमच आयोजन ः आरोलकर

आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले, की ‘‘फेब्रुवारी महिन्यात व्हॉलिबॉल वर्ल्ड बीच प्रो-टूर मालिकेला सुरवात झाली. आतापर्यंत दहा स्पर्धा झाल्या असून गोव्यात होणारी स्पर्धा मालिकेतील अकरावी आहे. एकूण सतरा स्पर्धा होणार असून डिसेंबरमध्ये मालिकेचा समारोप होईल.

ही स्पर्धा भारतात प्रथमच होत असून पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री, क्रीडामंत्री यांचे आम्हाला भरीव सहकार्य मिळाले असून बीच व्हॉलिबॉलच्या माध्यमातून खेळ व पर्यटन यांची सांगड घालण्यात येईल.

सकाळी सात ते संध्याकाळी सात या कालावधीत जगभरातील प्रमुख बीच व्हॉलिबॉलपटूंचे सामने होतील. त्यानंतर संध्याकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत स्पर्धा स्थळी वार्का समुद्रकिनारी आंतरराष्ट्रीय डीजेंचे कार्यक्रम होतील.

स्पर्धेत 40 देशांतील खेळाडू पात्रता, तसेच मुख्य फेरीत खेळण्यासाठी गोव्यात येतील, तसेच पर्यटकही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे संकेत आहेत.’’

अनुभवाच्या दृष्टीने मौल्यवान स्पर्धा

गोव्याचा अव्वल बीच व्हॉलिबॉलपटू रामा धावसकर व नितीन सावंत यांनी चेन्नईत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा जिंकली, पण आंतरराष्ट्रीय मानांकन नसल्याने त्यांना चीनमधील स्पर्धेत खेळता आले नाही. सप्टेंबरमध्ये या जोडीने बांगलादेशमध्ये दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकली.

आशियाई व्हॉलिबॉल महासंघाच्या (एव्हीसी) बीच व्हॉलिबॉल काँटिनेंटल कप स्पर्धेत रौप्य, तर लगेच मध्य आशियाई व्हॉलिबॉल संघटनेच्या (काव्हा) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

रामा व नितीन यांच्यासाठी व्हॉलिबॉल वर्ल्ड बीच प्रो-टूर स्पर्धेच्या मुख्य फेरीतील भारताचा ‘अ’ संघ असेल आणि हा सहभाग अनुभवाच्या दृष्टीने त्यांना खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय अनुभवच्या जोरावर ते 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकासाठी मुख्य दावेदार असतील हे स्पष्टच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chronic Alcoholism: गोव्यात दिवसाला आढळतायेत 3 ते 4 मद्य व्यसनाधीन; आरोग्य मंत्र्यांनी दिली धक्कादायक आकडेवारी

Goa Assembly Session: सरकारकडे खूप पैसे आहेत म्हणत, 'कृषीमंत्र्यांनी 10 मिनिटात उरकले उत्तर'

Goan Mushrooms: गोंयकारांची मान्सून स्पेशल 'अळंबी'

Goa Monsoon: गोव्याला वादळी वाऱ्याचा तडाखा! पडझडीत घरांचे नुकसान, अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत

IFFI Goa: 'मासूम' दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, इफ्फीत दिसणार नव्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT