vitthal shelke vanita warak marriage Dainik Gomantak
गोवा

वडाच्या झाडाखाली माडांच्या झावळ्यांचा मंडप, गोव्यात पार पडला प्रस्थापित रिवाजांना फाटा देणारा धनगरी लग्नसोहळा

Goa: विठ्ठल शेळके हे पर्यावरण चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत. ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांच्या हाताखाली घडलेल्या विठ्ठल आणि वनिता यांनी विवाहासाठी एखादे सभागृह न निवडता वडाच्या झाडाखालची भूमी निवडली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पर्ये: आजच्या काळात लग्नसोहळे म्हणजे श्रीमंतीचा बडेजाव प्रदर्शित करण्याचे निमित्त बनत चालले आहेत. अशावेळी धनगरी लोकजीवनाचा अभ्यासक आणि पर्यावरण कार्यकर्ते असलेले केरी-सत्तरी येथील (मूळ-कळणे, ता. दोडामार्ग) विठ्ठल शेळके आणि पाली-ठाणे सत्तरीतील वनिता वरक यांचा आज झालेला विवाह, धनगरी पारंपरिकता आणि पर्यावरण हितसंबंध जपून विवाह सोहळा कसा साजरा होऊ शकतो, याचे एक विरळा उदाहरण होता.

शांतीनगर-पिसुर्ले येथील श्री देव जागरेश्वर देवस्थान परिसरातील विस्तीर्ण वटवृक्षाखाली उभारलेल्या झावळांच्या मंडपात हा सोहळा दोन्ही बाजूंचे सगेसोयरे, शिक्षक, विद्यार्थी, साहित्यिक आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते यांच्या उदंड उपस्थितीत झाला.

विवाह समारंभाला पर्यावरणीय साज

विठ्ठल शेळके हे पर्यावरण चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत. ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांच्या हाताखाली घडलेल्या विठ्ठल आणि वनिता यांनी विवाहासाठी एखादे सभागृह न निवडता वडाच्या झाडाखालची भूमी निवडली होती.

धनगर समाजात एकेकाळी संध्याकाळच्या वेळी वडाच्या झाडाखाली विवाह व्हायचे. विठ्ठल आणि वनिता यांनी त्या परंपरेचा अंगीकार करताना शांतीनगर-पिसुर्ले येथील श्री देव जागरेश्वर देवस्थान परिसरातील एक प्राचीन वडाचे झाड निवडले.

या झाडाखाली त्यांनी माडाच्या झावळ्यांचा मंडप आणि लग्न विधीसाठी व्यासपीठ उभारले. हस्तकलाकार सूर्यकांत गावकर यांच्या संकल्पनेतून या मांडवाची पर्यावरणपूरक उभारणी केली होती.

पारंपरिक अन्नपदार्थ

या लग्नसोहळ्यात उकडा भात, खतखते, दही, ताक, कांदा भजी, नारळाची सोलकढी यांसारखे पारंपरिक अन्नपदार्थ होते. त्यामुळे उपस्थितांनी पारंपरिक अन्नपदार्थांचा आस्वाद घेता आला. लग्नसमारंभात अनेक पदार्थ वाढून घेऊन त्याची नासाडी करण्याऐवजी मोजकेच अन्नपदार्थ वाढून अन्न वाया घालवू नये, हा संदेश होता.

पारंपरिक धनगरी पद्धतीने विवाहबंधन

विठ्ठल-वनिता यांच्या विवाहाचे वैशिष्ट्य हे होते की, त्यांनी प्रस्थापित रिवाजांना फाटा देत पारंपरिक धनगरी पद्धतीने एकमेकांशी लग्नगाठ बांधली. धनगर समाजात वैदिक मंत्रघोषात विवाह करण्याची परंपरा कधीही नव्हती.

आपल्या जुन्या धनगरी पद्धतीचा अवलंब करून व ब्राह्मणी विधी टाळून हा लग्नविधी झाला. त्यांच्या ज्येष्ठ मंडळींकडून धनगरी लग्न गीते गायली गेली आणि त्या गीतांच्या उत्कट सुरांच्या पार्श्वभूमीवर वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले.

तांदळाऐवजी झेंडूची फुले अक्षता म्हणून त्यांच्यावर बरसत होती. लग्नविधीतील इतर धनगरी रीती पाळल्या गेल्या. पारंपरिक धनगरी फुगडीही याप्रसंगी सादर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

SCROLL FOR NEXT