पावसाळा म्हटल्यावर त्या दिवसांत गोव्यातील डोंगरांना फुटणारे धबधबे आठवतात, पावसाळी भाज्या आठवतात, उन्हाळा म्हटल्यावर आंबा-फणस आदी फळांचा घमघमाट आठवतो, तसेच हिवाळा म्हटल्यावर गावोगावी होणाऱ्या जत्रा आठवतात. जत्रेतील गर्दीची ऊब ही जणू हिवाळ्यातील थंडीवर उतारा असली पाहिजे, म्हणूनच कदाचित आपल्या साऱ्या जत्रा हिवाळ्यात रांगेने मांडून ठेवल्या गेल्या आहेत.
शेतीची कामे उरकून झालेली असतात. धान्य विकून पैसा हातात खुळखुळत असतो. गावच्या देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त होणाऱ्या उत्सवातील जत्रेनिमित्त गावात मांडल्या गेलेल्या दुकानांमध्ये विविध वस्तूंची खरेदी अप्रूपाने करावी ही एकेकाळची व्यवस्था होती.
शेती आणि गाव व्यवस्थेची सांगड जत्रेबरोबर व्यवस्थित घातली गेली होती. ही व्यवस्था जत्रेचा कणा आहे असे मानले जात होते. मात्र, आज गाव, शेतकरी, शेती हे त्रैराशिक जुन्या काळासारखे राहिलेले नसले तरी गावागावांतील जत्रा मात्र अजून टिकून आहेत.
नुसत्या टिकून आहेत असे नव्हे तर त्या लोकांच्या अधिकाधिक आकर्षणाचा विषय होत चालल्या आहेत. गर्दी हा जर जत्रेच्या लोकप्रियतेचा निकष ठरवला गेला तर गेल्या पिढीतील लोकांनी अनुभवलेल्या जत्रांपेक्षा अलीकडच्या काळात होणाऱ्या जत्रा अधिक लोकप्रिय बनत चालल्या आहेत, हेच आपल्याला आढळून येईल.
जत्रेच्या हंगामाची सुरवात तुळशीविवाहाने होते आणि मान्सूनचा हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याची सांगता होते. जत्रेदरम्यान गावांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण होते. मुलांसाठी, रंगीबेरंगी खेळण्यांची दुकाने, गोड पदार्थ आणि मनोरंजक उपक्रमांमध्ये रमून जाण्याची ही वेळ असते, ज्यामुळे ही जत्रा त्यांच्यासाठी उत्सवाचा सर्वात आवडता भाग ठरते.
जत्रेच्या काळात वर्षभर मंदिरात असलेल्या देवता पालखीतून किंवा रंगीबेरंगी कागदी पताकांनी सजवलेल्या बहुमजली रथातून मिरवणुकीने बाहेर फिरायला निघतात. देवतांच्या भेटीने गावातील घरे धन्य होत असतात.
गोव्यात पोर्तुगिजांच्या छळामुळे मंदिरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. अनेक मंदिरे आपल्या परंपरा सोबत घेऊन नवीन जागेत वसली. गाव न सोडणाऱ्यांपैकी अनेकांना आपले धर्म बदलावे लागले. आजही अनेक कॅथलिक, जत्रेच्या काळात (पौष शुद्ध पंचमी ते पौष शुद्ध दशमी) नवस फेडण्यासाठी शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिरात जातात.
शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिराच्या उत्सवातील ख्रिश्चन लोकांचा सहभाग हा एक अनोखा आंतरधर्मीय पायंडा आहे. कुंकळ्ळीच्या बारा मूळ गाव वसाहतीमधील काही ख्रिश्चन-परिवर्तीत कुळांना त्यांच्या ऐतिहासिक अधिकारांमधून ‘सोत्र्या’ नावाच्या छत्र्यांच्या मिरवणुकीत विशेषाधिकार प्राप्त झालेला आहे. आपल्या परंपरांचे जतन करत अशाप्रकारे काही जत्रा वेगळ्या तऱ्हेने विकसित झालेल्याही दिसतात.
शिवोलीच्या जागरासारखे हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही समाजाचा अंतर्भाव असलेले आंतरधर्मीय उत्सवही हळूहळू जत्रेचे रूप घेताना दिसू लागले आहेत.
उत्तर गोव्यातील कळंगुट येथील खोब्रावाडो येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा बाबरेश्वर देवाचा उत्सव ‘केळ्यांची’ किंवा घडांची जत्रा म्हणून अलीकडे अधिकच प्रसिद्धीला आला आहे. भाविक या देवतेला केळीचा संपूर्ण घड अर्पण करतात. एकाच दिवसात देवतेला २५०० हून अधिक केळीचे घड अर्पण केले जातात.
हे घड नंतर एका लाकडी चौकटीवर बांधले गेलेले असतात. अतिरिक्त घडांचा दररोज सायंकाळी लिलाव केला जातो. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या जत्रेला हजारो स्थानिक आणि पर्यटक आकर्षित होतात.
प्रत्येक जत्रेत खेळण्याची, स्वादिष्ट जिन्नसांची, भांड्या-कुड्यांची, घरगुती उपयोगी वस्तूंची दुकाने असतातच; परंतु अलीकडच्या काळात जुगारालादेखील जत्रांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळू लागले आहे, असेही चित्र निर्माण झाले आहे.
काही ठिकाणी जत्रेचा किमान वीस ते पंचवीस टक्के परिसर अशा जुगाराच्या टेबलांनी व्यापला गेलेला दिसतो आणि त्या ठिकाणची गर्दीही जत्रेतील इतर गर्दीइतकीच दाट असते. पूर्वीच्या काळात दशावतारी किंवा स्थानिक कलाकार सादर करत असलेले नाटक सादर व्हायचे. पहाट होता होता संपणाऱ्या नाटकाबरोबरच जत्राही आवरायची.
वाहतुकीची साधने त्या काळात मर्यादित होती; पण अलीकडच्या काळात देवाचे दर्शन घेऊन झाल्याबरोबर अनेकजण स्वतःच्या खासगी वाहनाने पुन्हा घरी रवाना होतात. त्यामुळे एकेकाळी पहाटेपर्यंत दिसणारी गर्दी अलीकडच्या काळात कमी झालेली आहे.
मात्र, ही गर्दी टिकून राहावी यासाठी जुगार आयोजित करणारी मंडळीच लोकप्रिय नाटकांचे आयोजन जत्रेत करताना दिसतात. अनेकदा त्यांचा हा डाव सफलही होतो. गावच्या जत्रा अशाही प्रकारे एक वेगळे रूप धारण करताना दिसत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.