Vagator Beach: दिल्लीच्या पर्यटकांचा वागातोर समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची बातमी हाती येतेय. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव जीवन दत्ता असे असून त्याचे वय 32 वर्षे असल्याचेही समजतेय. सदर व्यक्तीला परदेशी नागरिकाने पाण्यातून बाहेर काढले असल्याचेही समजतेय.
सदर मृत व्यक्तीने भरपूर दारू प्यायली असून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या व्यक्तीसोबत अन्य कुणी होते का याची माहिती अद्याप मिळालेली नाहीय. घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.
सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरु झाला असून ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटक गोव्यात समुद्रकिनारी पर्यटनासाठी येत आहेत.
पर्यटकांना मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी 80 समुद्रकिनाऱ्यांवर सुमारे 450 जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र असं असूनही बेसुमार मद्यपान आणि अति उत्साहीपणा अशा प्रकारांमुळे वागातोर सारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी गोव्यालगतच्या सिंधुदूर्गातील देवगड समुद्रात पुण्याहून पर्यटनासाठी आलेले पाच विद्यार्थी बुडाले होते. यापैकी चार मुलींचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.