पणजी: गोवा विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फिजिकल अँड अप्लाईड सायन्सेस विभागातील साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक याच्यावर प्रश्नपत्रिका चोरीप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. दुसरीकडे राज्यपालांनी तातडीने अहवाल मागविला आहे.
प्रणव नाईक याने सप्टेंबर २०२४ मध्ये परवानगीशिवाय सहकारी प्राध्यापकांच्या केबिनमध्ये प्रवेश करून प्रश्नपत्रिका चोरल्याचा आरोप आहे. इतर प्राध्यापकांनी त्याला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर हे प्रकरण दडपण्यात आले होते. मात्र, ‘गोमन्तक’ने हे वृत्त उजेडात आणल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला चौकशी समिती नेमावी लागली.
कुलगुरू हरिलाल मेनन यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देताना सांगितले की, डॉ. नाईक परवानगी न घेता केबिनमध्ये गेले होते, परंतु ते रसायने घेण्यासाठी गेले होते’ असे सांगितले. प्रश्नपत्रिका चोरीची कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही. तरीही आम्ही तीन सदस्यीय समिती स्थापन केली असून, ती पूर्ण होईपर्यंत डॉ. नाईक यांना निलंबित केले आहे.
विद्यापीठाच्या निर्णयावर विद्यार्थी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज सकाळपासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गोवा फॉरवर्ड विद्यार्थी संघटना, एनएसयूआय आदी संघटनांनी विद्यापीठात धडक देत कुलगुरूंना जाब विचारला. तसेच आरोपीला पाठीशी घातल्याचा आरोप केला. एनएसयूआयने आगशी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून, विद्यापीठात आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी नाईक याच्या वैयक्तिक कर्मचारी फाईलची तपासणी करण्याची मागणी केली आहे. कुलगुरू मेनन यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. सप्टेंबरमध्येच इतर प्राध्यापकांनी याप्रकरणी तक्रार केली होती, परंतु कुलगुरूंनी ती दाबली. आता प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर चौकशीची नौटंकी सुरू केली जात असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.
विद्यापीठ प्रशासनाने तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून, पुढील ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर कार्यकारी समिती पुढील निर्णय घेणार आहे. तथापि, विद्यार्थ्यांच्या रोषामुळे कुलगुरूंना राजीनामा द्यावा लागेल, अशी चर्चा विद्यापीठात रंगली आहे.
प्रश्नपत्रिका चोरून एका विद्यार्थिनीला दिल्याचा आरोप असलेला साहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक याच्यावर विद्यापीठ प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आणि पुढील आदेश येईपर्यंत नाईक हे निलंबित राहतील असे आदेश विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. हरिलाल मेनन यांनी दिले आहेत. केंद्रीय नागरी सेवा (वर्गीकरण, नियंत्रण आणि अपील) नियम, १९६५च्या नियम १० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित विभागप्रमुखाने तक्रार करूनही कुलगुरूंनी दखल घेतली नाही. तत्पूर्वी, त्यांच्या व्हॉट्स-ॲपवर सदर प्रकरण आले, तेव्हाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आपण आगशी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी सांगितले. त्या प्राध्यापकांचे व्हॉट्स-ॲप मेसज तपासावेत. शिवाय त्यांचे कॉल्स, ईमेलही तपासायला हवेत. मेरीटमध्ये नसणारा मेरीटमध्ये येऊन इतर विद्यार्थ्यांपुढे जातो, तेव्हा ही बाब इतर विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकते, असे ते म्हणाले.
या प्रकरणाची आपणास काहीच कल्पना नाही असे काल बिनदिक्कतपणे सांगणारे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांनी आज ‘गेल्या सप्टेंबरमध्येच आपल्याकडे तोंडी तक्रार आली होती’ अशी कबुली पत्रकारांशी बोलताना दिली. प्रणव नाईक यांनी दुसऱ्या प्राध्यापकांची केबिन त्यांना कल्पना न देता उघडल्याची ती तक्रार होती. परंतु नाईक यांनी सहकाऱ्यांचे संगणक सुरू केले होते का?, त्यांची कपाटे उघडली होती का?, इतरांनी पाळत ठेवून नाईक यांना पकडून दिले होते का? आदी ‘गोमन्तक’ने उघड केलेल्या मुद्यांवर मेनन यांनी सोयीस्कर मौन बाळगले.
अभाविपने विद्यापीठावर मोर्चा काढला तर एनएसयूआयने आगशी पोलिसांत तक्रार दाखल केली. समाजमाध्यमांवरही ‘त्या’ प्राध्यापकावर कारवाई झाली पाहिजे असे मत अनेकांनी व्यक्त केले. यामुळे जनमताचा मोठा रेटा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश विद्यापीठानेच स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीला दिले आहेत. त्यानंतर विद्यापीठाची कार्यकारी समिती पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. मेनन यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेला गोवा विद्यापीठाचे निबंधक प्रा. सुंदर धुरी देखील उपस्थित होते.
प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाचा आरोप असलेल्या साहाय्यक प्राध्यापकाला वाचवण्यासाठी भौतिकशास्त्र विभागाच्या ज्येष्ठ प्राध्यापकांनीच ‘करामती’ केल्याचा संशय गडद झाला आहे. हे प्रकरण या विभागातून कुलसचिव व तेथून कुलगुरूंपर्यंत सप्टेंबर २०२४ मध्येच गेले होते. परंतु नंतर ते मिटविण्याचा ‘निर्णय’ घेण्यात आला.
सूत्रांच्या मते, हा साहाय्यक प्राध्यापक इतर प्राध्यापकांच्या केबिनमध्ये ‘घुसल्याचे’ सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचे भौतिकशास्त्र विभागात निश्चित झाले होते. आपण अनधिकृतरीत्या प्राध्यापकांच्या केबिनमध्ये घुसल्याचेही त्याने कबूल केले होते. कारण तो सर्व प्राध्यापक मंडळी घरी गेल्यानंतर या प्राध्यापकांच्या केबिनमध्ये बनावट चाव्या घेऊन शिरला होता. तो केबिनमध्ये जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिले तेव्हा त्याचे बिंग फुटले.
एक प्राध्यापक नाव न छापण्याच्या अटीवर आज ‘गोमन्तक’शी बोलताना म्हणाला, आम्हाला वर्गात कोण मुले शिक्षणात किती मागे-पुढे आहेत, हे सहज समजत असते. ही विद्यार्थिनी अचानक परीक्षेत चमकू लागली तेव्हा आम्हाला संशय आला व त्याच काळात हा आमच्या केबिनमध्ये ‘चोरून’ घुसण्याचा प्रकार चालला होता.
प्राध्यापक पुढे म्हणाला, त्या काळात आम्ही परीक्षेच्या पहिल्या दिवशी प्रश्नपत्रिका तयार करून त्या आमच्या केबिनमध्ये टेबलावरच ठेवून जात असू. कारण त्या कोणीतरी चोरून नेऊ शकतो, ही गोष्टच कल्पनेपलीकडची होती. परंतु ती घटना घडल्यानंतर आता प्रत्येक प्राध्यापक काळजीपूर्वक प्रश्नपत्रिका कुलूपबंद ठेवतो.
साहाय्यक प्राध्यापकाचे बिंग फुटल्यावर त्याच्याविरोधात आम्ही तक्रार केली व ती विभागप्रमुख तसेच कुलसचिवांपर्यंत पोहोचली. कुलसचिवांनी नंतर ती कुलगुरूंपर्यंत नेली. त्यावेळी त्याला बडतर्फ करण्याऐवजी त्याच्या वैयक्तिक फाईलमध्ये ‘गंभीर शेरा’ मारणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. परंतु आता वाटू लागले आहे की वरिष्ठांपर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर नामुष्की होईल या भीतीने प्रकरण तेथेच गाडून टाकण्यात आले व त्याच्या वैयक्तिक फाईलमध्ये शेराही मारण्यात आलेला नाही. म्हणजे आत्तापर्यंत त्याला ‘तंबी’ दिली आहे असे भासवले जात होते, तेही घडले नसावे, असे या प्राध्यापकाने उद्विग्नपणे सांगितले.
अशा गंभीर गुन्ह्याखाली ‘सेवा नियमात’ काही शिक्षा सांगितल्या आहेत. त्याकडेही दुर्लक्ष झाले असल्याची प्रतिक्रिया या प्राध्यापकाने व्यक्त केली. आता संपूर्ण राज्यभर हे प्रकरण गाजत असल्याने त्यातून सत्य निपजेल व विद्यापीठातील या शरमेच्या घटनेचा सोक्षमोक्ष लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केला आहे.
प्रणव नाईक यांनी एका प्राध्यापकाच्या परवानगीशिवाय केबिनचे दार उघडल्याची तक्रार मिळाली होती. त्याबाबत विचारले असता, त्यांनी रसायने घेण्यासाठी दार उघडल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, प्रश्नपत्रिका चोरीची कोणतीही तक्रार त्यावेळी प्राप्त झाली नव्हती.प्रा. रमेश पै, अधिष्ठाता विद्याशाखा
या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार अद्याप माझ्याकडे आलेली नाही. प्रणव नाईक हे एक चांगले संशोधक आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणावरही दोष ठेवणे योग्य ठरणार नाही.प्रा. हरिलाल मेनन, कुलगुरू
गोवा विद्यापीठाचा कुलपती या नात्याने या प्रकरणाची मी गंभीर दखल घेतली आहे. विद्यापीठाने तातडीने या प्रकरणी अहवाल द्यावा असा आदेश मी दिला आहे. त्यानंतर दोषींवर उचित कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल. अशा गोष्टी विद्यापीठात चालू नयेत या मताचा मी आहे.पी. एस. श्रीधरन पिल्लई, राज्यपाल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.