Goa Tourism : आदिल शहाच्या काळात बांधला गेलेल्या शापोरा येथील प्रसिध्द किल्ल्यांचा जिर्णोध्दार सध्या सुरु आहे. हा किल्ला अनेक ठिकाणी पडझडीला आला होता. किल्ल्यांच्या भिंतीवर झाडां-रोपांनी आपले रान माजवले होते. किल्ल्याच्या होत असलेल्या जिर्णोध्दारामुळे या किल्ल्यांला पुन्हा एक नवी झळाळी येईल अशी अपेक्षा आहे.
शापोरा नदीच्या मुखावर बांधलेल्या किल्ल्याचा परिसर आदिल शहाच्या काळात शहापूरा म्हणून ओळखला जात असे. पोर्तुगीजांनी शहापूराला नंतर शापोरा बनवले. ‘दिल चाहता है’ या ब्लॉक-बस्टर सिनेमात हा किल्ला दिसला गेल्यापासून पर्यटकांमध्ये हा किल्ला अगदी लोकप्रिय बनला आहे. ‘दिल चाहता है किल्ला’ अशी आता त्याची ओळख बनलेली आहे. (Chapora Fort Renovation)
इतिहासात या किल्ल्याची अनेक हस्तांतरे झाली आहेत. औरंगजेब यांच्या मुलाने, अकबरने मराठ्यांशी हातमिळवणी करुन पोर्तुगीज राजवटीवर दबाव आणताना या किल्ल्याला आपली छावणी बनवली. त्यानंतरच्या काळात हा किल्ला पोर्तुगीजांच्या जुन्या काबिजादीत, त्यांचे उत्तरेकडचे महत्त्वाचे ठाणे बनले. शापोरा नदीच्या पलीकडच्या प्रांताचा शासक, सावंतवाडीचे राजे, पोर्तुगीजांचे जुने शत्रू होते. त्यांनी आपल्या ताब्यात हा किल्ला दोन वर्षे ठेवला. 1717 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला पुन्हा ताब्यात घेऊन त्याची व्यापक दुरुस्ती केली. त्यावर बुरुजांची उभारणी केली व आणिबाणीच्या काळात उपयोगी होईल या हेतूने पार समुद्रकिनारी आणि नदीच्या काठापर्यंत पोहचणारा बोगदा किल्यावर खणला.
1739 मध्ये हा किल्ला पुन्हा भोसलेंच्या हाती पडला मात्र त्यानंतर लगेच 1741 मध्ये पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यानंतर त्या किल्यावर शेवटी त्यांनी कबजा मिळवला. जेव्हा पोर्तुगीज राज्याची हद्द पेडणेच्या पलीकडे पोहोचली तेव्हा या किल्ल्याचे सामारिक महत्त्व संपुष्टात आले व पोर्तुगीजांचेही त्याकडे हळूहळू दुर्लक्ष होत गेले.
गोवा मुक्तीनंतरही शासनाने या किल्ल्याच्या डागडुजीकडे फारसे लक्ष न दिल्यामुळे किल्ल्यांचा बराचसा भाग मोडकळलीला आला. किल्ल्यांच्या आता असलेले चर्चही गायबच झाले आहे. मध्यंतरीच्या काळात संपूर्णपणे दुर्लक्षित झालेला हा किल्ला, तो सिनेमात झळकल्यानंतर अचानक पर्यटकांचा आकर्षणाचे केंद्र बनला.
किल्यावर जायच्या रस्त्यावर दोन्ही बाजूनी स्टॉल थाटण्यात आले होते. आता त्याचा जिर्णोध्दार होत असल्याने ते स्टॉल तिथून हटवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी या किल्ल्याच्या बुरुजांचे आणि भिंतीचे चिरे ढासळून गेलेले आहे. या भितींवरुन समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. त्यामुळे अनेक पर्यटक धोका पत्कारुन आपली छायाचित्रे काढत असतात. आता होत असलेल्या जिर्णोध्दारानंतर हा किल्ला पुन्हा एक सुस्वरुप धारण करुन गोव्याचे आणखीन एक सुंदर ठिकाण बनेल अशी अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.