पणजी: टॅक्सी व्यवसायासमोर आता आणखी एक नवे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालकासह कार भाड्याने देण्याच्या व्यवसायाला कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘रेन्ट अ कॅब योजना : २०२६’ प्रस्तावित केली आहे. १ जानेवारीपासून ती लागू करण्याचा प्रस्ताव असून, मसुद्यावर ५ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत.
१९८९ च्या जुन्या योजनेच्या जागी नवी नियमावली आणण्यात येणार आहे. यामध्ये स्वतः वाहन चालवण्यासाठी कार भाड्याने देण्याबरोबरच चालकासह कार उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसायाचाही समावेश आहे. या व्यवसायासाठी राज्य वाहतूक प्राधिकरणाचा परवाना बंधनकारक असेल. नवीन परवाना आणि नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज शुल्क २५ हजार रुपये असून, वाहनांची किंवा कार्यस्थळांची संख्या कितीही असली तरी शुल्क समान राहील.
व्यवसायासाठी किमान पाच मोटार कॅब असणे आणि प्रत्येक कार्यस्थळी किमान दोन वाहने ठेवणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या मदतीसाठी २४ तास सुरू असलेले सेवा केंद्रही बंधनकारक असेल. प्रत्येक वाहन अर्जदाराच्या नावावर नोंदणीकृत असावे. त्याला वैध योग्यता व प्रदूषण प्रमाणपत्र, वाहन कर भरल्याचा पुरावा आणि सर्वसमावेशक विमा असणे आवश्यक आहे. वाहनावर थकीत चलन नसावे आणि पहिल्या नोंदणीपासून नऊ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेला नसावा.
परवाना अर्ज मिळाल्यापासून ६० दिवसांत मंजूर करण्याची तरतूद असून, त्याची वैधता पाच वर्षे असेल. अटींचे उल्लंघन झाल्यास परवाना नाकारता, निलंबित किंवा रद्द करता येईल. ग्राहकांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करावे लागेल. चालकाविरोधातील तक्रारीची सात दिवसांत चौकशी करून कारवाईची माहिती ग्राहकाला द्यावी लागेल.
वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, लहान मुलांसाठी बाल आसन व्यवस्था असणे आवश्यक आहे. चालकाचा वैध परवाना, पोलिसांकडून चारित्र्य व पार्श्वभूमी पडताळणी आणि थकीत चलन नसल्याची खातरजमा करावी लागेल. चालकांच्या कल्याणाची जबाबदारी सामाजिक सुरक्षा संहिता २०२० नुसार पार पाडावी लागेल.
सूचनांसाठी अंतिम मुदत ५ डिसेंबर
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ६ नोव्हेंबर रोजी नव्या योजनेचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. भागधारकांनी सूचनांसोबत संबंधित परिच्छेद किंवा स्तंभ क्रमांक, मूळ तरतूद, सुचविलेला बदल, त्यामागील कारण नमूद करावे. सूचना एमएस वर्ड फाईलमध्ये comments-morth@gov.in या ई-मेलवर ५ डिसेंबरपर्यंत पाठवणे गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.