फातोर्डा: आम आदमी पक्षाने गोव्यात (Goa) येऊन गोंधळ घालणे व लोकांमध्ये संभ्रम पसरविणे थांबवावे. तसेच अगोदर स्वत:चे घर सांभाळावे, असा सल्ला काँग्रेस पक्षाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष आलेक्स सिक्वेरा यांनी ‘आप’ला दिला आहे. काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेस हा पक्षांतर करणारा पक्ष’ असे म्हणण्याचा ‘आप’ला काहीही अधिकार नाही. पंजाबमध्ये ‘आप’चे आमदार काँग्रेस पक्षात सामील होत आहेत. हे प्रथम त्यांनी थांबवावे. तेथे आता ‘आप’च्या आमदारांचे संख्याबळ 20 वरून 11 वर आले आहे, याकडे सिक्वेरा यांनी लक्ष वेधले. या पक्षाचे गोव्यातील नेते कॅप्टन व्हेंझी व्हिएगस व अॅड. अमित पालेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपण भेटल्याचा जो आरोप केला आहे, तो धांदात खोटा आहे. मी कधीही फडणवीस यांना भेटलेलो नाही. फडणवीस हे भाजपचे नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एवढीच माहिती त्यांच्याबद्दल आपल्याला आहे असेही सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.
‘आप’चेच नेते आपल्याला भेटायला येतात. मी त्यांना सांगितलंय की, ‘आप’ ही भाजपची ‘बी’ टीम नाही हे आपल्याला अगोदर पटवून द्या. मात्र तसे करण्यास ते असमर्थ ठरल्याचे सिक्वेरा म्हणाले. काँग्रेस ही भाजपची ‘बी’ टीम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सरकारच सत्तेवर येईल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकांना तीर्थयात्रेस नेण्याचे आमिष ‘आप’ दाखवत आहे. प्रथम त्यानी गोव्यात सत्तेवर येऊन दाखवावे. तीर्थयात्रेस जाण्यासाठी सरकारी किंवा राजकीय पक्षांच्या योजनेची गरज नाही. त्यासाठी देवाची भक्ती महत्त्वाची आहे. आपण तीन हजारांपेक्षा जास्त युवक-युवतींना नोकऱ्या मिळवून दिल्या. पण कोणाकडून कधी पैसे घेतले नाहीत. घेतले असल्यास ‘आप’ने सिद्ध करून दाखवावे.
- आलेक्स सिक्वेरा, काँग्रेसचे राज्य कार्यकारी अध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.