Indian Super League: सामन्याच्या पूर्वार्धात स्पॅनिश स्ट्रायकर कार्लोस मार्टिनेझ याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर एफसी गोवाने विजय नोंदवत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पुन्हा अव्वल स्थान मिळविले.
हैदराबाद येथील जीएमसी बालयोगी स्टेडियमवर गुरुवारी रात्री मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सलग 11 सामने अपराजित राहण्याचा पराक्रम साधला. त्यांनी कमजोर हैदराबाद एफसीला 2-0 गोलफरकाने नमविले.
एफसी गोवाचा हा 11 लढतीतील आठवा विजय ठरला. त्यांचे आता 27 गुण झाले असून अग्रस्थान मिळविताना केरळा ब्लास्टर्सवर एका गुणाची आघाडी घेतली आहे. त्याचवेळी एफसी गोवाने यंदा स्पर्धेत सातव्या सामन्यांत क्लीन शीट राखली.
कार्लोस मार्टिनेझ याने पूर्वार्धातील खेळात अनुक्रमे सातव्या व 30 व्या मिनिटास गोल केला. आयएसएलमध्ये यंदा अपराजित असलेला एफसी गोवा एकमेव संघ आहे.
प्रमुख खेळाडूंनी सोडचिठ्ठी दिलेल्या हैदराबाद एफसीचा हा यावेळच्या स्पर्धेतील आठवा पराभव ठरला. त्यामुळे १२ लढतीनंतर फक्त चार गुणांसह ते तळाच्या बाराव्या क्रमांकावर आहेत.
हैदराबादविरुद्ध विजय नोंदविल्यानंतर आता एफसी गोवासाठी ओडिशा एफसीविरुद्ध भुवनेश्वर येथे नऊ फेब्रुवारीस होणारा सामना महत्त्वाचा असेल.
कमकुवत बनलेल्या हैदराबादविरुद्ध आघाडी घेण्यासाठी एफसी गोवाला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही.
सेट पिसेसवर ब्रँडन फर्नांडिसच्या अफलातून क्रॉसपासवर मार्टिनेझचे हेडिंग भेदक ठरले. त्याने अगदी जवळून अचूक नेम साधला. सामना सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात मार्टिनेझने पुन्हा एकदा शानदार नेम साधला व एफसी गोवाची आघाडी वाढली.
यावेळी त्याला जय गुप्ता याच्या असिस्टचा लाभ मिळाला. पूर्वार्धातील खेळात एफसी गोवाच्या नोआ सदोई व ब्रँडन फर्नांडिस यांनीही धोकादायक चढाया केल्या, परंतु त्यांचे प्रयत्न असफल ठरले.
दृष्टिक्षेपात...
- एफसी गोवाचे ११ सामन्यांत ८ विजय, ३ बरोबरी
- हैदराबाद एफसीच्या १२ सामन्यांत ४ बरोबरी, ८ पराभव
- ३७ वर्षीय कार्लोस मार्टिनेझने यंदा आयएसएल स्पर्धेतील ११ लढतीत ५ गोल
- हैदराबादविरुद्ध ९ आयएसएल लढतीत एफसी गोवाचे ४ विजय, अन्य ३ लढतीत हैदराबाद विजयी, २ सामने बरोबरीत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.