राज्यात शनिवारपासून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असून आजपासून तीन दिवसांसाठी यलो अलर्ट तर त्यानंतर दोन दिवस ग्रीन अलर्ट जारी केला आहे.
तसेच सत्तरी, डिचोली, धारबांदोडा व सांगे या भागात ढगांच्या गडगडाटासह ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार रविवारी वाळपई-सत्तरी भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.
भुईपाल, पिसुर्ले, सालेली, खोतोडे, गुळेली, वांते या ठिकाणी रस्ते व वीज वाहिन्यांवर झाडे पडली. त्यामुळे या भागात काही काळ वीज खंडित झाली. रात्री उशिरा अग्निशमन दल व वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना भर पावसात या वाहिन्या दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत केला.
वास्को येथील मुंडवेल भागात दोन नारळाची झाडे, तर कुडचडे येथे एक झाड वीजवाहिन्यांवर पडले. फोंडा तालुक्यातील शांतीनगर, खांडेपार, साकोर्डे, फर्मागुडी, बोरी भागात आंबा, नारळ व वडाची मोठी झाडे उन्मळून पडली.
फर्मागुडी येथे एका दुकानासह दोन वाहनांवर झाडे पडून बरेच नुकसान झाले. बोरी येथे आंब्याचे झाड घरावर पडून सुमारे २० हजारांचे नुकसान झाले. कुंडई अग्निशमन स्थानकाच्या क्षेत्रात ३ ठिकाणी झाडे पडली. माशेल, आयडीसी कुंडई, मंगेशी येथे वाहनांवर झाडे पडली. ही झाडे हटविण्याचे काम रात्रभर सुरू होते.
पुढील आठवडाभर राज्यातील कमाल तापमान ३३ - ३५ अंश दरम्यानच राहणार आहे. पुढील पाच दिवस तरी कमाल तापमानात बदल अशक्य आहे. आज पणजी येथे कमाल ३४.६ तर किमान २५.६ अंश सेल्सियस, तर मुरगाव येथे कमाल ३३.८ तर किमान २५.७ अंश सेल्सियस तापमान होते.
- वाळपईला सर्वाधिक फटका
काल संध्याकाळी अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे वाळपई व फोंडा तालुक्यांत झाडे मोडून पडण्याच्या घटना घडल्या. फोंड्यात ५ तर वाळपईत ७ घटनांची नोंद झाली. जुने गोवे, करमळी, बांबोळी येथे रस्ते व वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीची काही काळ कोंडी झाली. डिचोली तालुक्यात भामई - पाळी व सोनशी - पाळी येथे जंगली झाडे वीजवाहिन्यांवर पडली. या पावसाचा सर्वाधिक फटका सत्तरी तालुक्यातील वाळपईला बसला.
१२ तासांत ४२ कॉल्स
शनिवारी पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर व वीज वाहिनींवर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाकडे गेल्या १२ तासांत ४२ आलेल्या विविध घटनांच्या कॉल्सपैकी २३ कॉल्स हे पावसामुळे पडलेल्या पडझडीचे होते. पुढील आठवडाभर राज्यातील तापमान सर्वाधिक ३४ अंश सेल्सियस तर किमान तापमान २५ अंश सेल्सियस अशी माहिती हवामान खात्याने दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.