goa rain update monsoon fishing crab food and childhood
goa rain update monsoon fishing crab food and childhood Dainik Gomantak
गोवा

खेकडे, कोबले आणि बालपण

Dainik Gomantak

ॲबिगेल क्रॅस्टो

गोव्यात पाऊस सुरू झाला, पाणी दुथड्या भरून वाहू लागले की मासेमारी करणे ही केवळ मच्छिमार समाजाची मिरास रहात नाही.अनेक हौशा-नवश्‍यांच्या हातात गळ येतो आणि उत्साहाने त्यांची पावले जवळच्या ओढ्या-खाड्यांच्या दिशेने वळतात. प्रत्येक गोमंतकीय कधीं ना कधी किमान एकदा तरी, पाण्यात गळ फेकून रोमांचितपणे, आदीम ध्यानमग्नतेत श्‍वास रोखून बसलाच असेल. (त्याच्या गळाला मासा लागलाच असेल असेही नाही.)

मला माझे बालपण आठवते. दिवाडी बेटावर लहानाचे मोठे होण्याचा एक फायदा होता. नदीचा किनारा लाभलेल्या त्या गावात मासे पकडायला जाणे हा एक सहज कार्यक्रम होता. माशांबरोबर तिथल्या खाडीत मिळणाऱ्या कुर्ल्या (खेकडे) हे देखील एक वेगळे आकर्षण होते.

खेकडे पकडायला जायचे हे आदल्या दिवशी ठरल्यानंतर जेव्हा आम्ही पहाटे उठायचो तेव्हा वडील कोबले (खेकडे पकडायचा सापळा) शोधत असताना दिसायचे. मग आम्ही सारेच त्यांना कोबले शोधण्यात मदत करायला लागायचो. शेवटी कोबले तिथेच सापडायचे जिथे ते आदल्या वर्षी व्यवस्थितपणे(?) ठेवून दिलेले असायचे. मग शेवटच्या मिनिटाला त्याची दुरुस्ती वगैरे केली जायची.

खेकड्यांना पकडण्याचे कोबले म्हणजे गोलाकार सळई, ज्यावर लोखंडी कांड्या तिरप्या रेषेत बसवून त्यावर सैल असे जाळे बांधलेले एक प्रकारचे घरगुतीच साधन होते. (आजही खेकडे पकडण्यासाठी बहुतेक लोक कोबल्याचाच वापर करतात.) आम्ही तयार होईपर्यंत आई आमिष म्हणून वापरण्यासाठी चिकनचे पाय, मांस किंवा लहान मासे वगैरेची पिशवी तयार करत असे. त्यानंतर ते कोबले, आईने दिलेली पिशवी, खायचे पदार्थ, लहान चाकू वगैरे घेऊन आम्ही नदीच्या किंवा खाडीच्या दिशेने निघायचो.

कोबल्यात आमिष नीट अडकवले जायचे आणि नंतर ते पाण्यात असलेल्या किंदळीच्या झाडांच्या मुळाशी एका दोरीला बांधून टाकले जायचे. दोरीला वर थर्मोकलचा तुकडा बांधलेला असायचा जो पाण्यावर तरंगायचा. त्यानंतरचा काळ म्हणजे संयमाची परीक्षा असायची. आम्हाला घरून दिलेल्या पोटॅटो चिप्स, पॅटीस किंवा चटणी सॅण्डविचवर ताव मारणे सुरू व्हायचे. आमच्यातली मोठी मंडळी थंडगार बियरचा आस्वाद घ्यायची. आम्हा लहान मंडळीसाठी सॉफ्ट ड्रिंक हे उन्हाच्या उष्णतेवरचा उतारा असायचे.

नियमित अंतराने मग कोबले पाण्यावर उचलले जायचे आणि त्यात खेकडा अडकला आहे किंवा आतले आमिष गायब झाले आहे का याची तपासणी व्हायची. कोबल्यात खेकडा आढळून आल्यास जल्लोष व्हायचा. त्यानंतर अगदी स्तब्ध होऊन कोबल्यातून खेकडा कौशल्यपूर्वक बाहेर काढला जायचा. खेकड्याची नांगी ही जीवघेणी वेदना देऊ शकते.

त्यामुळे खेकडा हातात पकडण्याचे कौशल्य असलेलाच आमच्यापैकी कुणीतरी ते काम करायचा. खेकड्याच्या कवचावर दाब देऊन त्याच्या नांग्या तोडल्या जायच्या आणि खेकडा पिशवीत टाकून पिशवी लगोलग बंद केली जायची. त्यानंतर आमिष अडकवलेले कोबले पुन्हा पाण्यात टाकले जायचे.

भरती किंवा ओहोटी सुरू होण्यापूर्वी पाणी एका पातळीवर येऊन संथ झालेले असते. ही वेळ खेकडे पकडण्यासाठी अतिशय योग्य असते ही माहिती आम्हाला वयस्कांकडून तेव्हा मिळाली होती. त्याशिवाय पाण्यात साचणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे किंवा तिथे वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे हेसुध्दा आम्हाला त्यावेळी त्यांच्याकडून माहीत झाले होते.

दुपार होईपर्यंत पकडलेले खेकडे घेऊन आम्ही घरी परतायचो आणि आई ‘कुर्ल्यांचे’ खमंग पदार्थ करायच्या तयारीला लागत असे. कधी शागुती, तर कधी शॅक-शॅक किंवा भरलेले खेकडे असा बेत असायचा. त्या दिवसात केबल टीव्ही किंवा फोन ही दुर्मिळ गोष्ट असायची त्यामुळे खेकडे पकडणे हा त्या काळी वेळ घालवण्याचा छान कार्यक्रम होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT