निष्ठावंतांना संधी!
वीजमंत्री सुदिन ढवळीकर जे बोलतात, ते करून दाखवतात, अशी त्यांची ओळख आहे. रवीपुत्र रितेश नाईक यांना भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली, तर मगोचा पूर्ण पाठिंबा असेल, असे ढवळीकरांनी पात्रांवना श्रद्धांजली वाहण्याची भावनाही व्यक्त केली होती. मात्र, राजकारणात समीकरणे बदलतात आणि इच्छुकांची संख्याही वाढते. रितेश नाईक आणि अपूर्व ढवळी यांच्यात उमेदवारीसाठी चर्चा सुरू असतानाच सुदिनबाबांनी २०२७ ची निवडणूक फोंड्यातून लढवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी इतर पक्षांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आता हीच अपेक्षा मगोमध्येही प्रत्यक्षात उतरली, तर? कवळे पंचायतीचे तब्बल पंधरा वर्षे सरपंचपद भूषविलेले राजेश कवळेकर हे मडकईतील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांना संधी मिळेल की नाही, हे पुढे कळेल; मात्र निष्ठावंतांना संधी देण्याच्या या मुद्द्यावरून आता मडकईतही चर्चेला रंग चढू लागला आहे!
चिकन खाणाऱ्यांची तारांबळ
एका गावात एक डॉक्टर खूप वर्षे प्रॅक्टिस करत होता. गाव साधे, लोक साधे. नव्या दमाच्या शिकलेल्या युवकांनी शोधून काढले – डॉक्टरची पदवी नकली, अर्थात रुग्णाची तपासणी करून औषधे देण्याची त्याची पात्रताच नव्हती. त्या दिवशी गावात अनेक जणांना घेरी आली. चार वर्षांपूर्वी घेतलेल्या या बनावट वैद्याची इंजेक्शने विषारी असतील, तर त्यांच्या परिणामाने शरीरात ती रसायने त्रास तर करत नसतील? मानसिक पातळीवर जास्त परिणाम झाला. सांगायचे तात्पर्य, मडगावला जे अत्यंत सुमार दर्जाचे चिकन एफडीएने पकडले, त्या वेळी कैक मांसाहारी लोकांची स्थिती अशीच झाली. ज्या तापमानात चिकनची साठवण होते, तसे ते राखले नव्हते. नासलेले, कुजलेले चिकन इतके दिवस पोटात गेले, त्यामुळे स्वास्थ्यावर आतून परिणाम तर सुरू होणार नाही ना, या विचारानेच तिथल्या चिकन सेवन करणाऱ्यांची झोप उडालीय.
असेही बाबूश मोन्सेरात
उत्पल पर्रीकर पक्षात येऊ अथवा न येऊ, किंवा त्यांना कुठूनही उमेदवारी देऊ, यबाबतीत बाबूश मोन्सेरात यांची प्रतिक्रिया प्रगल्भ राजकारण्यासारखी आहे. ते म्हणतात, पक्षात त्यांचे स्वागतच आहे. पक्ष काय तो निर्णय घेईल. बाबूशनी महानगरपालिका निवडणुकीत ७५ टक्के जागा प्राप्त केल्या व पणजीवर निर्विवाद प्रभुत्व प्राप्त केले, परंतु त्यामुळे ते उतले मातले नाहीत. उलट ते अधिक जबाबदार व सुस्पष्ट भूमिका व्यक्त करू लागले आहेत. बाबूश मोन्सेरात हे एकेकाळी चांगल्या प्रतिक्रियांबाबत प्रसिद्ध नव्हते, परंतु आता ते प्रगल्भ व बुद्धिमान प्रतिक्रिया देतात. त्यांना पुरते माहीत आहे, भाजपाला २०२७च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची आत्यंतिक गरज आहे. आपल्याशिवाय भाजपा पणजी व ताळगाव जिंकू शकत नाही. त्यांचे जुने विरोधक दत्तप्रसाद नाईक यांनाही माहीत आहे, भाजपा बाबूश यांच्याच बाजूने राहाणार. त्यामुळे त्यांनीही काँग्रेसचा मार्ग पत्करला़! बाबूश मात्र स्थिर आहेत.
त्यांना कोणतेही वचन दिलेले नाही!
लक्ष्मीकांत पार्सेकर व उत्पल पर्रीकर हे काल भाजपाचे सहसंघटनमंत्री शिवप्रसाद यांना भेटले ही बातमी चांगलीच चघळली गेली, परंतु भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणाले, तुम्ही त्या बातमीत जास्त अर्थ शोधण्याच्या भानगडीत पडू नका. भाजपाच्या मते, हे दोन्ही नेतेच संपर्क साधत असल्याने शिवप्रसाद यांना त्यांना भेटण्यास सांगण्यात आले. शिवप्रसाद हे मुख्य संघटनमंत्री बी. एल. संतोष यांचे साहाय्यक. गोव्यातून सतीश धोंड गेल्यापासून पूर्णवेळ संघटनमंत्री नाही. त्यामुळे शिवप्रसाद प्रामुख्याने राजकीय संघटनेचा विषय हाताळतात. पुढच्या महिनाभरात इतरही अनेकजण त्यांना भेटणार आहेत, परंतु भाजपाने याबाबतीत संपूर्णतः पारदर्शक व सुस्पष्ट धोरण स्वीकारले आहे. ज्या कोणी पक्षाशी बंडखोरी किंवा गद्दारी केली आहे, त्यांनी उमेदवारीची अपेक्षा न बाळगता पक्षात यावे. त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही. पुढच्या वेळी बघू! ही भूमिका काँग्रेस पक्षापेक्षा अधिक सुस्पष्ट व कडक आहे. भाजपाने कोणालाही उमेदवारीचे आश्वासन दिलेले नाही, परंतु दरवाजे मात्र खुले ठेवले आहेत.
वॉरनचा काँग्रेस प्रवेश!
आलेमाव कुटुंबातील सर्वांत तरुण राजकारणी म्हणून सध्या लोकांमध्ये परिचित असलेले वॉरन आलेमाव मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. वास्तविक, वॉरन यांचा काँग्रेस प्रवेश यापूर्वीच व्हायचा होता; पण या ना त्या कारणाने हा प्रवेश लांबणीवर पडला होता. आता अखेर तो मुहूर्त आला आहे. वॉरन आलेमाव यांच्याकडे बाणावली मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार का? की त्यांच्या उमेदवारीवरून आणखी एक रामायण घडणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उत्तम पार्सेकरांकडे लक्ष!
पेडणे या राखीव मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी पूर्ण तयारी केली आहे. मात्र, ते कोणत्या पक्षाकडून की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यांचे व्हॉट्सॲप स्टेटस मात्र बरेच काही सांगून जातात. त्यावरून अनेकजण ते पेडण्यातून सत्ताधारी भाजपचे उमेदवार असतील, असा अंदाज वर्तवू लागले आहेत. ‘आपण पेडणेवासीयांसाठी नवे नाही. सरकारच्या माध्यमातून ४० वर्षे त्यांच्या संपर्कात होतो आणि आजही पूर्णवेळ समाजकारण करत आहे,’ असे सांगत पार्सेकर यांनी आता माघार नाही, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे पेडण्याच्या राजकीय वर्तुळात उत्तम पार्सेकरांकडे लक्ष लागले आहे!
आव्हानासाठी निर्णय बदलला!
गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मारक ठरलेला रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्ष (आरजी) मनोज परब यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतल्यानंतर आमदार वीरेश बोरकर यांनी स्वत:च्या ताब्यात घेतला. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याचे निश्चित करून बोरकर यांनी संघटना बळकट करण्यावर भर दिलेली आहे. त्याचवेळी मनोज परब यांनी पुन्हा आरजीपीत परतण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. प्रसारमाध्यमांकडे दुर्लक्ष करून परब सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतचे संकेत देत असतानाच, त्यांचे विश्वासू तथा बोरकर यांनी हटवूनही स्वत:ला अजूनही पक्षाचे खजिनदार म्हणवून घेणाऱ्या अजय खोलकर यांनीही मनोज आरजीत परतण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय सन्यासानंतरही पुन्हा राजकारणात प्रवेश करू इच्छिणाऱ्या परब यांनी वीरेश बोरकरांसमोर आव्हान उभे करण्यासाठी निर्णय बदलला नाही ना? अशा प्रश्न आरजीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
दिगंबरांचा तालकांवर पूर्ण विश्वास
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे एका कार्यक्रमावेळी सांगितले. आपण मुख्यमंत्री असताना पश्चिम विभाग सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या नजरेसमोर केवळ एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे राजेंद्र तालक. आजपर्यंत त्यांनी या महोत्सवाला नवा रंग देत ‘कलारंग’ महोत्सव सलग २४ वर्षे साजरा करण्याचे काम करून दाखवले आहे. त्याचप्रमाणे, रवींद्र भवनच्या नूतनीकरणाचे कामही तालक यांनी पूर्ण जबाबदारीने विक्रमी वेळेत पूर्ण केले. कला अकादमीप्रमाणे येथील कामात कोणताही अडथळा आला नाही किंवा टीकाही झाली नाही. याचे श्रेय केवळ तालक यांना दिले पाहिजे, असेही कामत यांनी सांगितले. आता रवींद्र भवनच्या संलग्न इमारतीचे काम सुरू असून, त्या कामावरही तालक पूर्ण लक्ष ठेवून आहेत, असे दिगंबरबाबांनी सांगितले. दिगंबरबाबांची ही स्तुतिसुमने ऐकून तालकबाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल, हे नक्की.
बिबट्यांच्या घरात माणसांची वस्ती!
मांद्रेत बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला; पण घरातील व्यक्ती बाहेर आल्याने कुत्र्याचे प्राण वाचले आणि बिबट्याने तिथून पळ काढला. आता प्रश्न असा की, बिबटे जंगलातून थेट लोकवस्तीत येऊ लागले की माणसांनीच त्यांच्या घरात घुसखोरी सुरू केली? विकासाच्या नावाखाली जंगलांचा पट्टा कमी करून तिथे सिमेंटची जंगले उभी केली जात आहेत. मग बिबट्यांनी जायचे तरी कुठे? गंमत म्हणजे, जंगलावर कुऱ्हाड चालवताना कुणाला आठवण होत नाही; पण बिबट्या वस्तीत आला की जागृतीचे फलक झळकू लागतात. दुर्घटना घडण्यापूर्वी जंगलतोड रोखण्यासाठी पुढे येणारे हात मात्र कमीच! म्हणजे बिबट्याने आधी काहीतरी करावे, मगच प्रशासनाने जागे व्हावे, अशीच का आपली विकासाची नवी व्याख्या? असा सवाल मात्र दबक्या आवाजात विचारल्या जात आहे.
प्रसिद्धीसाठी अट
सरकारची कामगिरी जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे सरकारने ठरवले आहे. समाजमाध्यमांचा चपखल वापर करण्यासाठी हे काम गोवा मनोरंजन संस्थेकडे सोपवण्यात आले. रील्स, पत्रके, छायाचित्रे, व्हिडिओ आदी माध्यमांतून प्रसिद्धी केली जाणार आहे. यापूर्वी युवा वर्गाला अशी संधी देण्यात आली होती. आताही सरकार तसेच काही करेल, असे वाटत असतानाच हे काम मिळवण्यासाठी तीन वर्षांत पाच कोटी रुपयांची उलाढाल झालेली असावी, अशी अट घालण्यात आली. त्यामुळे ही अट नेमकी कोणाला डोळ्यांसमोर ठेवून घातली असावी, याचा अंदाज प्रत्येक जण लावत आहे. आता या अटीमुळे नव्या उद्योजकांना संधी मिळणार की अनुभवी कंपन्यांनाच मैदान खुले होणार, याचीच चर्चा सुरू आहे!
असाही काब्राल भक्त!
‘वन मेन्स फूड कॅन बी अनादर मेन्स पॉइसन’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. एखादा माणूस एकासाठी देवमाणूस असू शकतो, तर दुसऱ्यासाठी दानव ठरू शकतो. कुडचडे मतदारसंघात आमदार नीलेश काब्राल यांच्यावर टीका करणारे अनेक जण सापडतील; मात्र ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात काब्राल यांचे गुणगान करणारा एक काब्रालभक्त लोकांना पाहायला मिळाला. रवींद्र भवनाबाहेर सत्तरी ओलांडलेले एक ज्येष्ठ नागरिक काब्राल यांची स्तुती करीत होते. ‘लोक काहीही म्हणोत, आमच्या ताटात काब्राल यांच्यामुळे अन्न पडते. काब्राल पुढे आमदार असोत वा नसोत, त्यांनी केलेले काम सदैव जनतेच्या हृदयात राहणार,’ अशा शब्दांत या ज्येष्ठ नागरिकाने काब्राल यांना प्रमाणपत्रच दिले. आता याला म्हणतात निष्ठा!
१० हजारांचे मानधन!
मत्स्योद्योग खात्याने खाते आणि मच्छीमार यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी तसेच विस्तारविषयक कामे करण्यासाठी सागर मित्र नेमण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, ३८ सागर मित्रांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे. सध्या त्यांना केवळ १० हजार रुपये मानधन, तर प्रोत्साहन म्हणून पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली जाणार आहे. काही वर्षांनी सेवेत कायम करा, अशी मागणी करत आंदोलन करणाऱ्यांत या सागर मित्रांचाही समावेश असेल, असे आताच सांगता येते. असे असले, तरी विज्ञान शाखेतील पदवीधर केवळ १० हजार रुपयांच्या मानधनावर काम करण्यास तयार होतील, असे सरकारी खात्याला वाटते. यावरून राज्यातील बेरोजगारीच्या भीषणतेची सरकारला पुरेपूर कल्पना असल्याची चर्चा यानिमित्ताने ऐकू येत आहे!
निष्ठावंतांना संधी!
वीजमंत्री सुदिन ढवळीकर जे बोलतात, ते करून दाखवतात, अशी त्यांची ओळख आहे. रवीपुत्र रितेश नाईक यांना भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली, तर मगोचा पूर्ण पाठिंबा असेल, असे ढवळीकरांनी पात्रांवना श्रद्धांजली वाहण्याची भावनाही व्यक्त केली होती. मात्र, राजकारणात समीकरणे बदलतात आणि इच्छुकांची संख्याही वाढते. रितेश नाईक आणि अपूर्व ढवळी यांच्यात उमेदवारीसाठी चर्चा सुरू असतानाच सुदिनबाबांनी २०२७ ची निवडणूक फोंड्यातून लढवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी इतर पक्षांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आता हीच अपेक्षा मगोमध्येही प्रत्यक्षात उतरली, तर? कवळे पंचायतीचे तब्बल पंधरा वर्षे सरपंचपद भूषविलेले राजेश कवळेकर हे मडकईतील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांना संधी मिळेल की नाही, हे पुढे कळेल; मात्र निष्ठावंतांना संधी देण्याच्या या मुद्द्यावरून आता मडकईतही चर्चेला रंग चढू लागला आहे!
आज पुन्हा तोच खेळ!
मडगाव पालिकेतर्फे जुन्या मासळी मार्केटच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या बहुमजली पझल पार्किंग प्रकल्पाची कोनशिला उद्या, रविवारी बसविण्यात येणार आहे. वास्तविक, या जागेत हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र, त्याचे नामकरण आता ‘पझल पार्किंग’ असे कसे झाले, याचे पझल सर्व मडगावकरांना पडले आहेच; पण त्याहीपेक्षा लोकांच्या तोंडी एकच प्रश्न आहे, तो म्हणजे ११ वर्षांपूर्वी जे घडले, त्याची ही पुनरावृत्ती तर नाही ना? २०१५ साली दिगंबर कामत आमदार असताना अशाच एका पार्किंग प्रकल्पाची कोनशिला बसविण्यात आली होती. मात्र, ११ वर्षांत या प्रकल्पाची फाईल एक इंचही पुढे सरकली नाही. आता पुन्हा एकदा त्याच जागी पार्किंग प्रकल्पाची कोनशिला बसविण्यात येत आहे. त्यामुळे कालचाच खेळ आज पुन्हा सुरू झालेला नाही ना, असे मडगावकरांना वाटल्यास त्यात नवल ते काय!
कुठ्ठाळीतही भाजप!
कुठ्ठाळीत आतापर्यंत अपक्ष आमदार आंतोन वाझ यांचा भाजप सरकारला पाठिंबा होता; आता भाजपनेच तिथे संपर्क कार्यालय थाटून २०२७ मध्ये ‘मिशन ३० प्लस’चा नारा दिला आहे. म्हणजे आजवर पाठिंब्याच्या कुबड्या चालत होत्या की आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू झाली आहे, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे! सरकारला पाठिंबा देणारे आमदार आणि त्याच मतदारसंघात विजयाचा झेंडा रोवण्याची घोषणा करणारा भाजप, या राजकीय समीकरणाची गंमतच न्यारी! आता संपर्क कार्यालयातून जनसंपर्क वाढणार की विद्यमान आमदाराशी राजकीय अंतर, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास, कुठ्ठाळीत भाजपने कार्यालय उघडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे पाठिंबा कायम असला, तरी राजकीय हिशेब मात्र नव्याने मांडले जात असल्याचे संकेत मिळत आहेत!
कुंकळळीत विशाल देसाई?
गोवा जनमत कौलाच्या वेळी ज्योत काढून गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी झटलेले दिवंगत स्वातंत्र्यसैनिक शाबू देसाई यांचे सुपुत्र विशाल देसाई यांना भाजप कुंकळळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशाल देसाई यांना ‘पुढे चला’ असा संदेश पक्षाने दिल्याचे सांगण्यात येते. विशाल देसाई घरोघरी जाऊन भाजप कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊ लागले आहेत. भाजपपासून दूर गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी विशाल धडपडत असल्याचे कळते. त्यांना उमेदवारी मिळाल्यास कुंकळळीत निवडणूक चुरशीची होण्याची अपेक्षा आहे. आता विशाल देसाई यांना उमेदवारी मिळाल्यास उमेदवारीसाठी इच्छुक असलेले सुदेश भिसे आणि त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे!
समझनेवाले को इशारा काफी!
‘आरजी’चे माजी अध्यक्ष मनोज परब पुन्हा समाजमाध्यमांवर सक्रिय झाले आहेत. शनिवारी त्यांनी एक पोस्ट केली असून, त्यात आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले . पोगोची व्याख्या, गोव्यासाठी म्हादईचा मुद्दा, बेकायदेशीर वस्त्या पाडणे, बेकायदेशीर स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, पक्षांतर करणाऱ्यांना तसेच भाजपच्या माजी आमदारांना किंवा नेत्यांना तिकीट न देणे, जमीन दलालांना उमेदवारी नाकारणे आणि नोकरी व जमीन आरक्षण केवळ पोगोंसाठी ठेवणे, या मुद्द्यांचा कार्यक्रमात समावेश आहे का, अशी विचारणा त्यांनी केली आहे. ‘गोवा लक्ष ठेवून आहे. मुद्दा सरकार बदलण्याचा नाही, तर धोरण आणि प्रणाली बदलण्याचा आहे,’ असेही परब यांनी म्हटले आहे. आता हे प्रश्न नेमके कोणासाठी आहेत, याची चर्चा सुरू होणे स्वाभाविकच! त्यामुळे ‘समजनेवाले को इशारा काफी होता है!’ असेच म्हणावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.