Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: भाजपविरोधक साष्टीवर निर्भर?

Khari Kujbuj Political Satire: भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचे असेल, तर साष्टी काबीज करावी लागेल, याची जाणीव भाजपविरोधकांना आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

भाजपविरोधक साष्टीवर निर्भर?

भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचे असेल, तर साष्टी काबीज करावी लागेल, याची जाणीव भाजपविरोधकांना आहे. जनमत कौलाच्या विजयात साष्टीचे योगदान किती होते, याची जाणीव कदाचित आजच्या भाजपविरोधकांना असेल. याच कारणामुळे मनभेद व मतभेद विसरून भाजपविरोधक युती करण्याच्या प्रयत्नात असणार. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई असोत किंवा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव असोत, एवढेच काय, आरजी असोत किंवा आप असोत, सगळ्या साष्टीच्या नेत्यांना साष्टीचे राजकीय वजन कमी झाल्याची खंत असणारच. एक काळ होता, जेव्हा राजकारणात साष्टीचे मोठे महत्त्व होते. बांदोडकरांच्या काळात साष्टी ‘युजी’ पक्षाचा बालेकिल्ला होता. त्यानंतर साष्टी काँग्रेसचा बालेकिल्ला झाला होता. आज मात्र साष्टी विरोधकांतच वाटल्यामुळे भाजपासाठी अॅडव्हांटेज ठरला आहे.

हा अधिकाराचा दुरुपयोग नव्हे?

‘बॉस इज ऑल्वेज राईट’ असतोच असे नव्हे. याचे भान आपल्या सरकारी अधिकाऱ्यांनी ठेवायला हवे. अधिकाराबरोबर जबाबदारी येते, हे अधिकारप्राप्त झालेल्यांना समजले नाही, तर तो अधिकाराचा गैरफायदा ठरतो. निवडणुका आल्या किंवा जनगणनेचे काम आले की या कामाचा ज्यांच्याकडे ताबा असतो, त्या अधिकाऱ्यांमधील बॉस जागा होतो. निवडणूक व जनगणनेच्या कामामुळे जे संविधानातील अधिकार प्राप्त झाले आहेत, त्यामुळे काही अधिकाऱ्यांना आपण राष्ट्रपती किंवा राज्यपाल झाल्यासारखे वाटते. राज्यात सध्या जनगणनेचे काम सुरू झाले आहे. काही सरकारी कर्मचारी, ज्यांना जनगणनेचे काम पडले आहे, ते आपले राजकीय वजन वापरून जनगणनेचे काम रद्द करून घेतात. अशा वेळी काही सरकारी अधिकारी, ज्यांचा गॉडफादर नाही, अशा सरकारी कर्मचाऱ्यांना भीती दाखवून जनगणनेच्या कामात सामावून घेतात. रात्री-अपरात्री मोबाईलवर मेसेज पाठवून किंवा त्या कर्मचाऱ्याच्या कार्यालयात तातडीने माणूस पाठवून कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामासाठी जबरदस्ती करावी, हे लोकशाहीत शोभते काय?

रेजिनाल्ड काँग्रेसमध्ये जाणार?

कुडतरीचे अपक्ष आमदार रेजिनाल्ड बाब हे एरवी काँग्रेसची तत्त्वे अनुसरून पुढे आलेले. मध्यंतरी त्यांनी भारतीय जनता पक्षाचा हात धरला. त्यामुळे कुडतरीत काँग्रेस पक्षातील स्थानिक नेत्यांची संख्या वाढली. कित्येक जण निवडणुकीसाठीही आपली इच्छा व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे रेजिनाल्ड बाब यांचा पुन्हा काँग्रेसप्रवेश कठीण वाटतो. आगामी निवडणुकीत रेजिनाल्ड बाब यांना काँग्रेसप्रवेशाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. पण हल्लीच कुडतरीत काँग्रेसच्या ‘गोंय राखण यात्रे’च्या वेळी युरी बाब यांनी रेजिनाल्ड यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे रेजिनाल्ड व्यथित झाले असतील. शिवाय, आता काँग्रेसमध्ये जावे की नको, असा प्रश्नही त्यांना पडला असेल. तरी शेवटी ते राजकारणी आहेत. यातून काही तरी मार्ग काढतीलच, अशी आशा त्यांचे समर्थक बाळगून आहेत.

गिरीशचा रिपोर्ट

काँग्रेसच्या ‘गोवा रक्षण यात्रे’ला मडगावात पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी उपस्थित राहिले. त्यावेळी व्यासपीठावर राहुल यांना स्पायरल बाइंडिंग केलेला एक डॉक्युमेंट दाखवतानाचा गिरीश चोडणकर यांचा फोटो व्हायरल झाला आहे. गिरीश व राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहिल्यास ते डॉक्युमेंट म्हणजे गोव्यातील ४० मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांचा सर्व्हे रिपोर्ट असल्याची चर्चा काँग्रेस भवनात सुरू झाली आहे. आता, खरोखरच गिरीशनी तसा रिपोर्ट राहुल गांधींना दिला की काय, हे पुढे कळेलच. पण, फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्व इच्छुक उमेदवार म्हणे या रिपोर्टची प्रत मिळविण्यासाठी आणि ती खरोखरच उमेदवारीविषयी आहे काय, हे जाणून घेण्यासाठी धडपडत आहेत.

धीरयो हप्त्याचा रेट वाढला

सासष्टीत धिरयो सर्रास आयोजित केल्या जातात, हे काही आता नवीन राहिलेले नाही. पोलिसांच्या आशीर्वादानेच या झुंजी लावल्या जातात. कुणीतरी सांगत होता की, पूर्वी त्यासाठी पोलिसांना पंचवीस हजार रुपये हप्ता दिला जात होता. आता पोलिसांनी नवीन दर लागू केला असून, तो तीस हजार रुपये इतका आहे. मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात नावेलीतील तळावली व दियालगोन येथे धिरयांचा धुरळा उडाला होता. प्रत्येक झुंजीमागे तीस हजार रुपये हा नवीन हप्ता दर लावला होता. ठाण्यातील काही पोलिस तर फक्त या धिरयोवाल्यांकडून हप्ता घेण्याच्या कामावरच असतात. बड्या साहेबांपर्यंत हप्ता पोहोचविण्याचे काम ते इमानइतबारे करतात, हीच त्यांची ड्युटी, आता बोला!

कोर्टाचा आदेश तरी आठवा...

पणजीत दयानंद बांदोडकर मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीपर्यंत शनिवारी सायंकाळी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी केवळ एका पोलिसावर होती. पोलिसांना उच्च न्यायालयाच्या आदेशांचीही आठवण राहत नसावी, अशी परिस्थिती होती. वाहने वाटेल तशी उभी, रस्ते खोदलेले आणि वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. जवळपास दोन हजार कोटी रुपये खर्च करूनही कस्टम हाऊसनजीक रस्त्यांची ही अवस्था असेल, तर जाब कोणाला विचारावा, हा प्रश्न आहे.

रोहितची ‘विकासदौड’!

पणजीच्या राजकारणात रोहित मोन्सेरात यांची विकासदौड सध्या चर्चेत आहे. महापौरपदाची जबाबदारी सांभाळताना ते शहरातील विविध भागांचा आढावा घेत असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याकडे पणजीचे संभाव्य उमेदवार म्हणूनही पाहिले जात आहे. त्यामुळे शहराच्या विकासकामांना गती देण्यावर त्यांचा भर दिसतो. एकेकाळी दुर्लक्षित राहिलेल्या भाटले परिसराकडेही आता लक्ष वळले आहे. नगरसेवक प्रज्योत वायंगणकर, ताळगाव ग्रामपंचायतीचे आग्नेलो दा कुन्हा आणि विविध सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे या भागाची पाहणी केली. पाणी निचरा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि मोकळ्या जागांचा योग्य वापर अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. राजकारणात विकासकामांतून जनतेपर्यंत पोहोचण्याला विशेष महत्त्व असते. आता या विकासदौडीचा फायदा भाटलेवासीयांना कितपत मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

म्हापशात विरोधक सुप्तावस्थेत!

म्हापसा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय समीकरणांनी वेग घेतला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी भाजपच्या गोटात अंतर्गत चढाओढ शिगेला पोहोचली आहे. विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा, मयूर सावकार आणि गुरुप्रसाद पावसकर या तिन्ही नेत्यांनी उमेदवारीवर ठाम दावा ठोकत समर्थकांसह थेट जनतेशी संवाद आणि गाठीभेटी वाढवल्याने भाजपपुढेही आव्हान उभे झाले आहे. सत्ताधारी गोटातून शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरू असताना, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र कमालीची उदासीनता दिसते. राज्यव्यापी ‘राखण यात्रा’ संपून पंधरवडा उलटला, तरी काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व मैदानात पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात भाजपमधील ही अंतर्गत कुरघोडी अखेर आत्मघातकी ठरणार की विरोधकांची हीच निरुत्साही भूमिका सत्ताधाऱ्यांचा विजयाचा मार्ग आणखी सुकर करणार, याकडे लक्ष लागले आहे.

वालांका फुटबॉल निवडणुकीत

‘आधी लगीन कोंडण्याचे, मग रायबाचे’, असे तानाजी मालुसरेने छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितले होते. चर्चिल आलेमाव यांच्या कन्या वालांका आलेमाव आपल्या वडिलांचा फुटबॉल आणि राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत वालांका यांनी नावेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र, मतदारांनी त्यांना यावेळी माघारी पाठविले होते. वडिलांचा राजकीय वारसा चालविण्यात अपयश आले असले तरी वालांका यांनी फुटबॉलचा वारसा पुढे चालविला आहे. त्या राष्ट्रीय फुटबॉल संघटनेवर निवडून आलेल्या आहेत. त्याचबरोबर चर्चिल ब्रदर्स संघाने आयएसएल फुटबॉल लीग स्पर्धेत स्थान मिळविले आहे. आता वालांका गोवा फुटबॉल संघटनेच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. विद्यमान अध्यक्षांच्या विरोधात त्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत. विधानसभा निवडणुकीआधी गोवा फुटबॉल संघटनेची निवडणूक जिंकून आपले राजकीय वजन वाढविण्याचा वालांकाचा प्रयत्न कितपत सफल होतो, हे पाहावे लागेल.

‘आरजी’ कुणाचा?

रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स पक्षात (आरजी) अंतर्गत बंडाळी माजून मनोज परब यांनी अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिल्‍यापासून मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर या दोन गटांतील वाद वारंवार चव्‍हाट्यावर येत आहे. पक्ष आपल्‍याच ताब्‍यात असल्‍याचा दावा दोन्‍ही गटांकडून होत आहे. त्‍यावरून एकमेकांना कायदेशीर कारवाईच्‍या धमक्‍याही देण्‍यात येत आहेत. पण, दोन्‍हीही गटांकडून कायदेशीर कारवाईसंदर्भात पुढील पाऊल उचलले जात नसल्‍याने आणि सत्‍य बाहेर पडत नसल्‍याने पक्ष नेमका कुणाचा? असा प्रश्‍‍न दोन्‍ही गटांच्‍या कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

गोवा डेअरीतही मराठी

राज्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी जोर धरत असतानाच गोवा डेअरीच्या सर्वसाधारण सभेत मराठीला डावलल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. गेली अनेक वर्षे सभेचे कामकाज मराठीतून करण्याची परंपरा असताना, दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेत इतिवृत्त वाचनातून मराठीला वगळण्यात आल्याने मराठीप्रेमी दूध उत्पादकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी आवाज उठवताच प्रशासनाला आपल्या चुकीची दखल घ्यावी लागली. अखेर झालेली चूक दुरुस्त करण्याची ग्वाही गोवा डेअरी प्रशासनाने दिली. मराठीचा प्रश्न केवळ भाषेपुरता मर्यादित नसून तो अस्मितेचाही आहे, याची जाणीव या घटनेने पुन्हा करून दिली. मराठीला डावलाल, तर आवाज उठणारच, हे दूध उत्पादकांनीही दाखवून दिले.

फिलिप नेरी इन ॲक्शन!

माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस यांचा गेल्या आठवड्यात वाढदिवस झाला. त्यानिमित्त शिर्ली येथील त्यांच्या निवासस्थानी ‘बर्थडे पार्टी’ आयोजित करण्यात आली होती. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक असल्याने फिलिपबाबाने आपला हा वाढदिवस दणक्यात साजरा केला. वेळ्ळी मतदारसंघातून ते पुन्हा एकदा आपले नशीब आजमावू पाहत आहेत. या मतदारसंघाचे त्यांनी चारदा प्रतिनिधित्व केले आहे. पुन्हा एकदा आमदार बनण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. भाजपशी सख्य असल्याने त्यांनी सध्या आमदार नसतानाही वेळ्ळीतील अनेकांची कामे केली आहेत. मात्र, ते कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची जोखीम घेणार नाहीत. कारण वेळ्ळीत भाजपची डाळ शिजणार नाही, हे न समजण्याइतके ते दुधखुळे नाहीत. आता फिलिप सर कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार, याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांनाही लागून राहिली आहे. तूर्तास ‘वेट अँड वॉच’.

भाजपविरोधक साष्टीवर निर्भर?

भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचे असेल, तर साष्टी काबीज करावी लागेल, याची जाणीव भाजपविरोधकांना आहे. जनमत कौलाच्या विजयात साष्टीचे योगदान किती होते, याची जाणीव कदाचित आजच्या भाजपविरोधकांना असेल. याच कारणामुळे मनभेद व मतभेद विसरून भाजपविरोधक युती करण्याच्या प्रयत्नात असणार. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई असोत किंवा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव असोत, एवढेच काय, आरजी असोत किंवा आप असोत, सगळ्या साष्टीच्या नेत्यांना साष्टीचे राजकीय वजन कमी झाल्याची खंत असणारच. एक काळ होता, जेव्हा राजकारणात साष्टीचे मोठे महत्त्व होते. बांदोडकरांच्या काळात साष्टी ‘युजी’ पक्षाचा बालेकिल्ला होता. त्यानंतर साष्टी काँग्रेसचा बालेकिल्ला झाला होता. आज मात्र साष्टी विरोधकांतच वाटल्यामुळे भाजपासाठी अ‍ॅडव्हांटेज ठरला आहे.

...म्‍हणून उत्‍पलनी शब्‍द दिला नाही!

भाजपचे राष्‍ट्रीय सहसंघटन सचिव शिवप्रकाश यांच्‍या भेटीनंतर माजी मुख्‍यमंत्री लक्ष्‍मीकांत पार्सेकर भाजपात पुन्‍हा प्रवेश करण्‍यासाठी तयार झाले आहेत. परंतु, माजी मुख्‍यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकर यांचे सुपूत्र उत्‍पल पर्रीकर यांनी मात्र पक्षात परतण्‍याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्‍यातच मंत्री तथा पणजीचे विद्यमान आमदार बाबूश मोन्‍सेरात यांनी, उत्‍पल भाजपात आले तरी पणजीतून आपणच लढणार असल्‍याचे शनिवारी जाहीर केल्‍याने आणि आपल्‍यामुळे भाजपला ताळगाव, सांताक्रूजमध्‍ये कसा फायदा होईल? हेही वरिष्‍ठांना समजावून सांगितले. धोरणांनुसार सरकार स्‍थापनेसाठी भाजप बाबूशनाच पसंती देणार हे माहित असल्‍यामुळेच उत्‍पलनी भाजप प्रवेशाचा शब्‍द शिवप्रकाश यांना दिला नसल्‍याची चर्चा पणजीत सुरू आहे.

दक्ष संकेत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. या संचलनाची ख्याती अशी की, यात भाग घेणारी व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली, तरी एक साधा सैनिक याच भावनेने ती या संचलनात सहभागी होते. रविवारी गोव्यात ठिकठिकाणी अशी संचलने झाली. कुडचडे येथे झालेल्या केपे तालुकास्तरीय संचलनात संकेत आर्सेकर आघाडीवर होते. त्यांनी दक्ष स्थितीतील आपला फोटो समाजमाध्यमांवर शेअर केला. सध्या संकेत सावर्डे मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असून, त्यांचा संघाशी असलेला हा संबंध त्यांना उमेदवारीपर्यंत घेऊन जाणार का?

गावडेंचा ढवळीकरांना सल्ला!

प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी मडकईतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून मंत्री सुदिन ढवळीकर यांना सल्ला दिला आहे. या सल्ल्यातून गावडे यांनी आत्मविश्वास दाखविला आहे. त्यांनी मडकईतून राजेश कवळेकर यांना उमेदवारी द्यावी, त्यांना आपण बिनविरोध निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारतो, असे ढवळीकरांना सूचित केले. त्यामागे निष्ठावान कार्यकर्त्याबाबत ढवळीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ आहे. परंतु अजून तरी ढवळीकरांनी काही उत्तर दिले नाही. परंतु ते मडकईतून पुत्र मिथिलला उमेदवारी देण्यासाठी आतुरलेले असल्यामुळेच फोंड्यातून आपण रिंगणात उतरणार, असे सांगत आहेत. ढवळीकर काय म्हणतात, याची उत्सुकता कवळेकर समर्थकांबरोबर ढवळीकर-गावडे समर्थकांना लागली आहे, हे नक्की.

लढवय्या सबिना

गोव्याच्या पहिल्या मांडवी पुलाच्या बांधकामातील कामगारांना बेकायदेशीररीत्या कामावरून कमी करण्यात आले. न्यायासाठीचा त्यांचा लढा तब्बल ३४ वर्षे चालला. अखेर उत्तर प्रदेश राज्य सेतू निगमची याचिका उच्च न्यायालयाने विलंबाच्या कारणावरून फेटाळली आणि कामगारांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अधिवक्ता म्हणून पहिल्याच उच्च न्यायालयीन खटल्यात हे यश मिळवणाऱ्या सबिना मार्टिन्स यांचे विशेष कौतुक. पणजीतील नामांकित शिक्षणसंस्थेत अध्यापनाची जबाबदारी सांभाळून अन्यायग्रस्तांसाठी लढणाऱ्या सबिना यांची जिद्द आणि सामाजिक बांधिलकी खरोखरच प्रेरणादायी आहे. स्वतःच्या कामातून वेळ काढून दुसऱ्यांना न्याय मिळवून देणारी माणसेच समाजाची खरी ताकद असतात! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांची धडक; पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर अपघात, अनेक जण जखमी VIDEO

Ishan Kishan Injury Update: टीम इंडियाला मोठा धक्का! तिसऱ्या टी-20 सामन्यातूनही ईशान किशन बाहेर; BCCI ने दिली दुखापतीबाबत मोठी अपडेट

Digital Banking: 'पूर्वी फोन बँकिंग, आता घरोघरी डिजिटल बँकिंग'; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Rohit Sharma Retirement Rumors: 'यापूर्वीही अशा अफवा ऐकल्या...' रोहित शर्माचा निवृत्तीच्या चर्चेवर मोठा खुलासा, हिटमॅन नेमकं काय म्हणाला? पाहा VIDEO

Crime News: संजय नाईक खूनप्रकरणाला नवे वळण! खून होताना तिघे दारात, दोघे साक्षीदार

SCROLL FOR NEXT