Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: काँग्रेसची ज्योत ठेवली तेवत...

Khari Kujbuj Political Satire: सावियो कुतिन्हो यांनी सध्या दिल्लीत तळ ठोकला आहे. ‘एसआयआर’ मोहिमेंतर्गत गोव्यातील, विशेषतः काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांची नावे मुद्दामहून वगळण्यात आल्याचा दावा करत त्यांनी थेट दिल्ली गाठली.

गोमंतक ऑनलाईन टीम

काँग्रेसची ज्योत ठेवली तेवत...

काँग्रेसच्या पडझडीच्या काळात अमित पाटकर यांनी राज्यात काँग्रेसची ज्योत तेवत ठेवली. पक्ष चालवण्यासाठी जे जे काही करावे लागते, ते त्यांनी आजवर केले. काँग्रेसमधील सर्वांना एकत्र ठेवणे हीच मोठी तारेवरची कसरत असते आणि पाटकर यांनीही त्याचा अनुभव घेतला. काँग्रेस पक्षाची पिछेहाट सर्व पातळ्यांवर होत असताना पक्षाचा कार्यकर्ता काँग्रेससोबत राहील, याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे होते. गट समित्या सक्रिय करत पाटकर यांनी ते कामही केले. काँग्रेसची धुरा कोणाकडे जाणार, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना पाटकर यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती.

सावियोंचा दिल्लीत तळ...

सावियो कुतिन्हो यांनी सध्या दिल्लीत तळ ठोकला आहे. ‘एसआयआर’ मोहिमेंतर्गत गोव्यातील, विशेषतः काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांची नावे मुद्दामहून वगळण्यात आल्याचा दावा करत त्यांनी थेट दिल्ली गाठली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निवेदन सादर करून या प्रकरणात विशेष लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यालयातही त्यांनी निवेदन सादर केले आहे. गोव्यात मध्यावधी निवडणुकांची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. त्यातच सावियोबाब मडगाव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यापूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती; मात्र त्यावेळी त्यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. आता पुन्हा एकदा ते आपले राजकीय नशीब आजमावण्याच्या तयारीत दिसत आहेत. मडगावातून युवा उद्योजक चिराग नाईक हेही काँग्रेसच्या उमेदवारीच्या शर्यतीत असून त्यांना स्थानिक प्रदेश समितीचा पाठिंबा आहे. काँग्रेसमधील या सर्व हालचालींवर ज्येष्ठ नेते दिगंबर कामत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. आणि हो... मडगावच्या बाबाचे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी जुने आणि जवळचे संबंध आहेत, हे विसरून चालणार नाही!

कुंकळ्ळीत भाजपकडून बाबू की सुभाष?

कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी योग यावा लागतो, असे म्हणतात. विद्यमान मंत्री सुभाष फळदेसाई व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे राजकीय भवितव्य काय असेल, असे विचारले जात आहे. सांगे व केपे मतदारसंघ एसटीसाठी राखीव होणार अशी चर्चा आता जोर धरू लागल्यामुळे बाबू व सुभाष यांना कुठे सामाहून घेणार, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत. भाजप म्हणे, बाबू किंवा सुभाष यांपैकी एकाला कुंकळळी मतदारसंघाची उमेदवारी देण्याबाबत विचार करीत असल्याची चर्चा आहे. सुभाष फळदेसाई यांना कुंकळळी मतदारसंघाची उमेदवारी घेण्यात स्वारस्य असल्याचे सांगण्यात येते. पण बाबू कवळेकर यांनाही म्हणे कुंकळळी मतदारसंघात काम करण्याचे आदेश मिळाल्याचीही बातमी आहे. त्यामुळे कुंकळळीत भाजपचा नक्की उमेदवार कोण असेल, या प्रश्नाने भाजप कार्यकर्त्यांना बुचकळ्यात टाकले आहे.

‘डिस्को राणे’चा मध्यरात्रीचा धिंगाणा!

काणकोण पोलिस उपअधीक्षक कार्यालयाशी संलग्न असलेल्या आणि ‘डिस्को राणे’ या नावाने सर्वत्र परिचित असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने मध्यरात्री एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे फुटेज व्हायरल झाल्याने सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे. मद्यधुंद अवस्थेत या पोलिस कर्मचाऱ्याने एका फास्ट फूड स्टॉलवरील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होत असून घटनेचे फुटेज काणकोणमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. आता याप्रकरणी तक्रार दबावाखाली तडजोडीत मिटवण्यात आल्याचाही आरोप केला जात आहे. अशा प्रकारच्या मारहाण प्रकरणाला संरक्षण देण्याचा हा दुसरा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू असून संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी काही नागरिकांकडून करण्यात येत आहे. या ‘डिस्को राणे’ला आवर घालावा, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

‘भाभी’ची लगबग...

मडगाव पालिकेची निवडणूक नेमकी कधी होणार, याचा अजूनही थांगपत्ता नाही. मात्र, निवडणूक झाली की अनेक माजी नगरसेवक पुन्हा मैदानात उतरणार, हे जवळपास निश्चितच मानले जात आहे. त्यात माजी उपनगराध्यक्षा बबिता नाईक यांचे नावही आघाडीवर आहे बरं का! प्रभाग क्रमांक २५ मधून पुन्हा एकदा नशीब आजमावण्याची त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. या प्रभागात त्या ‘भाभी’ म्हणूनच अधिक परिचित आहेत. सध्या पालिकेवर प्रशासक असला तरी प्रभागातील नागरिकांची छोटी-मोठी कामे करून देण्यासाठी त्यांची धावपळ सुरूच असते. पालिकेच्या कार्यालयात त्यांची उपस्थितीही कायम दिसून येते. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर फॉरवर्डवाल्यांशीही त्यांचा जुना स्नेह कायम आहे. राजकारणात टिकायचे असेल तर सर्वांशी ‘कनेक्ट’ राहावे लागते, हे बबिताभाभींना चांगलेच उमगलेले दिसते. त्यामुळे निवडणुकीची घोषणा व्हायची बाकी असली तरी भाभींची लगबग मात्र आतापासूनच सुरू झाली आहे!

युरी आलेमाव फॉरेनला?

गोव्यात सध्या जन आंदोलने चालू आहे. ‘रेंट-अ-कॅब'' ने धुमाकूळ घातला आहे. सत्ताधारी भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. परतु, गोव्याचे विरोधी पक्षनेते तथा कॉंग्रेस विधीमंडळ गटनेते युरी आलेमाव मात्र परदेशवारीला गेल्याचे कळते. फादर बोलमेक्सच्या अंत्यविधीला ते उपस्थित नव्हते. शुक्रवारी मडगावात युवक कॉंग्रेसच्या ‘नीट'' पेपर फुटीविरोधात व वाढत्या बेरोजगारी विरोधात झालेल्या आंदोलनाला ते गैरहजर राहिले. महत्वाचे म्हणजे, गोवा घटकराज्य दिनी ते परदेशात असतील. युरीबाबनी नरेंद्र मोदींचे परदेशवारी न करण्याचे आवाहन झुगारून विदेश दौरा आखला असावा, अशी खोचक टिप्पणी आंदोलनात सहभागी झालेले करू लागले होते, आता बोला.

आनंदले काँग्रेसजन...

गिरीश चोडणकर यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आणि जुन्या-जाणत्या काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. अनेकांनी ही वार्ता एकमेकांना फोनवरून सांगितली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने योग्य निर्णय घेतल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली आहे. गिरीश यांनी तामिळनाडूत काँग्रेसला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणे साहजिकच होते. पक्षाने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देऊन पक्षश्रेष्ठींची गिरीश यांच्यावर असलेली मर्जी सिद्ध केली होती. आता त्यांच्यावर गोव्यात काँग्रेसचे पुन्हा सरकार आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसजन आनंदले.

सांगे राखीव झाला तर!

सांगे मतदारसंघ राखीव झाला तर पक्ष मला दुसरीकडे सामावून घेईल, असं म्हणत मंत्रीमहोदयांनी आधीच ‘सेफ लँडिंग’ची तयारी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक अजून दूर असली तरी मतदारसंघ बदलाच्या शक्यतांनी राजकीय गणितं तापली आहेत. ‘पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते मान्य’ हा नम्रतेचा सूर असला तरी दुसऱ्या मतदारसंघात जागा पक्की करण्याची चाचपणी सुरू झाल्याचे बोलले जातेय. सध्या सांगेतील विकासापेक्षा ‘पुढचा मतदारसंघ कोणता?’ याच प्रश्नाची अधिक चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे.

मायकलचा आत्मविश्वास...

मायकलचा आत्मविश्वास आमदार मायकल लोबो यांनी शुक्रवारी मोठ्या आत्मविश्वासाने प्रतिक्रिया दिली. सध्या महिला आमदाराला मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता असल्याने पुरूष आमदाराचा पत्ता कापला गेला आहे, हे इच्छुकांना समजून आले असेलच... त्यामुळेच आमदार मायकल लोबो यांनी आपण सध्या मंत्रिपदाच्या शर्यतीत कुठेही नाही, असे स्पष्ट केले असावे. शिवाय २०२७ मध्ये मी मंत्रिपदाच्या शर्यतीत नक्कीच असेन, असाही आत्मविश्वास व्यक्त केला आहे. यावरून मायकल यांनी वाऱ्याची दिशा नक्कीच ओळखलेली आहे. सध्याच्या मंत्र्यांच्या कामाचे रिपोर्टकार्ड प्रदेशाध्यक्षांनी दिल्ली दरबारी दिली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या कार्डचा विचार पुन्हा भाजप सत्तेत आल्यानंतर मंत्रिपद देण्याबाबत नक्कीच होणार, याची आता अनेकांनी मनाशी खुणगाठ बांधली असेल. काही झाले तरी ज्या पद्धतीने मायकल यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे, त्यावरून त्यांच्या समर्थकांना एकप्रकारे निवडून आणण्यासाठी कामाला लागा, असा संदेश दिला असावा, असे भाजपचा पदाधिकारी हॉटेलमधील आवारात कुजबुजू लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट' पेपरफुटीप्रकरणी आंदोलन, भाजप कार्यालयावर मोर्चा; गोवा काँग्रेस पक्षाकडून जोरदार टीका

Goa Noise Pollution: ध्वनिप्रदूषण नियमांची 'ऐशीतैशी', कारवाईत पक्षपातीपणा; किनारी भागातील स्थानिकांचा आरोप

पर्यटन हंगामात निवडणुका म्हणजे अर्थकारणावर घाला! निवडणूक पुढे ढकलण्यासाठी 'टीटीएजी'चे मुख्यमंत्र्यांना पत्र

Goa Congress: गिरीश चोडणकर पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खजिनदारपदी दत्ता दामोदर नायक यांची निवड

Goa Accident: भाच्याला घरी सोडताना मामावर काळाचा घाला; शिवोलीत रेंट-अ-थारचा थरार, स्थानिक तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT