Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज; आता पालिका कशा व्यवस्थित चालतात?

Khari Kujbuj Political Satire: नोव्हेंबर महिन्यात आलेमाव घराण्यातील दोघांचे वाढदिवस. ८ नोव्हेंबरला माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांचा व १६ नोव्हेंबरला युरी आलेमाव यांचा वाढदिवस.

गोमंतक ऑनलाईन टीम

आता पालिका कशा व्यवस्थित चालतात?

लोकशाहीत आपल्याला अधिकार दिले आहेत, हे खरे; मात्र अधिकारांबरोबर जबाबदारी येते हे आपण विसरता. राज्यातील बहुतांश नगरपालिका मंडळावर सध्या ॲडमिनिस्ट्रेटर नेमलेले असून काही अपवाद वगळता पालिकांचे कामकाज आता पूर्णपणे सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात आहे. मडगाव, कुंकळ्ळी, कुडचडे, काणकोण व इतर पालिका आता नगराध्यक्ष नसताना व्यवस्थित चालत आहेत. कोणत्याही पालिकेत गडबड, गोंधळ झाल्याचे ऐकायला मिळत नाही. पालिका मंडळ असताना सतत अविश्वास ठराव व पालिका मंडळाच्या बैठकीत आरोप-प्रत्यारोप जास्त होत होते. काही ठिकाणी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या भांडणामुळे जनतेची कामे अडून राहत होती. पालिका व्यवहारात नगरसेवकांचा हस्तक्षेप होत असल्यामुळे आम जनतेला त्रास सहन करावे लागत असल्याच्या बातम्या रोज ऐकायला मिळत होत्या. मात्र, आता मुख्याधिकारी व प्रशासक पालिका छान चालवतात, असा जनतेचा अनुभव आहे. जर नगराध्यक्ष नसताना पालिका नीट चालत असतील तर पालिका मंडळाची काय गरज? असा प्रश्न आता जनता विचारायला लागली आहे.

वाढदिवसाला कोण बरे येणार?

नोव्हेंबर महिन्यात आलेमाव घराण्यातील दोघांचे वाढदिवस. ८ नोव्हेंबरला माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांचा व १६ नोव्हेंबरला युरी आलेमाव यांचा वाढदिवस. गेल्यावर्षी युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळीत वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विजय सरदेसाई, मनोज परब यांच्यासह इतर नेत्यांना व्यासपीठावर आणून त्यांनी हात वर करून ‘एक नवी सुरवात’चा नारा दिला होता; परंतु विरोधी ऐक्याचे ग्रॅंड ओपोजिशन अलायन्स काही अजूनही घडले नाही. आता, १६ तारखेला विरोधी पक्षनेत्यांनी परत एकदा आपल्या वाढदिवसाचे ग्रॅंड आयोजन करण्याचा बेत आखला आहे. आगामी विधानसभा निवडणुका अगदी जवळ असताना युरी आलेमाव सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सर्व विरोधी पक्ष सोडा, किमान ‘आरजी’च्या दोन्ही गटांना जरी युरी आलेमावनी एकत्र आणले व मनोज-वीरेशसोबत हात वर काढले तरी खूप झाले, अशी चर्चा ‘आरजी’च्या पाटो परिसरात जुन्या कार्यालय परिसरात चालली होती.

संकल्प यांची सत्त्वपरीक्षा

मुरगावचे आमदार आणि नवनिर्वाचित मंत्री संकल्प आमोणकर यांनी मंत्रिपदाचा ताबा घेण्यापूर्वीच कामाचा धडाका सुरू केला आहे. त्यांना मिळालेल्या कृषी, नागरीपुरवठा आणि हस्तकला या खात्यांचा ते रितसर आढावा घेत आहेत. सोमवार ते बुधवार तीन वेगवेगळ्या खात्यांची झाडाझडती घेतल्यावरच ते गुरुवारी कार्यालयात पाऊल ठेवणार आहेत. अवघ्या दोन महिन्यांच्या काळात जनतेच्या हितासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा त्यांचा हा ‘संकल्प’ कौतुकास्पद असला, तरी ही त्यांच्यासाठी एक सत्त्वपरीक्षाच आहे. राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा सुरू आहे की, या अत्यंत कमी वेळेत आमोणकर आपल्या खात्यांचा कायापालट कसा करतील आणि त्यांना त्यात किती यश येईल?

कागदावरच बदली की प्रत्यक्षातही?

पणजी पोलिस स्थानकातील एका पोलिस उपनिरीक्षकाची जानेवारी महिन्यात वाळपई पोलिस स्थानकात बदली झाली आहे. मात्र, वर्ष संपत आले तरी साहेबांचा पणजीतील मुक्काम काही हलण्याचे नाव घेत नाही. नरकासुरावेळी मोठ्या आवाजात स्पीकर वाजवणाऱ्यांवर कारवाई करताना याच उपनिरीक्षकाने मिक्सरवर लाठी फिरवल्याचीही चर्चा रंगली होती. त्यानंतर युवकांनीही साहेबांची कुंडली काढायला सुरवात केली आहे, अशी चर्चा आहे. आता प्रश्न एवढाच की, बदलीचे आदेश सर्वसामान्य पोलिसांसाठी असतात की काहींसाठी ते केवळ कागदावरच राहतात? वाळपईची वाट पाहता पाहता वर्ष सरत आले; पण साहेबांची पणजीवरील माया काही कमी होईना. या विशेष सवलतीमागचे गुपित काय ते पोलिस खात्यानेच स्पष्ट करावे, म्हणजे चर्चा तरी संपेल.

दयानंद सोपटे जोरात

मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे सध्या फॉर्ममध्ये आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण पक्षाने आपल्याकडेच दिले होते असे सांगून मध्‍यंतरी त्यांनी हवा निर्माण केली होती. पार्सेकर यांच्या पक्षप्रवेशाचे पुढे काय झाले, यावर त्यांनी भाष्य केलेले नसले तरी दिवाळीनिमित्त भाजपच्या मांद्रे कार्यालयात लक्ष्मीपूजन करून त्यांनी पुढील संकेत दिले आहेत. हा मतदारसंघ भाजपचाच आहे, असे सोपटे सांगत आले आहेत. ‘मगो’ने पेडणे मागितल्यास भाजप मांद्रेवर दावा करेल, असा हा सरळ सोपा हिशेब आहे. त्यामागे सोपटे यांचेच नियोजन असल्याचे दिसते.

जॉब स्कॅमला जबाबदार कोण?

‘‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे’’ या कवितेचा अर्थ जॉब स्कॅम करणाऱ्या एजंटानी भलताच घेतला आहे असे दिसते. लाच घेणाऱ्याएवढाच लाच देणाराही गुन्हेगार आहे, हे आपण विसरता कामा नये. आपल्या गोव्यात अनेक जॉब स्कॅम गाजले. सरकारने आता स्टाफ सिलेक्शन कमिशन सुरू केले तरी लोक जॉब स्कॅम करणाऱ्या स्कॅमरच्या जाळ्यात अडकतात. काणकोणातील एका भावोजीने मेहुणीला प्राथमिक शिक्षिकेची नोकरी मिळवून देण्यासाठी बारा लाख रुपये दिले. बारा लाखही गेले आणि नोकरी मिळाली नाही, हे कळल्यावर त्या भावोजीला जाग आली. आता बारा लाख घेणारे दोषी आहेतच; मात्र नोकरीसाठी बारा लाख देणारा भावोजीही तेवढाच गुन्हेगार नाही का? गरम दुधाने तोंड पोळळ्यावरही अक्कल येत नसेल तर त्याला काय म्हणावे?

फ्लेक्सवाल्यांची चांदी

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने फ्लेक्स आणि बॅनरवाल्यांची मात्र चांदी झाली आहे. जानेवारीत निवडणूक होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी दिवाळीच्या शुभेच्छांच्या निमित्ताने नाक्यानाक्यांवर, बाजारपेठांत मोठमोठे बॅनर आणि कटआऊट लावले आहेत. पूर्वी निवडणुकीच्या काळात भिंती रंगवून प्रचार केला जायचा; आता फ्लेक्सने रस्ते सजू लागले आहेत. अर्थात, मतदारांना शुभेच्छा देण्यामागे केवळ सणाचा उत्साह नसून निवडणुकीचे गणितही दडलेले आहे. नेत्यांची प्रसिद्धी होतेय, मतदारांना शुभेच्छा मिळताहेत आणि इच्छुकांची जनसंपर्क मोहीमही सुरू झाली आहे. या सगळ्या धामधुमीत सर्वाधिक आनंद कुणाला होत असेल, तर तो फ्लेक्सवाल्यांना! नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे त्यांची दिवाळी मात्र यंदा चांगलीच उजळली आहे.

नावाची ॲलर्जी?

फोंड्यात सध्या दिवाळीच्या शुभेच्छांचे पोस्टर्स जागोजागी झळकत असून, त्यात राजकीय नेत्यांच्या पोस्टर्सची संख्या लक्षणीय आहे. शुभेच्छांचे पोस्टर्स लावण्यापर्यंत सारे काही ठीक; पण ते फाडण्यामागचे कारण काय, हा खरा प्रश्न आहे. रितेश नाईक यांचे दिवाळीच्या शुभेच्छा देणारे पोस्टर कुणीतरी फाडल्याने या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. आता पोस्टर फाडणाऱ्याला रितेश यांच्या नावाची ॲलर्जी आहे की, फोंडाभर झळकणारे त्यांचे नाव खटकतेय? की यामागे काही वेगळेच राजकीय गणित आहे? हे मात्र पोस्टर फाडणाऱ्यालाच ठाऊक! राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार नवीन नाहीत; पण शुभेच्छांच्या पोस्टर्सवरही राग काढण्याची वेळ का यावी? या प्रकारामुळे फोंड्यात चर्चेला नवा विषय मिळाला आहे. शुभेच्छा देण्यापेक्षा त्या पुसण्याचीच घाई कोणाला झालीय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

कटाऊटचा भास!

सध्या मंत्री-आमदारांचा वाढदिवस म्हटले की, २५-३० फूट उंचीचे कटआऊट उभारले जाऊ लागले आहेत. असा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून बाजूच्या राज्यांत सुरू आहे; पण गोव्यात आता हा ट्रेंड सुरू झाला आहे. वाढदिवसानिमित्त पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन केदार नाईक यांचा कटआऊट पिळर्णच्या फुटबॉल मैदानाच्या बाजूला उभारले आहे. नाईक यांचे कटआऊट येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधत आहे; परंतु त्यांच्या कटआऊटच्या खाली म्हणजे पायाजवळ त्यांचे नाव लिहिलेला फलक आहे. आणि तो फलक गटाराच्या लाद्यांवर ठेवला आहे. त्यामुळे नाईक यांचा कटआऊट पाहणाऱ्यांना तो गटारावर उभारला आहे, असा भास होतो.

विशाल देसाई यांची नरकासुर स्पर्धा गाजली!

राजकारणात यश मिळवायचे असेल तर बरेच काही खर्च करावे लागते, हे आपण जाणतो. कुंकळ्ळी मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असणार, हे जवळ-जवळ स्पष्ट झाले आहे. भाजपचे उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असलेले विशाल देसाई यांनी खंड पडलेली नरकासुर स्पर्धा कुंकळ्ळीत पुन्हा सुरू करून वाहवा मिळविली. विशाल देसाई यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन भव्य अशी नरकासुर वध स्पर्धा आयोजित केली होती. नरकासुर वध स्पर्धा पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती. नरकासुर वध स्पर्धेच्या आयोजनातून विशाल देसाई यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

फोंड्यातील मतदारांची चंगळ!

चतुर्थीपाठोपाठ फोंड्यातील काही राजकारण्यांनी दिवाळीतही मतदारांना भेटवस्तूंची खैरात केली आहे. मतदारांना भेटवस्तू देण्यात गैर काहीच नाही; पण एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात सुरू असलेली ही भेटवस्तूंची स्पर्धा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. फोंड्यात अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागल्याने ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवण्याची जणू चढाओढच सुरू आहे. कोणाची भेट मोठी, कोणाची अधिक आकर्षक, याकडेही लक्ष आहे. असो. पण या राजकीय स्पर्धेमुळे सध्या फोंडावासीयांची मात्र चंगळ आहे बुवा. भेटवस्तू मिळतात, कडधान्य मिळते आणि बरंच काही; मतदारांची दिवाळी यंदा खऱ्या अर्थाने गोड झाली म्हणायची!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नेड्डा, सिल्पाबाबतच्‍या 'अधिकृत नोंदी' नाकारा! अजय खोलकरांचे बोरकरांना आव्‍हान

8th Pay Commission Updates: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा? वर्षातून दोनऐवजी 4 वेळा डीए वाढवण्याचा नवा प्रस्ताव; 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी घडामोड

Britain To Goa Flights: ब्रिटनमधून गोव्यात विमानफेऱ्यांत वाढ, 'टीयूआय'च्या पाच थेट फेऱ्या; 32,000 विमान आसने उपलब्ध

Mapusa Sexual Assault Case: विकृत प्रवृत्ती ठेचून काढा! म्हापसा अत्याचारप्रकरणी मुख्‍यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश

Rohit Sharma World Record: 400 Sixer... फक्त 'इतके' षटकार आणि रोहित शर्माच्या नावावर ऐतिहासिक विश्वविक्रम! वनडे क्रिकेटमध्ये घडणार नवा इतिहास

SCROLL FOR NEXT