Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज; काँग्रेसचा 'हात' कोणाबरोबर?

Khari Kujbuj Political Satire: भाजपमध्ये जाऊन मंत्री झालेले संकल्प आमोणकर हे काँग्रेसमध्ये असताना सध्याचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांच्याबरोबर एकत्रित काम करीत होते; परंतु आमोणकर यांनी आमदार होऊन मंत्रिपदापर्यंत मजल मारली.

गोमंतक ऑनलाईन टीम

काँग्रेसचा ‘हात’ कोणाबरोबर?

धडाडीच्या महिला नेत्या मनीषा उसगावकर यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली असली तरी त्या पक्षापासून दुरावलेल्या नाहीत. सध्या उसगावकर यांचे दीपावलीच्या शुभेच्छा देणारे फलक उसगाव परिसरात नजरेस पडू लागले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश करणारे समाजकार्यकर्ते मिलिंद प्रभू यांचेही शुभेच्छा फलक लक्ष वेधत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे उसगावकर यांच्या फलकावर काँग्रेसचे ‘हात’ हे चिन्ह झळकत आहे, तर प्रभूंच्या फलकावर ‘हात’ चिन्ह दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसचा ‘हात’ नक्की कोणाबरोबर? असा प्रश्न उसगाव-सत्तरीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला असणार आहे. ∙∙∙

गोविंद गावडेंची दांडी!

शुक्रवारी बाळ्‍ळी येथे जो ‘उटा’चा मेळावा झाला त्‍याला प्रियोळचे आमदार गोविंद गावडे हे उपस्‍थित नव्‍हते. यावेळी झालेल्‍या भाषणात प्रकाश वेळीप यांनी आदिवासींवर झालेल्‍या अन्‍यायाविरोधात सरकारात असलेले आमदार का आवाज काढत नाहीत, असा सवालही केला. आता त्‍यांचा रोख गोविंद गावडे यांच्याकडेही होता की काय माहीत नाही. खरे तर गोविंद गावडे हे प्रकाश वेळीप यांचे समर्थक, असे म्‍हटले जायचे; पण ‘उटा’मधीलच काही सदस्‍य सांगतात, ‘उटा’चे महत्त्वाचे पदाधिकारी असलेले दुर्गादास गावडे यांचे गोविंद गावडे यांच्‍याशी मतभेद झाले आहेत. शुक्रवारच्‍या मेळाव्‍यात गोविंद गावडे अनुपस्‍थित राहण्‍यामागे हे एक कारण तर नव्‍हते ना? काहीका असेना, ‘उटा’चे सारेच महत्त्वाचे नेते अडचणीत आले आहेत व त्यांचे समाजपुरुष त्यांच्याकडे संशयाने पाहतात!

दिवाळीला महागाईचा कहर

मडगाव शहरात काणकोणचे लेखक स्थायिक झाले आहेत. दोन लेखक काल सकाळी बाजारात गेले होते, दिवाळी खरेदीसाठी. दहा रुपये कारीट पाहून त्यांना धक्का बसला. आजपर्यंत कधी इतकी महागाई या रानटी फळासाठी आली नव्हती. काणकोणला कुंपणावर ही रानफळे वेलीला लागलेली फुकटच मिळतात, असे लेखकांनी सांगितले. वाटाघाटी झाल्यावर पावसामुळे पीक झडल्याने कारिटे मुळात मिळतच नाहीत, असे उत्तर मिळाले. लेखकांनी दहा रुपये एक दराची कारिटे विकत घेतली. यंदा पोहेही ८० रुपये किलोवरून १०० ते १२० रुपयांपर्यंत पोहोचले होते. आकाशकंदीलाचे दर आकाशाकडे झुकलेत. तथापि रात्री बारानंतर डिजेचा आवाज बंद, हा कोर्टाचा आदेश बहुतेक गोवेकरांना आवडला. अशीच बंदी, शिस्त नववर्षाच्या कार्यक्रमांवेळी व अन्य कार्यक्रमांना असावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. महागाईचे चटके सोसूनही लोकांची उमेद टिकून आहे.

‘उटा’ची हस्‍तक्षेप याचिका का नव्हती?

राजकीय आरक्षण आव्‍हान याचिकेच्‍यावेळी गोवा सरकारने ‘एसटीं’ची बाजू मुंबई उच्‍च न्‍यायालयासमोर प्रभावीपणे मांडली नाही, असा आरोप ‘उटा’चे अध्‍यक्ष प्रकाश वेळीप यांनी शुक्रवारी बाळ्‍ळी येथे झालेल्‍या ‘उटा’च्‍या मेळाव्‍यात करत महत्त्वाची माहिती सरकारने न्‍यायालयापासून का लपवून ठेवली, याचे उत्तर आता मुख्‍यमंत्री डॉ. प्रमाेद सावंत यांनी दिले पाहिजे, असे म्‍हणत थेट मुख्‍यमंत्र्यांनाच आव्‍हान दिले. हे सरकार सुरवातीपासून आदिवासींवर अन्‍याय करते, असा आरोपही प्रकाशरावांनी केला. आता प्रश्‍न आहे तो, प्रकाश वेळीप यांना हे सरकार आदिवासींवर अन्‍याय करत आहे, हे जर माहीत होते तर उच्‍च न्‍यायालयात जेव्‍हा याचिका दाखल केली गेली त्‍यावेळी त्यांनी सगळेच काही सरकारवर विसंबून राहून का सोडून दिले? या आव्‍हान याचिकेत ‘उटा’ संघटनेला हस्‍तक्षेप याचिका दाखल करण्‍यापासून कुणी बरे रोखले होते? भाजप नेतेच अपेक्षू लागले तर त्यांचे काय चुकले?

म्हापशात पुढच्या आमदारकीचा खेळ

म्हापसा शहरातील रस्ते, कचरा आणि मूलभूत नागरी समस्या मांडण्यासाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’ ही समिती स्थापन झाली आहे. वरवर ही केवळ जागरूक नागरिकांची चळवळ भासत असली, तरी तिच्या अंतरंगात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे, समितीचा खरा उद्देश नागरी समस्या सोडविणे हा आहे की पुढच्या आमदारकीचे ‘लॉन्चिंग पॅड’ तयार करणे? या समितीत विजय भिके, जितेश कामत आणि महेश राणे यांसारखे मुरब्बी राजकीय चेहरे सक्रिय असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. समितीच्या गोटातून तर छातीठोकपणे असा दावा केला जात आहे की, म्हापशाचा पुढील आमदार याच मंचावरून विधानसभेत पोहोचणार! आता कार्यकर्त्यांचा हा अफाट आत्मविश्वास नेमका कशाच्या जोरावर आहे आणि शहरात पडद्यामागे नक्की कोणती राजकीय खिचडी शिजते आहे, याचीच चर्चा सध्या रंगत आहे.

कवठणकरांनी धडा घ्यावा!

भाजपमध्ये जाऊन मंत्री झालेले संकल्प आमोणकर हे काँग्रेसमध्ये असताना सध्याचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांच्याबरोबर एकत्रित काम करीत होते; परंतु आमोणकर यांनी आमदार होऊन मंत्रिपदापर्यंत मजल मारली. यातून आमोणकरांच्या वाटचालीतून किमान कवठणकर यांनी धडा घ्यायला हरकत नाही. त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे; पण आमदार तरी होण्यासाठी प्रयत्न करायला काही हरकत नाही. केवळ पदे घेऊन मिरवण्यापेक्षा निवडणुकीच्या रिंगणात उतरून कर्तृत्व सिद्ध करण्याचे प्रयत्न करणे अपेक्षित आहे. कदाचित आमोणकर मंत्री झाले हे कवठणकरांना मनातून रुचलेही नसेल. वास्तव स्वीकारणेही गरजेचे नाही का?

पणजीत कार्यक्रम करताना विचार हवा

पणजीतील निवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणाऱ्या व्यावसायिक कार्यक्रमांमुळे वाहतूक कोंडी होते. नागरिकांना होणारा त्रास ही आता गंभीर चिंता बनली आहे. नुकत्याच कांपालच्या बांदोडकर मैदानावर भरविण्यात आलेल्या तीन दिवसीय ऑक्टोबर फेस्टदरम्यान, त्याचवेळी मिरामार येथे झालेल्या आयर्नमॅन गोवा ट्रायथलॉन स्पर्धेमुळे बांदोडकर मार्गावरील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली होती. परिणामी, राजधानीतील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. आधीच वाहतुकीचा ताण असलेल्या या शहरात अशाप्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी का दिली जाते, हे समजणे कठीण. पणजीमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था मुळातच नाही. नागरिकांना वारंवार अशा गैरसोयींना सामोरे जावे लागू नये यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन ताळगावच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे स्थलांतरित करण्याचा विचार करावा, अशी लोकांची मागणी आहे. तेथे मोकळी जागा आणि चांगली पार्किंग सुविधा आहे. लोकहितासाठी दूरदृष्टी नको का?

दिव्या राणे यांच्याबद्दल गौरवोद्‌गार

गोव्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसली, तरी पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांचे काम कोणत्याही मंत्र्यापेक्षा कमी नाही, असे गौरवोद्‌गार दस्तुरखुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काढले आहेत. गोवा वन विकास महामंडळासारख्या दुर्लक्षित विभागाला त्यांनी नवसंजीवनी दिली. विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी या महामंडळाचा कारभार एखाद्या सक्षम मंत्र्याप्रमाणे चालवला. त्यामुळे डॉ. दिव्या राणे मंत्रिपदाचे सर्व निकष पूर्ण करतात. दामू नाईक यांच्या या विधानामुळे राणे समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. महिला आमदाराला ज्यावेळी मंत्रीपद देण्याचा विचार होईल, त्यात त्यांना अग्रक्रम असेल, अशी चर्चा रंगू लागली आहे.

संकल्पची साधी राहणी

मुरगावचे आमदार संकल्‍प आमोणकर हे साध्या पॅन्ट-शर्टमध्ये मंत्रिपदाच्या शपथविधीला आले. तो त्यांचा नेहमीच पेहराव होता. एरव्ही मंत्रिपदी कधी संधी मिळणार तेव्हा ती घेऊ म्हणून सूट शिवून ठेवणारे काही कमी नाहीत. काहींचे असे सूट कपाटात विरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अधूनमधून रंगते. अशा या वातावरणात संकल्प यांचा साधेपणा नजरेत भरणारा होता. खुद्द मुख्यमंत्र्यांनाही ‘अरे सूट का घातला नाही’, असे त्यांना विचारण्याचा मोह आवरता आला नाही. संकल्प यांचे वडील पद्मनाभ हे नेहमीच पांढऱ्या शुभ्र सफारीत असतात. मंत्रिपदाचा शपथविधी सोहळाही त्यांच्यासाठी अपवाद नव्हता.

रेजिनाल्डचा देवावर विश्वास

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचा निवडणुकीला केवळ तीन ते चार महिने बाकी असताना मंत्रिमंडळात समावेश झाला. रवी नाईक यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळातील रिकाम्या जागेवर अनेकांचे डोळे होते. मुख्यमंत्री पुष्कळ खाती सांभाळतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक खात्यावर योग्यप्रकारे देखरेख ठेवणे शक्य होत नाही, असे काहीजण अप्रत्यक्षरीत्या किंवा आपसांत बोलत होते. आमोणकर यांच्या शपथविधीनंतर कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स जे सरकारला पाठिंबा देत आहेत, त्यांना त्यांच्या मंत्री होण्याच्या स्वप्नाबद्दल विचारले तेव्हा ते सांगतात, प्रत्येकाला मंत्री होण्याची स्वप्ने पडतात. रेजिनाल्डबाब २००७ पासून म्हणजे जवळ-जवळ १८ ते १९ वर्षे आमदार आहेत. मात्र, त्यांना एकदाही मंत्री होण्याची संधी मिळालेली नाही. यावर बोलताना ते सांगतात आपल्या जीवनात जे-जे घडते ती देवाची योजना असणार. आपल्याला हवे ते लगेच मिळत नसते, त्यालाही वेळ यावी लागते. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते पाचव्यांदा कुडतरीतून निवडून आले तर मंत्रिपदासाठी निश्र्चितच प्रयत्न करतील, असे लोक बोलू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Job Scam: शिक्षिका होण्याचे स्वप्न दाखवून 12 लाख उकळले! सरकारी नोकरीच्या नावाखाली गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Weather Update: गोमंतकीयांना उन्हाचे चटके! तापमानाचा पारा 35 अंशांवर, पुढील काही दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता

Goa Cabinet Expansion: मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्याची एन्ट्री! संकल्प आमोणकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, खाती सोमवारी मिळण्‍याची शक्‍यता

ST Political Reservation: सरकारनंतर 'मिशन'ही सुप्रीम कोर्टात, 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी न्यायालयीन लढा आणखी तीव्र

नरकासुरांचा उच्‍छाद! ज्‍येष्‍ठ नागरिक हवालदिल; मध्‍यरात्रीपर्यंत गोंगाट, न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशाच्या अंमलबजावणीपूर्वीच ध्वनिप्रदूषणाचा कळस

SCROLL FOR NEXT