पणजी: राज्यातील पर्यटन क्षेत्राला अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि जबाबदार बनवण्याच्या उद्देशाने शुक्रवारी गोवा पोलिसांतर्फे किनारपट्टी भागातील पर्यटन भागधारकांसोबत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबचे मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. हॉटेल बुकिंगच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत या बैठकीत एक विशेष सायबर सुरक्षा सल्ला देखील जारी करण्यात आला असून भागधारकांना व संबंधितांना याविषयी नेहमी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस पोलिस महानिरीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक, वाहतूक पोलिस अधीक्षक यांच्यासह उपअधीक्षक, किनारपट्टी पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक आणि वाहतूक पोलिस अधिकारी उपस्थित होते. याशिवाय, पर्यटन विभागाचे अधिकारी आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले होते. सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आणि परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या.
तसेच हॉटेल व आस्थापनांचे प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग नेहमी मोकळे ठेवणे आणि अग्निशमन सुरक्षा सुनिश्चित करणे, बाउन्सरसह सर्व कर्मचाऱ्यांचे वर्तन ग्राहकांशी अत्यंत नम्र आणि शिस्तीचे असणे आवश्यक, परिसरात सुरू असलेल्या कोणत्याही बेकायदेशीर हालचाली किंवा संशयास्पद गोष्टींची माहिती त्वरित पोलिसांना देणे, पर्यटकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती किंवा घटना हाताळण्यासाठी स्थानिक पोलिस व वाहतूक पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
शांततापूर्ण पर्यटनाला चालना देण्यावर चर्चा
गोवा पोलिस आणि हॉस्पिटॅलिटी उद्योग यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे, सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देणे, कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आणि गोव्यात जबाबदार व शांततापूर्ण पर्यटनाला चालना देणे, या मुद्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान भागधारकांना अनेक सूचना करण्यात आल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.