Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ...हा बळी गोव्याचा की, दोन खासदारांचा? 'खरी कुजबूज'

Goa Politics: गोव्याच्या हिताविरुद्ध वाटत असेल तर सत्ताधारी पक्षाने राजीनामे देऊन रोष व्यक्त करावा.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: म्हादई प्रश्न अखेर कर्नाटक सरकारच्या बाजूने झाला. भाजपला कर्नाटकातील विधानसभा निवडणूक कोणत्याही स्थितीत जिंकायची आहे. तेथील 28 खासदारांचा आकडा मोठा असल्याने गोव्यातील दोन खासदार आले काय आणि गेले काय, त्यांना काहीही फरक पडणार नाही. म्हणून तर पाणी वळवताना गोव्यातील दोन खासदारांचा बळी दिला आहे. विशेष म्हणजे, गोव्यातील जनता विसरभोळी आहे.

खाण व्यवसायाची वाताहत झाली, तरीही केवळ आश्वासने देऊन भाजप निवडणूक जिंकून येते. उद्या कदाचित गोव्यातील मतदार म्हादई विसरून भाजपला पुन्हा निवडून देतील, असा सुद्धा केंद्राचा होरा असेल. मग विरोध करण्यासाठी कोण शिल्लक राहणार? खरे तर सत्य बोलणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहात नाही.

जनतेला फसवे मायाजाल हवे असते. तेच विरोधी पक्षाला उभे करायला जमत नाही म्हणून ही स्थिती निर्माण झाली आहे. हा निर्णय गोव्याच्या हिताविरुद्ध वाटत असेल तर सत्ताधारी पक्षाने राजीनामे देऊन रोष व्यक्त करावा. जनतेच्या हितासाठी राजीनामा दिल्यास जनता तुमच्या पाठीशी नक्कीच राहील.

काहीही झाले तरी भाजपने सत्तेचा सौदा करून म्हादईला तिलांजली दिली. भविष्यात काय परिणाम होणार हे कोणीही टाहो फोडून सांगितले तरी अंध भक्तांना खरे वाटणार नाही. अजून काही वर्षे जाऊ द्या, परिणाम त्या वेळी कळेल. पण वेळ निघून गेलेली असेल, असे लोक म्हणत आहेत.

गडकरींचे रेशमी चिमटे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक आवर्जून थांबतात. ते जे बोलतात, त्यात तथ्य असतेच. शिवाय त्यांना व्यासपीठावरील एखाद्या व्यक्तीला ज्या काही कानपिचक्या द्यायच्या असतात, त्या दिल्याशिवाय राहात नाहीत, भले मग ते आपल्या पक्षातील का असेनात. गडकरी यांनी गुरुवारी झुआरी पुलाच्या उदघाटनप्रसंगी राज्य सरकारला काही कानपिचक्या दिल्या, त्याही प्रदूषणावर.

गोव्यातील जल, वायू प्रदूषणाकडे सरकारने लक्ष द्यायलाच हवे. त्याशिवाय संगीत पार्ट्यांमधील कर्णकर्कश ध्वनी प्रदूषणावरही उपाय म्हणून बासरीचे आवाज वगैरे ऐकवावेत, असे सुचविले आहे. यावेळी त्यांनी गोव्याशी आपल्या स्नेहपूर्ण संबंधांविषयी काही उदाहरणेही दिली.

पक्षवाढीवेळी गोव्याची जबाबदारी जेव्हा आपल्याकडे होती, त्यावेळच्या आठवणी सांगण्यासही गडकरी विसरले नाहीत. असो, गडकरींनी प्रदूषणावर जे काही कान उपटले आहेत, ते पाहता सरकारला त्याचा कितपत विचार करते, ते पाहावे लागेल.

म्हादईचे भांडवल करण्याची संधी

गोवा विधानसभा निवडणुकीला भरपूर अवकाश आहे; पण लोकसभा निवडणूक दीड वर्षावर येऊन ठेपली असून त्या निवडणुकीच्या निमित्ताने म्हादई प्रश्नाचे भांडवल करण्याची नामी संधी विरोधी पक्षांना मिळाली आहे; पण तिचा लाभ खरेच ते घेऊ शकतील का? अशी शंका घेण्यासही जागा आहे. कारण गेली अनेक वर्षे हा प्रश्न चर्चेत आहे.

एवढेच नव्हे, तर गोव्यातील भाजप सरकारचे लवचिक धोरणही उघड झाले; पण तरीही कोणत्याच निवडणुकीत लोकापर्यंत तो प्रश्न नेला गेलेला नाही. विविध पक्ष केवळ या प्रश्नावरून प्रसिध्दीच मिळवतात. तसे नसेल तर लोकसभा निवडणुकीत या प्रश्नावरून त्यांनी रान उठवावे आणि भाजपला धडा शिकवावा, असे सर्वसामान्य लोक बोलत आहेत.

कधी होणार पुनर्वसन?

मडगावच्या आके वीज भवन ते अग्निशमन दलापर्यंतच्या वर्तुळाकार रस्त्याचे रुंदीकरण व सौंदर्यीकरणाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर त्या परिसराचा कायापालट होईल. रेल्वे पदपुलाकडील गाड्यांचे पुनर्वसन होईल, वगैरेही गेली अनेक वर्षे सांगितले जाते; पण हे सगळे नेमके कधी प्रत्यक्षात येईल ते कोणीच सांगत नाही.

पुनर्वसनासाठी अग्निशमन दलामागे जितके गाडे उभारले आहेत, त्याच्या दसपट गाडे त्या परिसरात आहेतच; पण त्यात रोज नव्या गाड्यांची भर पडत असल्याने नेमके पुनर्वसन कोणाचे होणार, असा प्रश्न गाडेवालेच एकमेकांना करू लागले आहेत.

दोन्ही सरकारे भाजपची, तरीही...

कर्नाटक सरकारकडून गोव्याच्या बाबतीत खासकरून म्हादईप्रश्‍नी कायमच विरोधाचा सूर उमटला आहे. म्हादईच्या पाण्यावर गोव्याचा हक्क आहे, तरीही कर्नाटक सरकारकडून तो डावलला जात आहे. यापूर्वीही म्हादई पाणी तंट्यावरून मोठा गोंधळ झाला आहे. आताही म्हादईबाबत केंद्र सरकार कर्नाटकच्या बाजूने झुकते माप देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवले तर गोव्याला या पाण्यापासून वंचित राहावे लागेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. केंद्र सरकारचा नेमका डाव काय आहे तेच समजायला मार्ग नाही, असे पर्यावरणप्रेमी म्हणतात. केंद्रात आणि राज्यात जर विरोधातील सरकार असते तर एक वेळ समजू शकले असते; पण केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार आहे, मग हा दुजाभाव का, असे लोकच विचारत आहेत.

... ही तर जुनीच रीत

नव्या झुआरी पुलाच्या उदघाटनावेळी केंद्रीय राज्यमंत्री आणि गोव्यातील भाजप संस्थापकांपैकी एक असलेले श्रीपाद नाईक यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना आता भाजपमध्ये उपऱ्यांचीच चलती असल्याची सडकून टीका केली आहे. मात्र, गोवा भाजपमध्ये असे वर्तन नवीन नसल्याचेही सांगितले जाते.

2019 साली केंद्रात भाजप स्पष्ट बहुमताने निवडून आल्यावर दिल्ली येथील रामलीला मैदानावर नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गेलेले माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रकाश वेळीप यांचा प्रवेश पासच तयार न केल्याने ते दिल्लीत जाऊनसुध्दा त्यांच्यावर सोहळ्यास उपस्थित न राहता परत गोव्यात येण्याची वेळ आली होती. या दोन ज्येष्ठ नेत्यांचे पास तयार केले जाऊ नयेत म्हणून गोव्यातीलच काही पदाधिकाऱ्यांनी म्हणे पद्धतशीरपणे व्यूहरचना केल्याचे सांगण्यात येते. आता बोला!

पोलिसांकडून चक्क स्वागत

गोव्यात न्यू इयर पार्टी करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून गाड्या भरधाव वेगाने चालवल्या जातात. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढते. अशातच आता लांबलचक नवीन झुआरी पूल सुरू झाला आहे. त्यामुळे गाड्यांची गती अधिकच वाढण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेऊन शुक्रवारी गोवा वाहतूक पोलिसांनी नव्या पुलावर उभे राहून वाहनांतून येणाऱ्या प्रवाशांचे फुले देऊन स्वागत केले.

दक्षिण गोव्याचे वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर हे स्वतः त्यासाठी रस्त्यावर उभे होते. पोलिस पुलावरून येणाऱ्या वाहनचालकांचे फुले देऊन स्वागत करतानाच त्यांना सावकाश आणि सुरक्षित ड्रायव्हिंग करा, हे सांगण्यास विसरत नव्हते. एरव्ही गोव्यात येणे म्हणजे पोलिसांच्या तालांवाला बळी पडणे, असा अनुभव असलेल्या पर्यटकांना हे असे स्वागत पाहून नक्की काय वाटले असेल, ते सांगणे कठीणच आहे.

कुंकळ्‍ळीतील ‘माम’ फॉर्मात

‘जनसेवा हीच ईश्‍‍वरसेवा’ हे व्रत मानून काम केल्यास जनतेचा आशीर्वाद मिळतो, असे आपल्या संत-महात्म्यांनी म्हटले आहे ते सत्य आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कुंकळ्‍ळी मतदारसंघातून निवडणूक लढवून पराभूत झालेले तसेच जिंकून आलेलेही गायब झालेले जनतेने पाहिले आहे.

मात्र याला अपवाद ठरले आहेत ते संतोष फळदेसाई जे ‘माम’ म्हणून या भागात परिचित आहेत. संतोषमाम सध्‍या भलत्याच फॉर्मात आहेत. एका स्थानिक क्लबच्या सर्व कार्यक्रमांत ‘माम’ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. त्या क्लबचे ते ‘पेट्रॉन’ बनले आहेत.

तसे ते राजकीय व्यासपीठावर कथाकथन करीत असले तरी त्यांचा कथेशी दुरूनच संबध. मात्र सानेगुरुजी कथामालेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास ‘माम’ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावरून पुढच्‍या निवडणुकीवरही त्‍यांचा डोळा आहे हे स्‍पष्‍ट होतंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT