IFFI Goa 2022 : आयुष्याच्या अखेरीस आपण आनंदी जीवन जगावे असे वाटणाऱ्या वडिलांची मुलाकडून घेतल्या जाणाऱ्या अति काळजीमुळे घुस्मट होते. मुलाला मात्र आपण आपल्या वडिलांची चांगली काळजी घेत आहे, त्यांना हवे नको ते पाहात आहे अशा भावनेत तो अधिकार गाजवत अंकुश ठेवत असतो.
मात्र, आपल्या आयुष्यातील अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करून समाधानाने जीवन जगू पाहणाऱ्या वडिलांना हवे असते एक टॉनिक. म्हणजेच आनंदी आयुष्य जगण्यासाठी एक आधार... तोच आधार ते वडील व त्यांच्या पत्नीला मिळतो आणि त्यांचे जीवन कसे आनंदी होते हे ‘टॉनिक’ या बंगाली चित्रपटाद्वारे दाखविण्यात आले आहे.
53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित झालेला हा चित्रपट अविजित सेन यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात नायकाला प्रतीकात्मकरित्या ‘टॉनिक’ असे नाव देण्यात आले आहे.
कारण तो ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनाचा आनंद घेता यावा यासाठी आवश्यक असलेला आधार आणि आत्मविश्वास प्रदान करतो. अभिनेते देव यांनी ही ‘टॉनिक’ची भूमिका उत्कृष्टपणे सादर केली आहे. सेवानिवृत्त आणि सत्तरीच्या घरात असलेले जलधर सेन, त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवासोबत राहत असतात.
त्यांच्या मुलाची हुकूमशाही वृत्ती आणि अति काळजी करण्याच्या स्वभावामुळे घरात मतभेद होतात, जलधर परदेशी सहलीची योजना आखतात आणि टॉनिक नावाच्या ट्रॅव्हल एजंटशी त्यांची भेट होते. जो नंतर त्यांच्या आयुष्यात एक चमत्कार घडवून आणतो. त्यांचा परदेश दौरा रद्द झाल्याने हे वृद्ध जोडपं आपल्या मुलाला न सांगता दार्जिलिंगला जातात. असे या चित्रपटाचे कथानक आहे.
आनंदी जीवनासाठीची संकल्पना
आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला एका आधाराची गरज असते ही या चित्रपटाची मूलभूत संकल्पना आहे. आपल्या पालकांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आजच्या युगातल्या अति संरक्षणात्मक आणि अवाजवी चिंता करणाऱ्या पिढीचे यथार्थ चित्रण यामध्ये आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.