Arpora Goa Nightclub Fire Video: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेतील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी ती घटना घडण्याच्या अगदी काही सेकंद पूर्वीची आहे, जी २५ लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.
व्हायरल व्हिडिओमध्ये क्लबच्या डान्स फ्लोअरवर एक बेली डान्सर एका प्लॅटफॉर्मवर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ सुरू झाल्यावर साधारण दहा सेकंदांतच तिच्या अगदी बाजूला आणि वरच्या बाजूला असलेल्या छतावर अचानक प्रखर ज्वाळा भडकतात. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, आग लागल्यानंतर ती क्षणार्धात संपूर्ण छतावर अतिशय वेगाने पसरते. त्यानंतर काही क्षणातच तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये पळापळ सुरू होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, या भीषण आगीच्या कारणाबद्दल सिलेंडर स्फोटाचा प्राथमिक संशय होता, पण नंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डान्स फ्लोअरवर वापरलेल्या इलेक्ट्रिक पायरो गनमधून निघालेल्या ठिणग्या ज्वलनशील सामग्रीवर पडल्याने आग लागल्याचा संशय अधिक बळावला आहे. या दुर्घटनेत २५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतांश लोकांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला, तर काही जण जळालेल्या अवस्थेत आढळले.
या दुर्घटनेनंतर गोवा फॉरवर्ड पार्टीचे (GFP) अध्यक्ष विजय सरदेसाई आणि काँग्रेस (INC) प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर या दोन्ही विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर प्रशासकीय अपयशाचा थेट आरोप केला आहे. विजय सरदेसाई यांनी या घटनेला 'मनुष्यनिर्मित शोकांतिका' म्हटले आणि 'ही आग घडली नाही, तर तिला घडू देण्यात आले' अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.
अमित पाटकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत, सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि बेकायदेशीर कारभार यांसाठी थेट सरकारला जबाबदार धरले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या वारसांना PMNRF मधून २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे, पण विरोधी पक्षांनी न्यायिक चौकशी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी कायम ठेवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.