मोरजी : पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर (National Highway Issue In Pernem Goa) ठिकठिकाणी पडलेले खड्डे मृत्यूचा सापळा बनले आहेत. धारगळ येथील उड्डाणपुलाला भेगा पडल्या असून, तिथे सिमेंट लावून लपवण्याचा प्रयत्न ठेकेदार करत आहेत. तसेच सर्व्हिस रोडवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यातून दुचाकी वाहने चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडचा पत्ताच नसल्याने राष्ट्रीय महामार्गावरून गावांमध्ये प्रवेश करताना अडचणी येत आहेत. उड्डाणपुलांचे कामही संशयाच्या घेऱ्यात आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीट रस्त्यालाच खड्डे पडले आहेत, शिवाय कामही व्यवस्थित झाले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महामार्गाच्या बाजूला असलेल्या गावांना जोडणाऱ्या सर्व्हिस रोडकडे तर साफ दुर्लक्ष झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर हे लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी पेडण्यात आले होते. तेव्हा त्यांनी सांगितले होते, की राष्ट्रीय महामार्गाच्या उंची बरोबरच सर्व्हिस रोड बनवले जातील. त्याची आजपर्यंत कार्यवाही झाली नाही. अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीची गरज असतानाही त्याची सोय केलेली नाही. तसेच अनेक कठडे कोसळले आहेत. त्यामुळे चालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत असल्याचे दिसून येते.
गटार व्यवस्थेचे काय?
राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला पूर्वी जी गटार व्यवस्था होती, त्या व्यवस्थेकडे कंत्राटदाराने गांभीर्याने पाहिलेले नाही. रस्त्याच्या बाजूला आजपर्यंत गटार व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात अनेक घरांत रस्त्यावरील पाणी शिरले होते. दोन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी अधिकाऱ्यांसोबत रस्त्याची पाहणी करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या होत्या. त्यावेळी मंत्र्यांनीही गटार व्यवस्था सुधारण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्या आदेशाला पाने पुसण्याचे काम कंत्राटदाराने केल्याचे नागरिकांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.