Goa Waterfall Dainik Gomantak
गोवा

Goa Waterfall: सत्तरीतील धबधब्यांची पर्यटकांना भुरळ; आता पंचायतीने 'या' गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Waterfall निसर्गरम्य सुंदरतेने भरलेला सत्तरी तालुका पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटण्यासाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

येथे बारमाही वाहणारे झरे, नद्या, ओहोळ यांकडे पर्यटक आकर्षक होतात तसेच पावसाळ्यात वाहणाऱ्या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी गोव्यातून तसेच गोव्याबाहेरून पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात.

पावसाने जोर धरल्यामुळे डोंगरमाथ्यावरून धबधबे ओसंडून वाहण्यास सुरवात झाली आहे. सत्तरीत पावसाळी धबधबे एवढे प्रसिद्ध आहेत की पर्यटक या धबधब्यांकडे आकर्षिले जातात.

शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थीवर्ग या अशा धबधब्यांवर सहलीसाठी येत असतात. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला आजची पिढी पुढे असते.

सत्तरीत दरवर्षी पावसाळ्यात शनिवार-रविवारी व सुट्टीच्या दिवसांत धबधब्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. त्याचबरोबर पर्यटन खाते व इतर संस्थांतर्फे धबधब्यावर होणाऱ्या ट्रेकिंगसाठी सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते.

आषाढी एकादशी तसेच बकरी ईदला सार्वजनिक सुट्टी होती. त्यामुळे पर्यटक पाली येथील शिवलिंग पावसाळी धबधब्यावर जमले. यात जास्त प्रमाणात युवक-युवतींचा सहभाग होता.

आता शनिवार व रविवारी धबधबे हाऊसफुल्ल दिसणार आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी स्थानिक पंचायतीने आवश्‍यक साधनसुविधा उभारण्याची गरज आहे.

पाली-जांभळीचे तेंब रस्ता फायद्याचा

पाली येथे नव्याने रस्ता झाल्याने पाली ते जांभळीचे तेंब मार्गे चोर्लाघाटावर जाण्यासाठी पर्यटकांना सोयीचे झाले आहे. पावसाळ्यात चोर्ला, सुर्ला आदी भाग सुंदर असल्याने पर्यटक त्या वातावरणाकडे आकर्षित होतात.

हा रस्ता पूर्ण झाल्यामुळे आता बेळगावात जाण्यासाठी फोंडा, गुळेली, वाळपई भागातील नागरिक याच मार्गाचा उपयोग करू लागले आहेत.

छोटे-मोठे धबधबे

सालेली, झर्मे, नानेली, ब्रह्माकरमळी, शेळप-बुद्रुक, चोर्लाघाट, पाली, हिवरे, शेळप, साट्रे, कुमठळ, करंजोळ, तुळस कोंड, मोले, रिवे, चरावणे तसेच सत्तरीतील इतर भागांत अनेक ठिकाणी छोटे-मोठे धबधबे वाहतात.

साट्रे येथील धबधबा तर वर्षभर वाहतच असतो. सत्तरीतील धबधबे हे म्हादई अभयारण्य क्षेत्रात येत असल्याने वनअधिकारी धबधब्यावर प्रवेश फी आकारतात.

साधनसुविधा उपलब्ध कराव्यात

पावसाळ्यात धबधब्यांवर येणाऱ्या पर्यटकांकडून स्थानिक पंचायतीने कमी प्रमाणात फी आकारली पाहिजे. येणाऱ्या पर्यटकांनी स्वच्छता बाळगली पाहिजे.

त्यामुळे कचरापेटी तसेच कापडे बदलण्यासाठी धबधब्याठिकाणी आवश्यक असणारी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ‘फी’च्या माध्यमातून पंचायतींना काही प्रमाणात आर्थिक निधी मिळू शकतो.

पाली-सत्तरी येथील शिवलिंग पावसाळी धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे पर्यटकांवर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र, आता पावसाळा सुरू झाल्यामुळे हळूहळू डोंगरमाथ्यावरून पाणी खाली येऊ लागले आहे.

त्यामुळे आता पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. गुरुवारी बकरी ईदनिमित्त सुट्टी असल्याने पर्यटकांनी धबधब्यावर येण्याचा आनंद लुटला. - सुरेश आयकर, पंचसदस्य, पाली-सत्तरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT