Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023 : कोसळ‘धार’ बोथट; पण पडझड कायम, वादळी वारे सुसाट

नेरूल, कांदोळी येथे झाडे पडून 20 वाहनांचे नुकसान; वीज खात्याचीही हानी

दैनिक गोमन्तक

गेल्या 15 दिवसांपासून राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाची ‘धार’ शनिवारी काहीशी ‘बोथट’ झाली. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पडझडींच्या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून झाडे पडल्याने घरांसह, वाहने आणि वीज खात्याचे मोठे नुकसान झाले आहे.

मडगावात शनिवारी पहाटे आरोग्य केंद्राच्या इमारतीचा दर्शनी भाग कोसळला, तर नेरूल आणि कांदोळी येथे झाडे पडून सुमारे २० वाहनांचे नुकसान झाले. मॉन्सून सुरू झाल्यापासून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून दोन कोटी रुपयांची मालमत्ता अग्निशमन दलाने वाचविली आहे.

मॉन्सून वारे वेगाने वाहत असल्याने राज्यभर वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. झाडे कोसळल्यामुळे अनेक भागांत विजेचाही खेळखंडोबा झाला आहे. सत्तरी, पेडणे, तसेच राज्यातील काही भागांत विजेचा लपंडाव सुरूच आहे.

वीज खात्याला ४,५०० कॉल्स

राज्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरे व इतर संसाधनांची हानी झाली आहे. घरे, वीजखांब, ट्रान्सफॉर्मर, वाहने, दरड कोसळणे, रस्ता खचणे, अशा विविध घटनांमुळे जनजीवन काहीसे प्रभावित झाले आहे.

मॉन्सूनला सुरवात झाल्यापासून अग्निशमन दलाला ४५० हून अधिक कॉल्स आले, तर वीज खात्यालाही ४,५०० हून अधिक वीजसमस्यांबाबत कॉल्स आले. गेल्या १५ दिवसांत ९२ लाख १२ हजारांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.

राज्यभर धूमशान

  • दांडोसवाडा-मांद्रे येथे रस्त्यावर झाडे पडल्याने तीन तास वाहतूक ठप्प.

  • देऊळवाडा-मांद्रे येथे आंब्याचे झाड कोसळल्याने वीज खंडित.

  • आडपई येथे घरावर झाड कोसळून सुमारे ४ लाखांचे नुकसान.

  • म्हापसा भाजी मार्केट शेडला गळती लागल्याने व्यापाऱ्यांचे हाल.

  • बांबोळीतील सर्व्हिस रस्ता गेला पाण्याखाली

  • डिचोलीतील पूरस्थिती आली नियंत्रणात; पावसाचा जोर ओसरला.

दोन झाडे पडून 20 वाहने चिरडली!

फट्टावाडा-नेरूल व बामणवाडा-कांदोळी येथे झाडे उन्मळून पडल्याने तब्बल २० वाहनांचे नुकसान झाले. कांदोळी येथे शनिवारी सकाळी ७.३०च्या सुमारास गोल्डन ट्युलीप हॉटेलजवळ पार्क केलेल्या १२ गाड्यांवर वडाचे झाड कोसळले, तर नेरूल येथे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास डेल्टीन कॅसिनो हॉटेलजवळ आंब्याचे झाड कोसळले. येथे पार्क केलेल्या तीन कार आणि पाच दुचाकी मिळून ८ वाहनांचे नुकसान झाले.

या घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार एल. आर. सावंत, हवालदार एन. जी. शेटये, व्ही. वाय. म्हापसेकर, एस. एस. नाईक, व्ही. जी. खांडोळकर, बी. डी. शिरोडकर, आर. ए. पांढरे, पी. पी. कोटकर, आऱ बी. पेडणेकर व इतर जवानांनी ही झाडे हटवली.

आतापर्यंत राज्यात ५२.७७ इंच पावसाची नोंद

गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ६८ मिमी. म्हणजेच २.६७ इंच पावसाची नोंद झाली असून राज्यात आतापर्यंत एकूण १,३४०.५ मिमी. (५२.७७ इंच) पावसाची नोंद झाली आहे. राज्यात १२.७ टक्के सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

१२ जुलैपर्यंत राज्यात जोरदार पावसाची बरसात होण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT