Goa Assembly Monsoon Session 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session: जंगलांतील वणव्यांमागे बिल्डर लॉबीचाच हात!- विरोधकांचा हल्लाबोल

विरोधकांचा आरोप : पुरावे द्या, कारवाई करतो : वनमंत्री

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session म्हादई अभयारण्यासह राज्यातील अनेक जंगलांमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात लावलेल्या आगीमध्ये ४८० हेक्टर वनक्षेत्र बेचिराख झाले आहे. यातील ३६५ हेक्टर क्षेत्र अभयारण्य राखीव क्षेत्र आणि नॅशनल उद्यानाचा भाग आहे.

या वणव्यांमागे रियल इस्टेट बिल्डर लॉबीचा हात असून या जमिनीचे भू-रूपांतर होऊ शकते, असा आरोप विरोधकांनी आज विधानसभेत केला. यावर वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी आक्षेप घेत या जमिनी अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानाचा भाग असल्याने याबाबत अत्यंत कडक निर्बंध असल्याने त्‍या भागांत कदापि भू-रूपांतर होणार नाही, असे सभागृहात सांगितले.

या प्रश्‍नावर आज विरोधकांनी वनमंत्री विश्‍वजीत राणे यांना घेरले असता, ते म्हणाले की, तेथे ‘बिल्‍डर लॉबी’ सक्रिय होईल, हा कयास अनाठायी आहे. तसे निदर्शनास आणून दिल्‍यास कठोर कारवाई केली जाईल.

या विषयावरून आज विधानसभेत विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा अधिवेशनात प्रश्नोत्तराच्‍या तासाला आमदार कार्लुस फेरेरा यांनी म्हादई अभयारण्यात लागलेल्या आगीचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर आमदार विजय सरदेसाई, क्रूझ सिल्वा, वेंझी व्हिएगस आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उपप्रश्‍नांच्या आधारे वनमंत्र्यांना घेरले.

यावर मंत्री राणे म्हणाले, प्रत्यक्ष स्थिती समजून घेतली पाहिजे. मोर्लेसारख्या ठिकाणी अतिशय घनदाट डोंगरमाथ्यावर आग लागल्यास तिथे बंब पोहोचवणे कठीण होते. त्यामुळे वायुदल दल, नौदलाची मदत घेतली.

तसेच अन्य ठिकाणी आग लागल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी यंत्रणा लागणार आहे, त्याचा आराखडा बनवला जात आहे. यासंबंधीचा सविस्तर अहवाल तयार केला असून, आगीमध्ये नक्की किती क्षेत्र भक्ष्‍यस्‍थानी पडले? कोणत्या प्रकारची जैवविविधता नष्ट झाली, याचा उल्‍लेख आहे. तो लवकरच विधानसभेत सादर करू, असेही मंत्री राणे म्हणाले.

‘काम्पा फंड’मधून वृक्षारोपण

वन खात्याकडे दरवर्षीच्या वृक्षारोपणाचा नेहमीचा फंड असून नुकसान भरपाई म्हणून विविध प्रकल्पांसाठी तोडलेल्या झाडांमधून तयार होणारा ‘काम्पा फंड’ही वन खात्याकडे असून या दोन्हींमधून यंदा वृक्षारोपण केले जाईल, अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली.

मानवी हस्तक्षेपामुळे अग्नितांडव

म्हादई अभयारण्य, भगवान महावीर अभयारण्य राष्ट्रीय उद्यान, नेत्रावळी अभयारण्यात १०४ ठिकाणी मानवी हस्तक्षेपामुळे आग लागल्याचे आज वनमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. यात ४८० हेक्टर वनक्षेत्र जळाले.

त्यापैकी ३६५ हेक्टर क्षेत्र अभयारण्याचा भाग आहे. याचा प्राथमिक अहवाल वन खात्याने तयार केला असून येत्या दोन दिवसांत तो सभागृहात मांडला जाईल, अशी माहिती वनमंत्री राणे यांनी दिली.

तेव्हा सक्षम यंत्रणाच नव्हती : राणे

वनविभागाकडे ५०२ कर्मचारी असून अग्निशमन दलाने ३५० आपदा मित्रांना प्रशिक्षण दिलेले असतानाही आग शमविण्यात अपयश का आले, असा प्रश्‍न विरोधकांनी केला असता, आगीचे स्वरूप वेगळे होते.

शिवाय आग वरून खाली येणारी होती आणि वन विभागाकडे अशी आग विझवण्यासाठी यंत्रणाच नव्हती, अशी कबुली वनमंत्री राणे यांनी दिली. यापुढे अशी दुर्घटना घडणार नाही आणि घडल्यास आग तातडीने शमविण्यासाठी यंत्रणा उभी करत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

...असे होते विरोधकांचे प्रश्‍‍न

  • यंदा जो प्रकार घडला, तो यापुढे घडू नये यासाठी वन खात्याने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?

  • डोंगरमाथ्यावर अग्निशमन बंब पोहोचत नाहीत, त्यासाठी काय तोडगा काढला?

  • आग लागण्याची संभाव्य स्थळे निश्चित केली आहेत का?

  • जे क्षेत्र आगीत भस्मसात झाले, त्याचे भूखंड पाडून बिल्डर लॉबीला दिले जाऊ नयेत, याची काळजी सरकार घेणार का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT