Margao
Margao Dainik Gomantak
गोवा

Margao : मडगावचे ऐतिहासिक महत्त्व माहित आहे का?

गोमन्तक डिजिटल टीम

-वाल्मिकी फालेरो

मडगाव हे नेहमीच सासष्टीतल्या सहासष्ट गावांपैकी एक प्रमुख गाव होते. सासष्टी हा गोव्याचा नेहमीच प्रमुख तालुका होता. सासष्टी हा गोव्यातील सर्वांत मोठा, सर्वाधिक लोकसंख्येचा, सर्वाधिक महसूल देणारा, ‘जुने ते सोने’ म्हणत नव्या गोष्टींचा तितक्या आत्मीयतेने स्वीकार करणारा तालुका आहे,अगदी नेहमीच. (येथे ‘नेहमी’ म्हणजे गोव्याच्या नोंद केलेल्या इतिहासाच्या सुरुवातीपासून, इसवी सन पूर्व ते आत्तापर्यंत) पूर्वी क्षेत्रफळानुसार सासष्टी हा सर्वांत मोठा तालुका होता. 19 व्या शतकात पोर्तुगिजांनी गोव्याच्या तालुक्यांची पुनर्रचना करेपर्यंत हा नावलौकिक कायम होता.

पोर्तुगीजांनी हेंबरबारशेम आणि अष्टागर या पूर्वीच्या दोन वेगवेगळ्या प्रांतांना जोडून एकच तालुका तयार केला ज्याचे नाव सांगे. त्यामुळे, सांगे हा क्षेत्रफळानुसार गोव्यातील सर्वांत मोठा तालुका बनला. त्यातही, मुरगाव बंदराचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता यावे, यासाठी 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात मुरगावलाही सासष्टीपासून तोडले आणि वेगळा तालुका निर्माण केला. या दोन गोष्टींमुळे सासष्टीने आकारमानाने सर्वांत मोठा तालुका होण्याचा मान गमावला असला, त्यानंतर चंद्रावती आणि बाळ्ळी हे भाग केपे तालुक्याला जोडण्यात आले, तरी सासष्टीचे महत्त्व अजिबात कमी झाले नाही, विशेषतः राजकीयदृष्ट्या!

या लेखमालेत मडगाव, सासष्टी आणि गोव्याचा संक्षिप्त इतिहास मांडला जाणार आहे. त्यातून कदाचित उत्तरे सापडण्याऐवजी आणखी प्रश्न निर्माण होतील. मूलनिवासी, आदिवासी लोकांकडून आर्यांनी जेव्हा हा भाग जिंकून घेतला त्याकाळापासून या भागाचे नाव मठग्राम (मठांचे गाव) असे होते आणि मठग्राम हे सासष्टीतील मुख्य गाव होते. केवळ सासष्टीतलेच नव्हे तर किमान 325 इसवी सनपासून भोजांच्या प्राचीन राजधानी असलेल्या चंद्रपूर (आताचे चांदोर)सह गोव्यातील प्रमुख गाव होते.

पंधराव्या शतकात विजापूरच्या शासकांनी एला (आता जुने गोवे) ही राजधानी म्हणून घोषित करण्यापूर्वी 1054 साली सासष्टीतील कदंब शासक, जयकेशी पहिला (1052-1080) याने आपली राजधानी गोवापुरी (अंदाजे आगशी ते शिरदोणच्या पायथ्यापर्यंतचा भाग) येथे हलवली. 1843 साली पोर्तुगीजांनी राजधानी पणजी येथे हलवली, जी आजही गोव्याची अधिकृत राजधानी आहे. गोव्याचे सत्ताकेंद्र जरी नदीकिनारी असले तरी गोव्याचा महत्त्वाचा भाग समुद्रकिनाऱ्यालगत आहे.

गोव्यात स्थायिक होणारे लोक हे सामान्यतः ऑस्ट्रो-एशियाटिक भाषिक गटातील मिश्र जातीचे होते, असे मानले जाते. गोव्यात ही पहिली मानवी वस्ती ख्रिस्तपूर्व 1500 नंतरच्या काळात झाली, असा सर्वमान्य अंदाज आहे. म्हार्स (मरांग, मुंडारी भाषेतील मोठे कुटुंब) हे नैऋत्य भारतातील किनारी, मैदानी प्रदेशातून (मलबार किंवा कर्नाटक) आले, असे मानले जाते.

म्हार दैत्यकुलीन म्हारूची पूजा करत असत आणि त्याला म्हशींचा बळी अर्पण करत. त्यांनी मांस खाल्ले आणि म्हणून इंडो-आर्यन वर्चस्व असलेल्या समाजाने त्यांना अस्पृश्य बहिष्कृत वर्गात टाकले. या म्हारांची अवैध संतती श्वापक (कुत्रा खाणारी) होती. गुराढोरांप्रमाणे म्हारांच्या गळ्यात घंटा बांधली जायची, जेणे करून त्यांच्या येण्याची वर्दी मिळेल आणि त्यांची सावळी अंगावर पडून अपवित्र होण्यापासून उच्च जातीचे लोक वाचतील. म्हार गाव म्हणजे म्हार राहतात ते गाव, त्याचेच पुढे मारगाव, मडगाव झाले अशीही एक व्युत्पत्ती सांगितली जाते.

(म्हारू, ज्याचा सामान्यतः अर्थ राक्षस असा केला जात असला तरी गोमंतकीय परिभाषेत त्याला अनेक छटा आहेत. गोव्यात म्हारूला गावाच्या सीमांचा रक्षणकर्ता मानले जात असे. गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता, जुझे एफ. एफ. डी अल्बुकर्क यांच्या मताप्रमाणे, दगडांनी आखलेल्या गावच्या सीमांना म्हारू असे म्हटले जात असे. (दिवार: द आयकॉनिक आयलंड ऑफ गोवा दौराडा, पृ. 64) एका विशिष्ट अमावास्येला या म्हारूला कुठल्यातरी प्राण्याचा बळी दिला जाई व त्याचे रक्त त्या दगडांवर ओतले जात असे.)

गोव्यात येऊन वसणाऱ्यांपैकी दुसरी जमात होती गवळ्यांची, ज्यांना गोव्याबाहेर धनगर संबोधले जाते. गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या यांचे पालन करून त्यापासून उदर्निर्वाह करणारी ही जमात होती. त्यांच्यामध्ये मेंढपाळ-गायीम्हशी पाळणारे, लोकर विणणारे आणि कसाई होते. हे लोक लिंगपूजक व निसर्गपूजक होते.

मठग्रामाची प्रमुख देवता असलेल्या दामोदर मंदिरातील विधींशी त्यांचा संबंध होता. आजही, प्रसिद्ध गुलालोत्सवाची सुरुवात मंदिराच्या समोरच्या प्रांगणात होणाऱ्या गवळी नृत्याने होते. त्यांच्या मंदिरात ब्राह्मण भट (पुजारी) असत नाहीत, परंतु त्यांचे स्वतःचे पुजारी आहेत, ज्यांना ‘सिकडी’ म्हणतात.

गवळ्यांच्यानंतर गोव्यात स्थायिक झालेला समाज म्हणज़े गावडा (आदिवासी, असुर). पूर्वीच्या दोन जमाती दक्षिण भारतातून स्थलांतरित झाल्या, तर गावडा (आणि त्यांचे अनुसरण करणारा इतर समाज) हे मध्य प्रदेश, ओरिसा, दक्षिण बिहारच्या छोटा नागपूर प्रदेशातून, मध्य भारतातून आले. तेथून ते दक्षिण भारतातील इतर भागांत पसरले, विशेषत: कर्नाटक, तेथून काहींच्या मते ते गोव्यात स्थलांतरित झाले.

गावडे हे मुळात जमीन कसणारे होते. त्यांनी गोव्यातील म्हार आणि गवळी या दोघांनाही आपलेसे केले. त्यांच्यानंतर आलेले कुणबी व गावडा हे एकच आहेत, अशी गल्लत अनेकदा केली जाते. पण, गावडे स्वतःला सामाजिकदृष्ट्या कुणब्यांपेक्षा श्रेष्ठ समजतात आणि त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाही.

आर्य येण्यापूर्वी गोव्यात येऊन वसणारी महत्त्वाची जमात होती, ती म्हणजे कुणबी. गावड्यांच्या नंतर गोव्यात आलेले कुणबी हेसुद्धा गावड्यांप्रमाणेच मूळचे छोटा नागपूरचे. कुणबी ही प्रामुख्याने सावळ्या वर्णाची व शिकारी जमात(मुंडारी भाषेत कोल म्हणजे जंगली डुक्कर). पूर्वाश्रमीचा शिकार करण्याचा व्यवसाय सोडून ते जमीन कसू लागले होते. भारतीय मानववंशशास्त्रीय सर्वेक्षणानुसार जमातीचे नाव कुण (लोक) आणि बी (बियाणे) पासून तयार झाले आहे.

कुणबींनी गोव्यातील जमिनीला कृषियोग्य बनवले. त्यांनी गरजेनुसार लाकूड आणि दगडापासून बनवलेली टोकदार, धारदार किंवा बोथट साधने आणि अवजारे विकसित केली. कुणबींनी गोव्यात त्यांच्या आधीच्या इतर सर्व जमातींना (आणि त्यानंतरच्या मुंडारी आणि खारवी जमातींनाही आपलेसे केले. त्यांचे वर्चस्व इतके होते की कृषिप्रधान गोव्यातील जवळजवळ प्रत्येक गोष्ट त्यांच्या जमातीच्या अद्याक्षराने सुरू झाली. कुमेरी या शेतीच्या प्रकारापासून ते कुडव, खंडी, कुंभ सारख्या मोजमापांपर्यंत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

Goa Weather Today: राजधानी पणजीसह गोव्यातील सात तालुक्यात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT