पणजी: बहुप्रतिक्षित गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन यंदा ९ आणि १० ऑगस्ट रोजी पणजीतील आयनॉक्स आणि मॅकिनेझ पॅलेस येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या उद्घाटनास प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांची खास उपस्थिती राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना कृतज्ञता सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे ‘विन्सन वर्ड’चे संजय शेट्ये यांनी सांगितले.
पणजी येथे मनोरंजन सोसायटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विनोद शेट्ये, सचिन चट्टे आणि उदय म्हांबरे उपस्थित होते. शेट्ये म्हणाले, या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आलेले तसेच पुरस्कार प्राप्त चित्रपट सादर होणार आहेत. ज्यामध्ये जयंत सोमलकर दिग्दर्शित आणि टोरांटो चित्रपट महोत्सवात नेटपॅक सन्मान मिळविणारा पहिला मराठी चित्रपट ‘स्थळ’ दाखविण्यात येणार आहे.
त्यासोबतच ‘घरत गणपती’, ‘आता थांबायचं नाही’, ‘पाणी’ आदी चित्रपट दाखविण्यात येतील. या व्यतिरिक्त ‘कुर्ला ते वेंगुर्ला’, ‘धर्मस्य’, ‘स्नोफुलवा’ आणि ‘सिनेमन’ जे अजून प्रदर्शित न झालेले चित्रपट पहिल्यांदाच या महोत्सवात दाखविले जाणार आहेत. गोव्यातील कंटेट क्रिएटर ते चित्रपट निर्माते यांना निर्मितीसाठी एआयचा वापर कसा करता येऊ शकतो याबाबत विज्युअलडब.एआय द्वारे ८ ऑगस्ट रोजी पणजी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असेल, असे शेट्ये यांनी सांगितले.
या महोत्सवात गोमंतकीय निर्मात्यांनी निर्माण केलेले दोन लघुपट दाखविण्यात येणार आहेत. युवा निर्माते शर्व शेट्ये यांचा ‘कर्ज’ हा हिंदी लघुपट तसेच गेल्यावर्षी इफ्फीत प्रदर्शित झालला किशोर अर्जुन निर्मित ‘एक कप च्या’ हा कोकणी लघुपट प्रदर्शित केला जाणार असल्याचे उदय म्हांबरे यांनी सांगितले.
या महोत्सवादरम्यान प्रसिद्ध मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, गजेंद्र अहिरे, मृणाल कुलकर्णी, छाया कदम, किशोर कदम, मिलिंद शिंदे, जितेंद्र जोशी, रोहिणी हट्टंगडी, आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, सई ताम्हणकर, ओम भुतकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, निकिता दत्ता, अमृता सुभाष यांच्यासह इतरांशीही या महोत्सवाशी संवाद साधण्याची संधी प्रेक्षकांना लाभणार असल्याचे शेट्ये यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.