पेडणे: ‘माझे घर’ योजनेच्या अंमलबजावणीत नागरिकांची अडवणूक किंवा विनाकारण दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. आवश्यक प्रमाणपत्रे मिळाल्यानंतरही अर्जदारांना त्रास देणाऱ्या किंवा योजनेच्या प्रक्रियेत अडथळे आणणाऱ्या पंचायत सचिवांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयात शनिवारी आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. यासंदर्भात त्यांनी पेडणे गटविकास अधिकारी मीक्षा मांजरेकर यांना आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले.
सरकारी योजनांचा लाभ घेताना सर्वसामान्य नागरिकांना अनावश्यक प्रशासकीय प्रक्रियेला सामोरे जावे लागू नये आणि त्यांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, हा ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमाचा उद्देश आहे. आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे मिळाल्यानंतरही पंचायत स्तरावर कामे प्रलंबित राहत असतील, तर अशा प्रकरणांची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
तक्रारीसाठी देण्यात आलेल्या कागदावर आपले नाव, दूरध्वनी क्रमांक आणि तक्रारीचा तपशील कोकणी, मराठी किंवा इंग्रजी भाषेत लिहून द्यावा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या तक्रारींची पडताळणी करून संबंधितांना उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या कार्यक्रमाला मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, माजी आमदार दयानंद सोपटे आणि विविध सरकारी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
हरमलच्या नागरिकाच्या तक्रारीची दखल
‘माझे घर’ योजनेची कागदपत्रे पूर्ण करूनही दाखला मिळत नसल्याची तक्रार हरमल येथील नागरिकाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. संबंधित पंचायत सचिव आजारपणाचे कारण देऊन रजेवर असल्याचे आढळल्याने मुख्यमंत्र्यांनी गटविकास अधिकारी मीक्षा मांजरेकर यांना चौकशीचे निर्देश दिले. सचिवाची टाळाटाळ सिद्ध झाल्यास त्याला निलंबित करण्याचा आदेशही त्यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.