Portuguese Dainik Gomantak
गोवा

Goa Liberation : पोर्तुगिजांच्या राजवटीखाली सर्वात दीर्घकाळ राहिलेली जुनी काबिजाद

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Liberation : गोवा राज्याचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या दोन विभाग झालेले आहेत. त्यातील पहिला भाग जुनी काबिजाद तर दुसरा भाग हा नवीन काबिजाद म्हणून ओळखला जातो. या भागांना जुनी काबिजाद आणि नवीन काबिजाद असे का म्हटले जाते, याचे कारण जाणून घेऊया. पोर्तुगिजांनी सन 1510 साली तिसवाड़ी बेट आदिलशहाकडून जिंकून घेतले. पुढे 1543 या वर्षी आदिशहाकडून पोर्तुगिजांना बार्देश, साष्टी हे तालुके मिळाले. यातील जुने तीन आणि आताचे चार तालुके म्हणजे बार्दश, तिसवाडी, मुरगाव आणि सासष्टी सर्वांत आगोदर पोर्तुगिजांच्या ताब्यात आले. त्यामुळे या भागांना जुनी काबिजाद असे म्हटले जाते. पुढे सन 1510 ते 1543 व नंतर पुढे जवळपास अडीचशे वर्षानंतर पोर्तुगिजांनी गोव्यातील बाकीचे तालुके ताब्यात घेतले. त्या विभागाला नवी काबजाद असे म्हटले जाते. सन 1753 व 64 मध्ये पोर्तुगिजांनी पेशवे व सौंधेकरांकडून फोंडा, केप, सांगे, काणकोण व नवीन धारबांदोडा हे तालुके जिंकून घेतले. तसेच पुढे सन 1785 च्या दरम्यान पोर्तुगिजांनी सावंतवाडीकर सावंतांकडून पेडणे, डिबोली, सत्तरी हे तालुके ताब्यात घेतले. आठ तालुके पोर्तुगिजांच्या ताब्यात नंतरच्या काळात आले. म्हणून या विभागास पोर्तुगीज नवीन काबिजाद या नावाने ओळखू लागले.

सन 1510 साली पोर्तुगिजांनी तिसवाडी बेट जिंकून घेणापूर्वी तिसवाड़ी बेट हे राजकीय व व्यापारी केंद्र होते. कारण, मांडवी, व झुवारी या नद्यांच्या विस्तीर्ण व खोल खाड्या अनुक्रमे उत्तर व दक्षिण भागात होत्या. घाटमाथ्यावरून आजच्या महाराष्ट्र व कर्नाटकच्या पठारी भागातून पिकणारा कापूस हा युरोपासह संपूर्ण जगभर निर्यात होणारे नगदी पीक. कापसासह इतर धान्ये, रामघाट, चोर्ला घाट व केळ घाट या तिन्ही घाटांतून तिसवाडीच्या बंदरात आणणे सोईचे होते. यामुळे येथे प्राचीन काळापासून राजकीय व व्यापार राजधानी बनल्या. प्राचीन काळी गोपकुपट्टण ऊर्फ गोवा वेल्हा हे झुवारी नदीकाठचे व्यापारी बंदर जगप्रसिद्ध होते. तसेच येथे कदंब काळात राजधानीचे शहर होते. या प्रमुख भावा गोपकपट्टण ऊर्फ गोवा व्हेल्हा या तिसवाडी तालुक्याला गोवा बेट किंवा जजीरे गोवा असेही म्हटले जायचे. मांडवी व झुवारी नद्या अनुक्रमे उत्तर व दक्षिणेकडून समुद्राला मिळतात. या नद्या नैसर्गिक कालव्याने कुंभारजुवा ते आगशीदरम्यान जोडल्या गेल्यामुळे तिसवाडी तालुक्याला चारही बाजूने पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे पुर्वीच्या काळी चिसवाडी बेटात प्रवेश करण्यासाठी जलमार्गाचा वापर करावा लागत असे. चारही बाजूंनी पाण्याने वेढल्यामुळे तिसवाडीला गोवा बेट असेही म्हणत. अरबीभाषेत बेटाला जंजीरा असे म्हणतात. त्यामुळे, सतराव्या, अठराव्या शतकातील कागदपत्रांत गोवा बेट किंवा जंजीरे गोवा असा उल्लेख येतो.

बाराव्या शतकाच्या अखेरीस कदंब राजवट नष्ट होऊन गोवा बेटावर मुस्लीम राजवटीस सुरुवात झाली. बिदरच्या बहामनी सुलतानासाठी गोवा बेट हे एक महत्त्वाचे व्यापारी बंदर होते. पोर्तुगिजांच्या पूर्वी भारताच्या पश्चिम किनाज्यावर अरब व्यापाराचे वर्चस्व होते. हे अरब व्यापारी मलबार किनाऱ्यावरील मिरी आणि गोवा, महाराष्ट्र, गुजरात किनाज्यावरून कापूस ही महत्त्वाची व्यापारी पिके जगभरात नेत. त्याच्या बदल्यात जगभरातून सोने, चांदी, मोती, हिरे, हस्तिदंत आणत. अशा देवाणघेवाणीच्या व्यापारामुळे गोवा बंदर अतिशय समृद्ध झाले होते. परंतु, बहामनी सुलतानाचे व अरबांचे धार्मिक तेढ अधूनमधून उफाळून येत असे. त्याचा त्रास स्थानिक हिंदूंना भोगावा लागे. अशाच धार्मिक वेडापायी बहामनी सुलतानांनी तिसवाड़ी बेटाच भाग असणाऱ्या दिवाडी बेटावरील कंदब राजाचे कुलदैवत सप्तकोटेश्वरावर घाव घालत मंदीर उद्ध्वस्त करत शिवलिंग उखडून् शेताच्या बांधावर चिखलात घालून विटंबना केली. याच काळात अरब व्यापाऱ्यांची मुलबारातील स्त्रियांपासून झालेली अनौरस संतती ही नायटे मुसलमान म्हणून ओळखली जाऊ लागली. व्यापारी जहाजाची लूट, हा नायटे मुसलमानांचा प्रमुख उद्योग होता. या नायट्यांची वस्ती गोवा बेटावर वाढून गोवा बेरावरील हिंदूंना भयंकर उपद्रव देऊ लागले. तेव्हा वेर्णा येथील म्हाळ पै व स्थानिक वतनदार निमोजी यांनी मलबार म्हणजे आजच्या केरळ किनाऱ्यावरील कोची येथील पोर्तुगिजांना गोवा बेटावरील नायट्यांच्या उपद्रवापासून सुटका करण्याचे निमंत्रण दिले.

सन 1510 साली पोर्तुगीज दर्यावर्दी अफोन्स दी अल्बुकर्क याने जलमार्गाने पोर्तुगीज नौदलाच्या साहाय्याने गोवा बेट आदिलशाही सैन्याकडून जिंकून घेतले. गोवा बेट पोर्तुगिजांनी जिंकल्यानंतर परत लगेच आदिलशाहाने पोर्तुगिजांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोर्तुगिजांनी परत एकदा आदिलशाही सैन्याचा पराभव करत आपली पाळेमुळे गोवा बेटावर घट्ट रोवली. जिंकल्यावर पोर्तुगिजांनी येथील सर्व मुसलमानांची कत्तल करून मुस्लीम स्त्रियांची लग्ने पोर्तुगीज सैनिकांबरोबर लावून दिली. मुस्लीम व कॅथलीक ख्रिश्चन पोर्तुगीज यांचे हाडवैर अनेक शतकांपासूनचे होते. त्यामुळे, त्याचा फायदा सुरुवातीला गोवा बेटावरील स्थानिक हिंदूंना तात्पुरता झाला. पण, पुढे हिंदूसाठी भयंकर काळ येणार होता. सन 1510 ते 1543 या काळात पोर्तुगिजांनी गोवा बेटावरील कारभार शांततेत पार पाडला. काही किरकोळ धर्मांतरे सोडली तर फारसे धार्मिक अत्याचार या काळात येथे केले नाहीत.

सन 1543 च्या दरम्यान पोर्तुगिजांना गोव्यात राज्य विस्तार करण्याची संधी मिळाली. विजापुरचा बादशहा आदिलशहा आजारी पडून त्याच्या दोन मुलांमध्ये मियालखान व इब्राहिम यांच्यात बादशाहीसाठी भांडणे पेटली. इब्राहिम याने पोर्तुगिजांकडून दारुगोळा, बंदुका, यांची मदत घेत व मियालखानाला पोर्तुगिजांनी आश्रय देऊ नये या अटोवर इब्राहिम आदिलशहाने साष्टी व बार्देश 1543 च्या जानेवारीत बहाल केले. या घटनेपूर्वी काही वर्षे पोर्तुगिजांनी तिसवाड़ी बेटात बाटवाबाटवी व मंदीर विद्ध्वसाला सुरुवात केली होती. अशा काळात पोर्तुगीज साष्टी व बार्देश ताब्यात मिळाले. पोर्तुगिजांना आता धार्मिक जुलूमाविरुद्ध जाब विचारणारी या काळात कोणताही राजसत्ता नव्हती. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची सीमाही या काळात गोव्यापासून दूर गेली होती. तसेच विजयनगर साम्राज्यालाच पाच मुस्लीम शासकांपासून धोका निर्माण झाला होता. त्यामुळे, पोर्तुगिजांना बार्देश तिसवाडी, साष्टी या जुन्या काबिजादीत अनन्वित पांथिक अत्याचार केले.

- सचिन मदगे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT